Latest

अहिल्यानगर महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी ! जाणून घ्या कोण झाले तुमच्या भागात नगरसेवक एका क्लिकवर

अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निवडणुकीत पुन्हा एकदा माजी खा. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप या जोडगोळीने कमाल केली. खा. निलेश लंके यांच्या शरद पवार गटाचा एकही नगरसेवक निवडून आणता आला नसल्याचे दिसत आहे. हे खा. निलेश लंके यांचे सर्वात मोठे अपयश मानले जात आहे. शक्तीप्रदर्शन व लागोपाठ सभा घेऊनही महाविकास आघाडीचा मोठा पराभव पहावा लागला.

प्रभाग 1 मध्ये महायुतीचीच जादू संपत बारस्कर, दिपाली बारस्कर बोरुडे आणि ढवण विजयी

अहिल्यानगर महानगर पालिकेसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये महायुतीने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जोरदार कामगिरी केली. येथून राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, सागर बोरूडे आणि दीपाली बारस्कर हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या शारदा दिगंबर ढवण यांनी एका जागेवर विजय मिळवला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेननंतर अहिल्यानगर मनपाची निवडणूक होत असल्याने, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. त्यानंतर साधारणः 11 वाजेपर्यंत अनेक प्रभागांचा कौल समोर येऊ लागला.

प्रभाग 2 मध्येही राष्ट्रवादी- भाजपचाच जोर तवले, पवार त्र्यंबके, वारे विजयी

अत्यंत चुरशीच्या बनविल्या गेलेल्या प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने ताकद दाखवली. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा ताब्यात घेतल्या. प्रभाग २ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच प्राबल्य पहायला मिळाले. येथे दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीकडून महेश तवले आणि संध्या पवार विजयी झाले. तर भाजपकडून रोशनी त्र्यिंबके आणि निखील वारे यांनी विजयाचा गुलाल उधळला. आजच्या निकालांनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष सुरू केला असून, उर्वरित प्रभागांतील निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग 3 मधून तीन पक्षांना मिळाली पसंती गाडे, बोरकर, गंधे विजयी

प्रभाग क्रमांक तीनमधून मुख्य तिन्ही पक्षांनी आपले खाते उघडले. या निवडणुकीत प्रभाग 3 अ मधून शिवसेना ठाकरे गटाचे योगीराज गाडे, ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्योती गाडे, क मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गौरी बोरकर तर ड मधून भाजपचे ऋग्वेद गंधे हे निवडून आले. या प्रभागात राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप व ठाकरे गट असा संमिश्र निकाल लागला. या प्रभागाच पहिल्यापासून चांगलीच चुरस पहायला मिळाली. परंतु गाडे, बोरकर व गंधे यांनी विजयाचा जादूई आकडा गाठला.

प्रभाग 4 मध्ये काँग्रेस-एमआयएमला सारखाच कौल प्रत्येकी दोन उमेदवार विजयी

मुस्लिमबहुल प्रभाग असलेल्या प्रभाग चारमध्ये रंगतदार निवडणूक झाली. या प्रभागात भाजप-राष्ट्रवादी युती आणि शिवसेना शिंदे गट यांनी उमेदवारच दिले नव्हते. येथे काँग्रेस आणि एमआयएम या पक्षांत प्रमुख लढत झाली. तेथील मतदारांनी या दोघांचेही प्रत्येकी दोन उमेदवार निवडून दिले आहेत. तरुण वर्ग आणि बहुतांश महिला एमआयएमसोबत तर ज्येष्ठांनी काँग्रेससोबत जाणे पसंत केल्याचे दिसले. या प्रभागात एमआयएमचे नेतृत्व करणाऱ्या माजी नगरसेवक समद खान यांना पराभव पहावा लागला. प्रभाग चार अ मध्ये एमआयएमच्या शेख शेहनाज खालीद, प्रभाग चार ब मध्ये एमआयएमचे सय्यद शाहबाज अहमद, प्रभाच चार क मध्ये काँग्रेसच्या खान मिनाज जाफर, तर प्रभाग चार ड मध्ये काँग्रेसचे खान शम्स समिउल्ला हे विजयी झाले. प्रखर भाषणांनी चर्चेत आलेल्या एमआयएमच्या समद वाहब खान यांना सुमारे दीडशे मतांनी पराभव स्विकारावा लागला.

