Explained

Opration Tiger | वाकचौरे महायुतीत गेले तर एकटे लंके काय करतील?

राहत इंदोरींचा एक शेर आहे, वो बुलाती है मगर जाने का नही… आता हा शेर का आठवला, तर सध्याच्या मविआच्या परिस्थितीमुळे. मविआत सध्या फक्त काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे, जो महायुतीच्या विरोधात तग धरुन आहे. अन्यथा, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं काही खरं दिसत नाही. लढायला मावळेच शिल्लक नसल्यावर, ते लढाई तरी काय करणार… अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार गटाची अस्वस्थता वाढली. सुप्रीया सुळे व शरद पवारही अनेकदा महायुतीच्या नेत्यांचं गुणगाण करताना दिसले. त्यामुळे दुसऱ्या फळीतले रोहित पवार किंवा थेट जयंत पाटील हेही संभ्रमात अडकल्याचे दिसले. उलट जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी वेळेला महत्त्व देत, भाजपमध्ये दाखल होतं सत्तेत खुर्चीही मिळवली.

मामा जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले गेले. राज्याचं राजकारण, अनेकदा नगर जिल्ह्याच्या राजकीय प्याद्यांवर चालतं. किमान इतिहास तरी असंच सांगतो. आता हेच पहा ना, राज्यात ऑपरेशन टायगरची २०२२ पासून चर्चा सुरु आहे. परंतु प्रत्येक बातमीत येतात, ते शिर्डीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे. खा. वाकचौरे हे ठाकरे गटात असमाधानी आहेत, हे वारंवार दिसलंय. ते शिंदे गटात जातील, अशाही बातम्या आल्या. परंतु अद्याप त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळाला नाही. परंतु रविवारी पुन्हा हेच वाकचौरे राज्यभर बातम्यांत झळकले. कारण होतं, ठाकरे गटाची अनपेक्षित ठरलेली मिटींग…. या मिटींगला वाकचौरे पुन्हा अनुपस्थित राहिले.

पुन्हा म्हणजे, वाकचौरेंनी यापूर्वीही ठाकरे गटाच्या मिटींगला किंवा मेळाव्याला जाणं टाळलं होतं. रविवारी याच वाकचौरेंनी पुन्हा एकदा ठाकरे गटापासून चार हात लांब राहणं पसंत केलं. वाकचौरे ऑपरेशन टायगरला बळी पडलेत का? हा प्रश्न प्रसारमाध्यमांनी उचलला. अर्थात, नेहमीप्रमाणे वाकचौरेंनी स्वतः या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. परंतु त्यांच्या कुटुंबियांनी आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी, दिलेल्या वेगवेगळ्या स्टेटमेंटमुळे वाकचौरेंबाबतच्या शंका जास्त वाढल्या. यापूर्वी खा. लंके यांच्या शरद पवार गट सोडण्याच्या चर्चा सुरु होत्या. आता खा. वाकचौरे यांच्याबाबत त्या चर्चा सुरु झाल्या. जिल्ह्यातील दोन्ही मविआच्या खासदारांचं नेमकं काय चाललंय? आणि ते खरंच पक्ष सोडतील का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन फांगळ्या केल्या. त्यात शिंदे गट व ठाकरे गट तयार झाला. या पक्षफोडीत शिंदेंचं पारड जडच राहिलं. लोकसभा व त्यानंतरची विधानसभा या दोन्ही निवडणुकीत ठाकरे गटाकडे बोटावर मोजता येतील, एवढेच शिलेदार शिल्लक राहिले. आता याच शिल्लक सेनेतील शिलेदारांना पुन्हा एकदा फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरु झाले. ऑपरेशन टायगर हा शब्द पहिल्यांदा २०२२ मध्ये चर्चेत आला. या ऑपरेशन टायगरची धुरा अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आली. ठाकरे गटात असलेले बरेच आमदार शिवसेना शिंदे गटात आले.

