Explained

नगरमध्ये विखे पाटील – जगतापांची त्सुनामी ! विरोधकांचा सपशेल पराभव ,गुलालाचे डंपर, फडणवीसांचा फोन… AMC निकालाची इनसाईड स्टोरी

Explained : “विधानसभा, त्यानंतर नगरपालिका व आता महानगर पालिका निवडणुकीत भाजपने हॅट्रीक केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा सर्वसमान्यांचा विश्वास तिसऱ्यांदा स्पष्ट दिसला,” हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं एका वाक्यातलं उत्तर बरंच काही सांगून जातं. दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर, आज अहिल्यानगर महानगर पालिकेला नवे कारभारी मिळाले. गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. माजी खा. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप, या जोडगोळीने पुन्हा एकदा कमाल केल्याचं दुपारपर्यंत स्पष्ट झालं.

दुपारी 12 वाजेच्या सुमारास, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रासमोर दोन डंपर भरुन गुलाल आणला. दुपारी एक वाजेनंतर मंत्री विखेंच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. ही निवडणूक विखे- लंके या दोन नेत्यांभोवतील सुरुवातीपासून फिरवली गेली. परंतु निकालानंतर विखेंनी लंकेंना चारीमुंड्या चित केल्याचे दिसले. शरद पवार गटाच्या एकाही नगरसेवकाला खा. लंकेंना निवडून आणता आले नाही. खा. लंके यांचं, आमच्या बाह्या वरच आहेत… हे विधान नगरकरांना भावलं नाही. भोपळाही फोडता न येणं, हा खा. लंकेंसाठी व त्यांचे नेते शरद पवारांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. नेमकं काय झालं नगरमध्ये? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

संग्राम भैय्या तुम आगो बढो, हम तुम्हारे साथ है… ही घोषणा, कुणा कार्यकर्त्यांनी नाही तर, स्वतः पालकमंत्री विखेंनी विजयानंतर दिली. महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मंत्री विखेंच्या बंगल्यावर भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी माजी खा. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या गळ्यात एकच हार घालून विजयोत्सव साजरा केला. त्यावेळी उत्साही झालेल्या मंत्री विखेंनी ही घोषणा दिली. या घोषणेत सुजय-संग्राम या जोडीवरचा, नगरकरांचा व पालकमंत्र्यांचा विश्वास स्पष्ट दिसत होता.

अहिल्यानगर महानगर पालिकेत माजी खा. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप-राष्ट्रवादीने युती केली होती. जागा वाटपात बिनसल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हाच निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचे निकालानंतर दिसले. सुमारे 50 पेक्षा जास्त जागेवर उमेदवार देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला फक्त 10 जागा जिंकता आल्या. तर तब्बल 27 जागा जिंकत राष्ट्रवादी अजित पवार गट क्रमांक एकचा पक्ष ठरला. दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच भाजप राहिले.

भाजपनेही तब्बल 25 जागांवर विजय मिळवसा. ही लढत विखे-लंके यांच्यात रंगेल, असं चित्र निवडणुकीच्या सुरुवातीला रंगविण्यात आले होते. परंतु निकालानंतर हे चित्र, चित्र नसून फक्त रेघोट्या असल्याचे दिसले. ज्या खा. निलेश लंके यांनी या निवडणुकीत प्रखर भाषण करुन रंगत आणण्याचा प्रयत्न केला, त्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला एकही जागा जिंकता आली नाही. कधीकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला, अहिल्यानगर जिल्ह्यातील हा त्यांचा सलग तिसरा सर्वात मोठा पराभव ठरला. यापूर्वी विधानसभेला शरद पवार गटाचा फक्त एक आमदार निवडून आला होता. त्यानंतर पालिका निवडणूकीतही शरद पवारांच्या पक्षाला प्रभाव दाखवता आला नव्हता.

अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीत तर, स्वतः खा. निलेश लंके मैदानात उतरले होते. प्रभागनिहाय बैठकाही त्यांनी घेतल्या होत्या. अगदी नगरच्या भाषणात प्रखर भाषण करुन, विरोधकांना दमही भरला होता. परंतु निकालानंतर हे सगळे वातावरण अगदी फुस्स ठरले. खा. लंके यांना एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. ज्या महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर ही निवडणूक झाली ती ताकद मतांमध्ये परावर्तीत झाली नाही. शिवसेना ठाकरे गटाला एक व काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळवता आला.

खा. लंके यांच्या नेतृत्त्वात हा महाविकास आघाडीचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. त्याऊलट विखे-जगताप जोडीने ऐतिहासिक विजय मिळवत, पन्नास प्लस नगरसेवक निवडून आणले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन मंत्री विखे व माजी खा. सुजय विखे पाटील यांचे अभिनंदन केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा बसपा व एमआयएम पार्टीचा स्ट्राईक रेट चांगला राहिला. बसपाने एका व एमआयएमने दोन जागांवर विजय मिळवला. छोट्या पक्षांना खाते उघडता आले मात्र खा. लंके यांना आपल्या पक्षाचे खाते उघडता आले नाही, याचीही नगरमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button