प्रभाग 5 महायुतीचाच भोसले, जाधव गंभीर, पंजाबी दणदणीत विजयी

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप युतीची विजयी घोडदौड सुरुच आहे. सुरुवातीच्या कालानुसार महापालिकेत महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. प्रभाग पाचमध्येही महायुतीच्या चारही उमेदवारांनी दिमाखदार विजय मिळवला. प्रभाग पाच अ मधून राष्ट्रवादीच्या काजल भोसले, प्रभाग पाच ब मधून भाजपचे धनंजय जाधव, प्रभाग पाच क मधून राष्ट्रवादीच्या हरप्रीतकौर गंभीर आणि प्रभाग पाच ड मधून राष्ट्रवादीचे मोहित पंजाबी हे विजयी झाले. ही निवडणूक चांगलीच चुरशीची होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. परंतु निकालानंतर पुन्हा एकदा आ. संग्राम जगताप व माजी खा.सुजय विखे पाटील यांची जादू या प्रभागात चालल्याचे स्पष्ट दिसले.

प्रभाग 6 मध्ये कमळाचाच दबदबा दोन बिनविरोधनंतर इतर दोन नगरसेवकही विजयी

अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. मतदानापूर्वीच भाजपने तीन तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दोन जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या. शहरातील प्रभाग सहा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. याच प्रभागातील ब जागेवरुन सोनाबाई तायगा शिंदे व ड जागेवरुन करण कराळे हे बिनविरोध निवडून आले होते. आजच्या मतमोजणीत प्रभाग सहा अ मधून भाजपचे मनोज दुल्लम हे निवडून आले. त्यांनी अपक्ष असलेल्या अमित खामकर यांचा पराभव केला. तर प्रभाग सहा क मधून भाजपच्या सुनीता कुलकर्णी यांनी बाजी मारली. त्यांनी शरद पवार पक्षाच्या शोभा भिंगारदिवे व शिवसेनेच्या शांता शिंदे यांचा पराभव केला. या प्रभागातील चारही नगसेवक भाजपचे झाले. भाजपने पुन्हा एकदा या प्रभागावर आपलीच पकड असल्याचे दाखवून दिले.

प्रभाग 7 मध्ये भाजपचा व्हाईट वाँश बोरुडे, सानप, ताठे, वाकळे यांची मनपात एन्ट्री

अहिल्यानगर महानगर पालिकेत भाजपने दमदार इन्ट्री केली. गेल्यावेळीपेक्षा जास्त जागा निवडून आणून भाजप हा मनपातील क्रमांक दोनचा पक्ष ठरला. माजी खा. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी शहरावरील आपली पकड पुन्हा एकदा मजबूत केली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग सहा व प्रभाग सातमध्ये भाजपने सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले. प्रभाग सात ब मधील पुष्पा बोरुडे या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत उर्वरीत तीन उमेदवारांनीही विजय मिळवला. प्रभाग सात अ मधून भाजपच्या वर्षा सानप, प्रभाग सात क मधून भाजपच्या वंदना ताठे, प्रभाग सात ड मधून भाजपचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिमाखदार विजय मिळवला. माजी महापौरांनी या निवडणुकीत सुमारे तीन हजारांचे मताधिक्य मिळवले.

प्रभाग 8 मध्ये भाजप-राष्ट्रवादीला तीन तर शिवसेनेला एका जागेवर विजय

अहिल्यानगर महानगर पालिकेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप युतीने आपली दिमाखदार कामगीरी कायम ठेवली. शहरातील प्रभाग आठमध्येही राष्ट्रवादी व भाजपने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. या प्रभागात राष्ट्रवादीचा एक तर भाजपच्या एक उमेदवाराने विजय मिळवला. शिवसेनेचाही एक उमेदवार निवडून आला. प्रभाग आठ ड मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कुमार वाकळे हे बिनविरोध निवडून आले होते. आजच्या मतमोजणीत प्रभाग आठ अ मधून राष्ट्रवादीच्या सुनीता भिंगारदिवे, प्रभाग आठ ब मधून भाजपच्या आशा कातोरे, प्रभाग आठ क मधून शिवसेनेचे नवनाथ कातोरे हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबासाहेब नागरगोजे यांचा अवघ्या 44 मतांनी पराभव केला.

