Explained

1 किलो चांदी, 10 तोळे सोने लुटले, पोलिसांवर गोळ्या झाडणाऱ्या नगरच्या टोळीचा थरार

अहिल्यानगर-मराठवाड्याच्या सिमेवर असणाऱ्या खरवंडी कासारमध्ये, एखाद्या गुन्हेगारी विश्वावर आधारीत चित्रपटासारखा थरार रंगला. रात्रीच्या किर्र अंधारात, एका कुख्यात टोळीला वेढा घातलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला. या टोळीतील मुख्य व्हिलनने पोलिसांवर थेट गोळी झाडली. ही गोळी एका पोलिसाच्या अगदी काही सेंटीमिटर अंतरावरुन गेली. पोलिसाची थोडी हालचाल चुकली असली तर, त्या पोलिसाचे काही खरे नव्हते. पुढच्या काही मिनिटांत ही टोळी एका एक्सयूव्ही कारमधून पसार झाली.

अखेर पोलिसांनी धाडसत्र राबवत, मंगळवारी या टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या. बरं, ही टोळी काही साधीसूधी नव्हती. थेट दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन या टोळीनं एका सोनाराला लुटले होते. सोनाराच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. तब्बल १३ तोळे सोने व एक किलो चांदीचे दागिने लुटून या टोळीने अक्कलकोट तालुक्यात दहशत बसवली होती. गेल्या दोन तीन दिवसांत पोलिसांच्या या सिंघम स्टाईलची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. नेमकं काय घडलं खरवंडीत? आणि नगरच्या या टोळीनं नेमकं काय केलं होतं?

२९ मे रोजी महाराष्ट्र हादरला. सोनाराला लुटण्याची एक खळबळजनक घटना अक्कलकोट तालुक्यातील जेऊर-करजगी रस्त्यावर घडली. विशेष म्हणजे भर दुपारी घडलेल्या या घटनेत या व्यापाऱ्याच्या अपहरणाचाही प्रयत्न झाला. अखेर एक किलो चांदीचे दागिने, सोबतच्या बँगमधील सोन्याचे दागिने व व्यापाऱ्याच्या अंगावरील दागिने घेऊन या टोळीन पोबारा केला होता. २९ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास अभिनंदन पोतदार (वय ५७) हे सराफ नेहमीप्रमाणे आपल्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने घेऊन दुकानाकडे जात होते. पोतदार हे जेऊरमध्ये राहतात. परंतु त्याचे दुकान हे करजगी गावात आहे.

रोज सकाळी आपल्या दुचाकीवरुन दागिने घेऊन दुकानात जाण्याचा त्यांचा दिनक्रम होता. तसे ते, शुक्रवारीही दुकानाकडे निघाले होते. परंतु जेऊर गावापासून काही अंतरावर असलेल्या सोलर प्लॅन्टजवळ त्यांना एका चारचाकी गाडीने आडवले. त्या गाडीत बरेच लुटारु होते. पोतदार यांच्या दुचाकीला कार आडवी लावून, या टोळीनं पोतदार यांना काही कळायच्या आत मारहाण करायला सुरुवात केली.

एकानं त्यांच्या गळ्यात अडकविलेली बॅग हिसकावून घेतली. आता ही टोळी त्यांच्या कारमध्ये बसणार तोच, एकाची नजर जखमी पोतदार यांच्या गळ्यातील व हातात घातलेल्या सोन्याच्या चैन व ब्रासलेटकडे गेली. त्यानंतर या टोळीनं थेट जखमी पोतदार यांनाच कारमध्ये बसवले. कारमध्ये पुन्हा पोतदार यांना मारहाण करण्यात आली व त्यांच्या अंगावरील सगळे दागिने लुबाडण्यात आले. पोतदार यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या गळ्याला चाकू लावण्यात आला. नंतर काही अंतरावर असलेल्या कणबस गावाजवळ जखमी पोतदार यांना कारमधून फेकून देत, ही टोळी सोलापूरच्या दिशेने पसार झाली.

