
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूममधून तब्बल २४ गठ्ठे शासकीय कागदपत्रांचे गायब झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मंडळी, जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्ड रूममधून सन २०२१ आणि २०२२ या कालावधीतील एमएलसी, ओपीडी आणि एक्स-रेशी संबंधित जुने रेकॉर्ड चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण या कथित चोरीपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, अनेक वर्षांचे रेकॉर्ड त्या कक्षात असताना नेमके २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांतीलच रेकॉर्ड का गायब झाले? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, रेकॉर्ड रूमची मागील खिडकी उचकटून चोरी करण्यात आली. मात्र, पोलिस पंचनामा होण्यापूर्वीच त्या ठिकाणी घाईघाईने बांधकाम करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संभाव्य पुरावे नष्ट झाले का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय रेकॉर्ड रूमच्या मागील बाजूस भिंत, गेट आणि सुरक्षा व्यवस्था असताना चोर आत कसा पोहोचला? आणि तब्बल २४ गठ्ठे कागदपत्रे घेऊन बाहेर कसा गेला? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