प्रभाग 9 मध्ये बाणाचा नेम परफेक्ट लागला शेंडगे, दातरंगे, नळकांडे, लोंढे विजयी

अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीच्या युतीची घोडदौड जवळपास सगळ्याच प्रभागांत दिसली. विरोधकांनी जे प्रभाग प्रतिष्ठेचे केले होते, त्या प्रभागातही अगदी व्हाईट वाँश देण्यात भाजप-राष्ट्रवादीला यश आले. प्रभाग क्रमाक नऊमध्ये मात्र शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले. तसेच भाजपचे कमळही एका जागेवर फुलले. प्रभाग नऊ अ मध्ये संजय शेंडगे, प्रभा नऊ ब मध्ये रुपाली दातरंगे, प्रभाग नऊ क मध्ये वैशाली नळकांडे हे तीन उमेदवार विजयी झाले. प्रभाग नऊ मधील ड जागेवर मात्र भाजपचे महेश लोंढे हे विजयी झाले. या प्रभागाच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष्य लागले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या प्रभागात महेश लोंढेंच्या रुपाने भाजपने खाते उघडले.

प्रभाग 10 मध्ये फुलले भाजपचे कमळ छिंदम, ढोणे, जाधव, मुर्तडकर विजयी

अहिल्यानगर मनपा निवडणुकीत प्रभाग 10 मध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी विजय मिळवला. प्रभाग 10 अ मधून बसपाच्या श्रीपाद छिंदम यांनी विजय मिळवला. बाकीच्या तिन्ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्या. प्रभाग 10 ब मधून शीतल ढोणे, प्रभाग 10 क मधून मयुरी जाधव, प्रभाग 10 ड मधून सागर मुर्तडकर यांनी दणदणीत विजय मिळवला. सागर मुर्तडकर यांचा विजय हा भाजपसाठी महत्त्वाचा ठरणारा होता. या प्रभागातील निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. याच प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने आपल्या तिन्ही दिग्गज उमेदवारांचा विजय साकारला.

प्रभाग 11 मध्ये दिग्गजांचा विजय कवडे, गेणप्पा, डागवाले, लोंढे मनपात जाणार

प्रभाग 11 ची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. या प्रभागात भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, तर शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले. या प्रभागात भाजपच्या दिप्ती सुवेंद्र गांधी यांचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेच्या सुनीता गेणप्पा यांनी त्यांचा 98 मतांनी पराभव केला. प्रभाग अकरा अ मधून उमेश कवडे, प्रभाग अकरा ब मधून सुनीता गेणप्पा, प्रभाग अकरा क मधून आशा डागवाले, प्रभाग अकरा ड मधून सुभाष लोंढे यांनी बाजी मारली. भाजपच्या विकास वाघ यांनाही पराभवाला समोरे जावे लागले. शिवसेनेच्या दोन दिग्गजांनी या प्रभागात आपला विजय साकार केला.

प्रभाग 12 मध्ये धनुष्यबाणाचा नेम लागला बोराटे, कदम कावरे, लोखंडे चारही उमेदवार विजयी

प्रभाग 12 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे चारही उमेदवार निवडून आले. प्रभाग 12 हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या प्रभागात बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगल लोखंडे व सुरेखा कदम या चारही उमेदवारांनी येथे विजय मिळवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची समजली जात होती. मात्र शिवसेनेने आपला बालेकिल्ला असलेला या प्रभागात विरोधकांना व्हाईट वाँश दिला.

प्रभाग 13 मध्ये वाजली घड्याळाची टिकटिक बनसोडे, पडोळे, शेटीया, घुले चारही उमेदवार विजयी

प्रभाग 13 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चारही उमेदवार विजयी झाले. प्रभाग 13 अ मधून सुरेश बनसोडे, प्रभाग 13 ब मधून सुजाता पडोळे, प्रभाग 13 क मधून अनिता शेटीया आणि प्रभाग 13 ड मधून अविनाश घुले यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. हा प्रभाग पूर्वीपासून आ. संग्राम जगताप यांचा बालेकिल्ला समजला जात होता. निकालानंतर या प्रभागाच घड्याळाची टिकटीक अगदी जोरात वाजली.