काहींनी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पक्षांतर करुन आपली आमदारकी टिकवली. परंतु त्यापूर्वी लोकसभेला जिंकून आलेल्या ठाकरे गटाच्या ९ खासदारांवर शिंदे गटाची कायम नजर राहिली. या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर अजूनही सुरुच असल्याचं सांगितलं जातं. आता नऊ पैकी सहाच खासदार का? एक-दोघे का नको? याचं उत्तरही सोप्प आहे. नऊपैकी सहा म्हणजेच एक तृतीआंश खासदारांनी पक्षांतर केलं तर, पक्षांतरबंदी कायद्याचा धोका टळतो. त्यामुळे यायचं तर सहा खासदार घेऊन या, ही शिंदे गटाची अट आहे.

ठाकरे गटातील दोघे-चौघे आजही शिंदे गटांत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, परंतु सहाचा आकडा पूर्ण करायला अडचण येते, आणि ऑपरेशन टायगर थंडावतं. जून महिन्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु झाली. याच चर्चेनंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या शिलेदारांना सेफ ठेवण्यासाठी अचानक मुंबईत बैठक घेण्याचा प्लॅन आखला. १४ जूनला आपल्या गटाच्या सर्वच्या सर्व नऊ खासदारांना मातोश्रीवर बोलविण्यात आलं. परंतु या बैठकीला नऊपैकी फक्त चार खासदार उपस्थित राहिले.

ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि आपल्या शिर्डीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी या बैठकीला दांडी मारली. नऊपैकी फक्त चार खासदार मातोश्रीवर उपस्थित राहिल्याने प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा रंगल्या. परंतु लगेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तातडीने प्रेस काँन्फरन्स घेत, बैठकीला चार खासदार प्रत्य़क्ष व पाच खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा केला.

आम्ही सर्वजण एकजूट आहोत, हेही संजय राऊत यांनी सांगितलं. परंतु याच संजय राऊतांच्या शिर्डीतील गेल्या आठवड्यातील बैठकीलाही प्राँपर शिर्डीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे अनुपस्थितच होते. आठ-पंधरा दिवसांत पक्षाच्या दोन्ही बैठकांना गैरहजेरी लागल्याने खा. वाकचौरे प्रसारमाध्यमांच्या जास्त टार्गेटवर आले. काही बातम्यांचा हवाला घेतला, तर वाकचौरे यांच्या कुटुंबियांनी ते बाहेरगावी गेल्याचा दावा केला.

एकीकडे संजय राऊत वाकचौरे हे ऑनलाईन उपस्थित असल्याचं सांगत होते, तर स्वतः वाकचौरेंचं कुटुंब ते बाहेरगावी असल्याचं सांगतं होतं. या दोन वेगवेगळ्या उत्तरांनी चर्चा वाढल्या. वाकचौरे हे कोणत्याही क्षणी शिंदे गटात जातील, अशी सध्याची परिस्थिती आहे. परंतु याबाबत वाकचौरे यांनी स्वतः बोलणं मात्र टाळलंय.

खा. वाकचौरेंबाबत जशा पक्ष बदलाच्या चर्चा होतात, तशाच चर्चा नगर दक्षिणचे खा. निलेश लंके यांच्याबाबतही होतात. कधी लंके स्वतः काहीही होऊ शकतं म्हणतात, कधी विलिनीकरणाच्या चर्चात सहभागी होतात, तर कधी थेट विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त करतात. पुन्हा त्या चर्चेतून यू-टर्नही घेतात. लंकेंची हीच धरसोड वृत्ती पाहिली तर, ते कधीही अजित पवार गटांत जातील, अशा शंका येतात. नग जिल्ह्यातील दोन्ही खासदारांबाबतच्या या चर्चा सध्या नगर जिल्ह्यात सर्वात जास्त होताना दिसतात. पुढच्या लोकसभेला अजून अडीच वर्षे बाकी आहेत. परंतु तरीही ऑपरेशन टायगरच्या राज्यातील चर्चा पाहता, खा. वाकचौरेंबाबत कधीही भुकंप होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button