
कुठे आहेस? माळीवाड्यात, कोणत्या स्टँन्डवर उतरु ? माळीवाडा, कुठं यायचं? माळीवाड्याजवळ… असे प्रश्न व अशी उत्तरे नगर जिल्ह्यातील कित्येक नागरिकांनी आत्तापर्यंत विचारली असतील किंवा ऐकली असतील… माळीवाडा वेस ही नगरशी आन-बाण आणि शान. पण याच माळीवाड्यातील ऐतिहासीक माळीवाडा वेस सध्या चर्चेत आलीय. माळीवाडा येथे फुले दाम्पत्य यांचे भव्य स्मारक करण्यासाठी माळीवाडा वेस पाडण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र फुले दाम्पत्य स्मारक समितीने मध्यंतरी महापालिकेला दिले होते.
महापालिकेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर शहरातील इतिहास प्रेमींनी या विरोधात एकवटत वेस पाडण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर महापालिकेच्या सभेत दोन दिवसांपूर्वी ही वेस पाडण्याची पुन्हा आग्रही मागणी झाली. 57 नगरसेवकांच्या सह्या असणारे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले. आता ही वेस पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ही वेस पाडण्याची मागणी का होतेय? या वेशीचा इतिहास काय? एकंदरच हे प्रकरण काय? हेच आपण पाहणार आहोत..
नगर शहरातील माळीवाडा भागात महात्मा ज्यातीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकाचे काम नियोजित आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या विचारांचे उर्जास्थान शहरात रहावे, यासाठी त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा, स्मारक, वाचनालय असे सगळे नियोजित आहे. या स्मारकाच्या कामाला गती मिळावी म्हणून स्मारक समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही वेस स्थलांतरीत करणे किंवा पाडण्यासाठी 12 डिसेंबर 2025 रोजी महापालिकेने जाहीर प्रकटन दिले होते.
परंतु त्यावर अनेक इतिहासप्रेमी व संस्था, संघटनांनी आक्षेप घेतला. विरोध वाढल्यानंतर महापालिकेने हा निर्णय रद्द केला. आता पुन्हा ही वेस पाडण्याची मागणी जोर धरु लागलीय. दोन दिवसांपासून 57 नगरसेवकांनी ही वेस पाडण्याची आग्रही मागणी मनपाच्या सभेत केली. त्यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला. अंदाजपत्रकाच्या सभेत माळीवाडा वेशीचा विषय आल्यानंतर त्यावर आक्रमक चर्चा झाली. हा विषय वादग्रस्त होण्याची शक्यता दिसू लागताच, या विषयावर विशेष महासभेत निर्णय घेण्याचे ठरले.
या वेशीचा इतिहास फार जुना आहे. 1490 मध्ये मालिक अहमद निजामशहा याने हे शहर वसवले. त्यानंतर मुघल सरदार सर्जेखान याने शहराच्या संरक्षणासाठी 1631 मध्ये या शहराभोवती 11 वेशी उभारल्या. अहमदनगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून, या वेशी ओळखल्या जायच्या. जकात, सैन्य, दळणवळण, व्यापार या सगळ्या गोष्टींवर लक्ष्य ठेवण्यासाठी या वेशींचा वापर व्हायचा. पूर्वेला झेंडा दरवाजा म्हणजेच झेंडीगेट, दक्षिणेला माळीवाड वेस, पश्चिमेला नालेगाव वेस, उत्तरेला दिल्ली दरवाजा, अशा मुख्य चार वेशींसोबत बंगाल दरवाजा, फर्ग्युसन गेट, नेप्ती गेट, तोफखाना, सर्जेपुरा, किंग्जगेट असे अकरा दरवाजे शहराला होते.
1803 मध्ये या वेशीवरच युद्धही झाले होते. मराठा सरदार महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात नगर होते. त्यावेळी इंग्रज सेनापती जनरल आर्थर वेलस्ली याच्या अधिपत्याखाली इंग्रजांनी नगरवर हल्ला केला. वाळकीमार्गे इंग्रजांचे सैन्य नगरला आले. दिल्लीगेट वेशीला मराठ्यांचा किल्ला समजून इंग्रजांच्या सैन्याने येथे जोरदार हल्ला चढवला. मराठ्यांकडे अरबी सैन्याची तुकडी होती. या तुकडीने इंग्रजांवर जोरदार प्रतिहल्ला केला. अनेक ब्रिटीश अधिकारी व सैन्य याच माळीवाडा वेशीजवळ मारले गेले.
त्यांची नावेही या माळीवाडा वेशीच्या स्तंभावर कोरली गेली आहेत. त्यानंतर 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात नगर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावेही याच माळीवाडा वेशीच्या स्तंभावर तत्कालीन महापालिकेने कोरली होती. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही या वेशीचे महत्त्व आबाधित राहिले. 1 जून 1948 रोजी महाराष्ट्रातील पहिली एसटी बस याच माळीवाडा वेशीवरुन धावली. माळीवाडा वेशीवरुन ही बस पुण्याला गेली. त्यावेळी वेशीजवळच्या वडाच्या झाडालाच या एसटी घंटा बांधण्यात आली होती. पहिल्या नगर-पुणे एसटी बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे हे सुद्धा माळीवाडा वेशीजवळच राहतात. या वेशीसमोर अनेक ऐतिहासिक सभाही झाल्या.
माळीवाडा वेस, दिल्ली दरवाजाला पडण्याची तयारी यापूर्वीही झाली होती. २०१० मध्ये माळीवाडा वेस, तर २०१८ मध्ये दिल्ली दरवाजावर बुलडोझर चालवला जाणार होता. परंतु त्यानंतर इतिहासप्रेमी व सुजाण नागरिकांनी त्या बुलडोझरला ब्रेक लावला. अन् दोन्ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा मनसुबा धुळीस मिळाला. परंतु आता ही वेस जर दळणवळण व अन्य कारणांसाठी अडचणच होत असेल, तर ती पाडण्याचा आग्रह सुरु झालाय. आता यावर विशेष महासभा घेण्यात येणार असल्याचे समजते.






हे कोण “इतिहासप्रेमी” आहेत, ज्यांना पराभवाचे इतिहास सांभाळायचे आहेत? आणि कोण “सुजाण नागरिक” आहेत ज्यांना नगरला आशिया खंडातील सगळ्यात मोठं खेडंच ठेवायचं आहे?
वास्तविक इस्लामिक आक्रमकांनी नगरला कोट बांधून बारा बाजूकडून बारा वेशी बनवल्या होत्या. आता तो “ऐतिहासिक” म्हणवला जाणारा कोट राहिलेला नाही आणि बाकीचे नऊ दरवाजेही उखडून टाकले गेलेले आहेत. शिल्लक दिल्ली दरवाजा आणि माळीवाडा वेस शहराच्या विकास आणि विस्ताराला अडचणीच्या ठरत आहेत. जुन्या महापालिका इमारतीजवळ एक पडझड झालेले गेट सुद्धा अनाठायी धूड सांभाळलं गेलं आहे..
शहराचा उत्तम विकास हवा असेल तर दिल्हीली गेट, माळीवाडा वेस, ते अनाठायी गेट आणि अडचणीची ठरणारी व शिल्लक राहिलेली तिन्ही गेट व अन्य बांधकामे भुईसपाट करावीत, त्याला कोणीही विरोध करु नये.. तर नगर ला शहर म्हणून भविष्य आहे..