प्रभाग 14 पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच भागानगरे, फुलसौंदर, चोपडा, भोसले विजयी

अहिल्यानगर महानगर पालिकेचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे विखे-जगतापांची गाडी सुसाट पळाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग चौदामध्ये राष्ट्रवादीचे चारही उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले. प्रभाग 14 अ मधून प्रकाश भागानगरे हे यापूर्वीच बिनविरोध झाले होते. प्रभाग 14 ब मधून राष्ट्रवादीच्या सुनीता फुलसौंदर, प्रभाग चौदा क मधून राष्ट्रवादीच्या मीना चोपडा, प्रभाग 14 ड मधून राष्ट्रवादीचे गणेश भोसले हे विजयी झाले. सर्वात जास्त चर्चा झाली ती गणेश भोसले यांची… गणेश भोसले यांनी तब्बल साडेसहा हजार मतांनी विजय मिळवला. त्यांना 8488 मते मिळाली. तर विरोधी शिवसेनेचे दिलीप झिंजुर्डे यांना 1888 मतांवर समाधान मानावे लागले. या प्रभागात आ. संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा आपली पकड सिद्ध केली.

प्रभाग 15 मध्ये महायुतीची दमदार एन्ट्री भाजप-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला गव्हाळे, गाडळकर काळे, मोहितेंचा विजय

अहिल्यानगर महानगर पालिकेचा निकाल लागला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या प्रभाग 15 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. प्रभाग 15 अ मधून पोर्णिमा गव्हाणे, प्रभाग 15 ब मधून दत्ता गाडळकर, प्रभाग 15 क मधून गितांजली काळे व प्रभाग 15 ड मधून सुजय मोहिते यांनी बाजी मारली. शिवेसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांचा या प्रभागात धक्कादायक पराभव झाला. भाजपचे तरुण उमेदवार सुजय मोहिते यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. या प्रभागात माजी खा. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांची जादू चालल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

प्रभाग 16 मध्ये कमळ- घड्याळ सुसाट कांबळे, काकडे, पठारे, येवलेंचा दिमाखदार विजय

संपूर्ण शहराचे लक्ष्य लागलेल्या केडगाव उपनगरातील प्रभाग 16 मध्ये राष्ट्रवादी व भाजपने दिमाखदार विजय मिळवला. या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. प्रभाग 16 अ मध्ये सुनीता कांबळे, प्रभाग 16 ब मध्ये वर्षा काकडे, प्रभाग 16 क मध्ये विजय पठारे आणि प्रभाग 16 ड मध्ये ज्ञानेश्वर येवले यांनी बाजी मारली. या प्रभागात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कांबळे व काकडे या दोन्ही महिला उमेदवार विजयी झाले. शिवाय याच प्रभागात भाजपचे पठारे व येवले हे दोन्ही युवा नेते विजयी झाले. या प्रभागात आ. संग्राम जगताप व माजी खा. सुजय विखे पाटील यांची जादू पुन्हा एकदा चालल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. या प्रभागातील निवडणुका चुरशीच्या होतील असे पूर्वीपासून सांगितले जात होते. परंतु अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी व भाजपने या प्रभागावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

प्रभाग 17 मध्ये विखे-जगताप जादू चालली बांगरे, लोंढे, दोन्ही कोतकर विजयी

संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या केडगाव उपनगरातील प्रभाग 17 चा निकाल जाहीर झाला. या प्रभागात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला. प्रभाग 17 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मयूर बांगरे, प्रभाग 17 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आश्विनी लोंढे, प्रभाग 17 क मधून भाजपच्या कमला कोतकर व प्रभाग 17 ड मधून भाजपचे मनोज कोतकर यांनी बाजी मारली. या प्रभागात मनोज कोतकर यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. माजी खा. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांनी हा प्रभाग प्रतिष्ठेचा केला होता. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्या प्रकरणाचीही चर्चा रंगली होती. परंतु त्यानंतर पुन्हा कोतकर अँक्टीव्ह झाल्याचे सांगितले गेले. परंतु निकालानंतर विखे-जगताप या जोडगोळीनेच येथे कमाल केल्याचे दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button