
अहिल्यानगर शहरात कापड बाजार, नवीपेठ आणि माळीवाडा यांसारख्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी जिल्हाभरातून महिला येतात. मात्र, नैसर्गिक विधीसाठी त्यांना अनेकदा शौचालय शोधत फिरावे लागते. कारण शहरात महापालिकेची अवघी २५ शौचालये आहेत.
यातील ८ शौचालये सशुल्क, तर १७ सार्वजनिक आहेत. मात्र, अनेक ठिकाणी तुटलेली भांडी, पाण्याचा अभाव आणि अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली आहे. माणिक चौकातील सुलभ शौचालयातील पाइप तुटल्यानेही नागरिकांची गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे, सावेडी उपनगरातही सार्वजनिक शौचालयांची पुरेशी व्यवस्था नाही. माळीवाडा आणि केडगाव येथे नवीन शौचालयांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, शासनाची मंजुरी आणि निधीअभावी हे प्रकल्प रखडले आहेत.
महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये उपलब्ध होणार तरी कधी? आता महापालिका यावर काय पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





