Explained : अहिल्यानगर महानगर पालिका निवडणूक जशी महायुतीसाठी महत्त्वाची होती, तशीच ती महाविकास आघाडीसाठीही महत्त्वाची होती. पण या निवडणुकीच्या निकालानं, महाविकास आघाडीला थेट अस्तित्वाच्या लढाईपर्यंत नेलंय. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभव पहावा लागलाय. आता या निवडणुकीनंतर चर्चा सुरु झाली ती, महापौर पदाची…
स्वीकृत आणि सभापतींच्या नावाची… या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाल्यानंतर महापौर पदासाठी कमी स्पर्धा राहिल, अशा शक्यता होत्या. परंतु या शक्यताही आता मावळताना दिसत आहेत. महापौर कोण? स्वीकृत कोण? सभापती कोण? या प्रश्नांपेक्षा महापौर भाजपचा की राष्ट्रवादीचा? हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या नगरकारांना पडलाय. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात…
हे पण वाचा : अहिल्यानगर मनपातील सर्व विजयी उमेदवारांची यादी ! जाणून घ्या एका क्लिकवर
अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीत, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं नेत्रदीपक यश मिळवलं. 68 पैकी 52 जागांवर त्यांचे नगरसेवक निवडून आले. माजी खा. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप, यांच्या विकासात्मक कामाला जनतेनं भरभरुन प्रतिसाद दिला. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला. या दोन्ही नेत्यांनी साधारणः समसमान जागा जिंकल्या.
यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत
एकत्रित शिवसेनेला २४,
एकत्रित राष्ट्रवादीला १८,
भाजपला १४,
काँग्रेसला ५,
बहुजन समाज पक्षाला ४,
समाजवादी पक्षाला १ व
अपक्ष २ असे बलाबल होते.
त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले. अजित पवार राष्ट्रवादीने यंदा २७ जागा जिंकून ९ वाढीव जागा खेचून आणल्या. भाजपने 11 वाढीव जागा घेत 25 उमेदवार निवडून आणले. यंदा शिंदे सेनेला 10 व ठाकरे सेनेला 1 जागा मिळाली. दोन्ही सेना मिळून 13 जागांचे नुकसान झाले. काँग्रेसला अवघ्या 2 जागा मिळाल्या. त्यांचे 3 जागांचे नुकसान झाले. बहुजन समाज पक्षाला 1 जागा मिळाल्याने त्यांचे तीन जागांचे नुकसान झाले. मनपात पहिल्यांदाच एमआयएमची दोन जागा जिंकून एन्ट्री झाली.
हे पण वाचा : घरात जास्तीत जास्त किती कॅश ठेवता येते? जाणून घ्या नियम अन्यथा होईल तुरुंगवास
महानगर पालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीच्या युतीच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या असल्या तरी, राष्ट्रवादीने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या. त्याखालोखाल भाजपने 25 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने 32 जागा लढवून 27, तर भाजपने 29 जागा लढवून 25 जागांवर विजय मिळवला. निकालानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. संग्राम जगताप व माजी खा. सुजय विखे यांना पत्रकारांनी महापौर कुणाचा? याबाबत विचारले. त्यावेळी पालकमंत्री विखेंनी महायुतीचाच महापौर होईल परंतु भाजपचा की राष्ट्रवादीचा, हे ठरले नसल्याचे सांगितले. परंतु त्यानंतर एका प्रश्नाच्या बाईटला माजी खा. सुजय विखेनी दिलेलं उत्तर ऐकून पुन्हा चर्चा वाढल्या.
सुजय विखे पाटील म्हणाले की, “निवडणुकीच्या आधीच आ. संग्राम जगताप व आमच्यात सगळं ठरलंय. आम्ही दोघांनी बंद लिफाफ्यात हे सगळं ठरवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही हे दिलंय. आम्ही दोघांनीही महापौर, सगळ्या समित्या, स्वीकृत नगरसेवक कुणाला किती? हे सगळं ठरवलंय. वेळ आल्यावर हे सगळं तुम्हाला समजेलच…”
हे पण वाचा : गुलालाचे डंपर, फडणवीसांचा फोन… AMC निकालाची इनसाईड स्टोरी
महापौर, सगळ्या समीत्यांचे सभापती, स्वीकृतचे वाटप हे सगळं झाल्याचं, विखेंनी सांगितलं. त्यानंतर चर्चांना उधाण आलं. शक्यतांची बेरीज-वजाबाकी सुरु झाली. सर्वाधिक जागा असल्यानं महापौरपद राष्ट्रवादीकडेच जाण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली. भाजपला राष्ट्रवादीपेक्षा अवघ्या दोनच जागा कमी आहेत.
त्यामुळे राष्ट्रवादी महापौर पद घेऊन त्या बदल्यात भाजपला उपमहापौर पद व स्थायी समितीचे सभापतिपद देऊ शकते, असेही अंदाज बांधले गेले. मात्र, भाजपकडूनही महापौर पदावर दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे व त्यानंतर अडीच वर्षे भाजपला महापौर पद अशी वाटणी होऊ शकते. मात्र, अद्याप महापौर पदाचे आरक्षण शासनाकडून काढलेले नसल्याने महापौर पदासाठी इच्छुकांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला विरोधी पक्ष नेते पद द्यावे लागणार आहे.
हे पण वाचा : D-Mart चा फूल फॉर्म तुम्हाला माहित आहे ? मग पहाच..
आता कुणाची नावे चर्चेत आहेत, तेही आपण पाहू…
राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षात महापौरपदाचे अनेक प्रबळ दावेदार आहेत. महापौरपदासाठीची आरक्षण सोडत अद्याप जाहीर न झाल्याने या दावेदारांना सध्या तरी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपत बारस्कर, गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे हे महापौरपदाचे दावेदार आहेत. तर भाजपचे निखिल वारे, धनंजय जाधव, बाबा वाकळे हेही प्रबळ दावेदार आहेत.
हे पद पुन्हा महिला राखीव झाले,
तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गीतांजली काळे, दीपाली बारस्कर, ज्योती गाडे, गौरी बोरकर, सुजाता पडोळे या दावेदार असू शकतात.
भाजपकडून शारदा ढवण, वंदना ताठे, पुष्पा बोरुडे, आशाबाई कातोरे या दावेदार असतील.
याशिवाय जे नगरसेवक जास्त लीडने विजयी झालेत त्यांना सभापतीपदाचीही संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे. शिवाय ज्या दिग्गजांना शब्द देऊन थांबविण्यात आलेय, त्यांची स्वीकृतसाठीही वर्णी लागणार आहे.
हे पण वाचा : सावधान..! नगरमध्ये काही हजार कोटींचा घोटाळा, एसपींनी सांगितली तपासाची दिशा…