ही घटना खतरनाक होती. कारमध्ये चारजण होते व ते शुद्ध मराठीत बोलत होते, एवढंच जखमी पोतदार यांनी पोलिसांना सांगितलं. तब्बल साडेतेरा तोळे सोन्याची व किलोभर चांदीची लुट झाली होती. पाळत ठेऊन हा गेम वाजविण्यात आला होता. पोतदार हे रोज सकाळी जेऊरवरुन करजगी गावात दुचाकीवरुन येतात, याची या टोळीनं रेकी केली होती. त्यानंतर हे अपहरण नाट्य घडविण्यात आले होते. त्यानंतर अक्कलकोट दक्षिण पोलिसांची दोन व शहर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने हा तपास सुरु केला. असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांची कुंडली बाहेर निघाली. तांत्रिक तपास, त्या परिसरातील मोबाईल नंबर मिळवून नंतर त्यांच्या लोकेशनचा तपास सुरु झाला. अखेर हा तपास आला थेट अहिल्यानगरपर्यंत…

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून या दरोड्याचा समांतर तपास सुरू होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पावलस उर्फ मेहेर गायकवाड हा नगर जिल्ह्यातील खरवंडी कासार येथील कुख्यात आरोपी या लुटमारीत सहभागी असल्याची माहिती, पोलिसांना काढली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आत्माराम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक पाथर्डीत दाखल झाले. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या समन्वयाने खरवंडी कासार बीटचे पो. कॉ. आसाराम बटुळे व गृहरक्षक मिठू खेडकर यांची मदत घेऊन आरोपींचा शोध सुरू झाला.

गुरुवारी ४ जूनला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पावलस गायकवाड हा त्याच्या घरासमोर पाईपलाईन दुरुस्त करत असल्याचे पोलिसांना दिसले. ही संधी साधून पोलिसांनी पावलसला वेढा घातला. पावलस सोबत इतही तीन आरोपी होते. पोलिसांनी या सर्वांना वेढा घातला. या टोळीला शरण येण्याचे आवाहन पोलिसांनी केले. गोंधळलेल्या पावलसने सिनेस्टाईल प्रतिकार केला. कमरेला असणाऱ्या पिस्तूलमधून थेट आपल्याला धरायला येणाऱ्या पोलिसावर गोळीबार केला. अगदी काही सेंटीमिटरने गोळी चुकली आणि पोलिस स्वसंरक्षणार्थ थोडे मागे हाटले. याच संधीचा फायदा घेऊन पावलस आपल्या टोळीसह एका पांढऱ्या रंगाच्या एक्सयूव्ही कारमधून बीडच्या दिशेने फरार झाला. रात्री पावणेअकराच्या सुमारास हा सगळा थरार रंगला.

सोलापूरसह पाथर्डीचे पोलिस पथक रात्रीच्या अंधारामुळे माघारी फिरले. या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, हे आपल्या पथकांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आता नगरच्या पोलिसांकडून या टोळीचा शोध सुरु झाला. अखेर ९ जुनला पोलिसांनी पावलस सोबत गाडीतून पसार झालेल्या सुदाम बबन राठोड, इब्राहीम मंहमद सय्यद व कृष्णा उर्फ रंगा बाळु पवळे (सर्व रा. खरवंडी कासार) यांना जेरबंद केले. या टोळीचा म्होरक्या पावलस अजूनही फरार आहे.

या तिघांनाही ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या तिघांच्या तपासात अक्कलकोट तालुक्यातील सराफ लुटीचा गेम व पोलिसांवरील हल्ला नेमका कुणी व कसा केला, हे समजणार आहे. दरम्यान, या प्रकारानंतर खरवंडी कासार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेले हे गाव गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी जगतात, पाय रोवू लागले आहे. बनावट दारुविक्रीचे रॅकेट, लुटमारीचे रँकेट, दरोडा घालणाऱ्या टोळ्या, अशा सगळ्यांचे आश्रयस्थान म्हणून हे गाव आता बातम्यांत झळकू लागले आहे. गोव्याची बनावट दारुही या गावात काही दिवसांपूर्वी सापडली होती. या सगळ्या टोळ्याचा बंदोबस्त कधी होईल, असा सवाल आता विचारला जावू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button