
२१ डिसेंबर २०२५ ला जेजूरी गडावरील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ होता, तेथे लागलेल्या आगीचा… आता ही आग का लागली, याचं कारण त्याहून जास्त धक्कादायक होतं. जेजूरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल त्या दिवशी होता. त्याच निकालाच्या जल्लोषात उधळलेल्या भंडाऱ्याला अर्थात हळदीला आग लागली. या आगीत नवनिर्वाचीत नगरसेवकांसह तब्बल २० जण गंभीर भाजले. आनंदाचं वातावरण काही मिनिटांत दुःखात बदललं. ही आग एवढी भडकली की, ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ही घटना पहिल्यांदाच घडली असली तरी, ती अत्यंत भयानक होती. भंडाऱ्याला आग का लागली? हे या घटनेपेक्षा जास्त भयानक होतं. तर, उधळलेल्या भंडाऱ्यात काही केमिकलचं मिश्रण होतं.
तो भंडारा शुद्ध नसल्याने त्याने पेट घेतला अन् ही भयंकर घटना घडली. केमिकलयुक्त भंडाऱ्याच्या याच मुद्यावर सत्ताधारी भाजपचे श्रीगोंद्याचे आ. विक्रम पाचपुते नंतर आक्रमक झाले. भंडाऱ्यातील रासायनिक भेसळीवर त्यांनी बोट ठेवले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेत त्यांनी एक विशेष निवेदन दिले. याच निवेदनानंतर शुद्ध हळद व भंडारा, हे मुद्दे चर्चेत आले. जेजूरीचे खंडेराया, त्यांना उधळली गेलेली केमिकलयुक्त हळद, त्या हळदीला लागलेली आग आणि आ. पाचपुतेंचा प्रश्न… हे सगळं विचार करायला लावणारं होतं. आ. पाचपुते यांनी उचलेला मुद्दा हा फक्त श्रद्धेचा नव्हता तर, शुद्ध श्रद्धेचाही होता. प्रत्येकाला विचार करायला लावणारा होता. ही हळद आणि त्याची शुद्धता, हाच मुद्दा आपण आज समजून घेणार आहोत…
मित्रांनो, आ. पाचपुतेंचा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर, अगोदर जेजूर गडावर घडलेली घटना समजून घ्यावी लागेल. त्याचं झालं असं, की गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जेजूरी नगरपरिषदेचा निकाल लागला. त्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जयदीप बारभाई नगरध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. अजित पवार पक्षाने तब्बल १७ जागांवर विजय मिळवला होता. एवढा मोठा विजय मिळाल्यावर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जेजूरीत भव्य मिरवणूक काढली. मल्हार नाट्यगृहात मतमोजणी झाल्यावर तेथूनच या मिरवणुकीला सुरुवात झाली. विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले.
दुपारी तीनची वेळ होती. जेजुरी गडाच्या ऐतिहासिक कमानीजवळ मिरवणूक पोहोचली. तेथे गडाच्या पायरीवर कापूर जाळण्यात आला. त्याच वेळी जळत्या कापुरावर मोठ्या प्रमाणात भंडारा पडल्याने अचानक मोठा स्फोट झाला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. भंडाऱ्याचा भडका उडाला. या आगीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे तसेच प्रभाग क्र. 5 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वरूपा खोमणे भाजल्या. याशिवाय तब्बल २० जण गंभीर जखमी झाले. ही घटना जेवढी धक्कादायक होती, तेवढीच गांभीर्याने विचार करायला लावणारी होती.
ही आग का लागली? तर पेटलेल्या कापूरावर भंडारा पडला म्हणून… आता भंडाऱ्याने पेट का घेतला? तर त्यात केमिकल असल्यामुळे… आगीत जखमी झालेल्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु हा प्रकार फक्त एक दुर्घटना म्हणून चर्चीला गेला. घटनेच्या मुळापर्यंत कुणीच गेलं नाही.
हाच मुद्दा, हाच मुद्दा तब्बल दीड वर्षांनी श्रीगोंद्याचे आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी उचलला. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, त्यांनी अन्न व औषध प्रशासनानाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेत त्यांना एक निवेदन दिले. निवेदन होते, अर्थातच भंडाऱ्याच्या शुद्धतेचे… कायद्याचा विचार केला तर, भंडारा म्हणजे शुद्ध हळद हे कुठेही नमूद नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन जेजूरी गडावर भेसळयुक्त हळद भंडारा म्हणून विकली जाते. हे कित्येक वर्षांपासून सुरु आहे. या भंडाऱ्यात अनेक केमिकल, रंग व ज्वलनशील पदार्थ असतात. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका पोहोचतोच परंतु तो ज्वलनशील असल्याने, अपघाताचा धोकाही वाढतो.
हेच आ. पाचपुतेंनी संपूर्ण राज्याच्या लक्षात आणून दिले. जेजूरी गडावर घडलेल्या दुर्घटनेचा दाखला देत, आ. पाचपुते यांनी भेसळयुक्त भंडाऱ्याबाबत आक्रमकता दाखवली. सध्या अन्न व औषध प्रशासनाकडे भंडारा’ म्हणजे नेमकं काय, याची कोणतीही ठोस किंवा कायदेशीर व्याख्या स्पष्ट नाही. कायद्यात भंडारा म्हणजे ‘हळदच’ असे कुठेही नमूद न केल्याचा गैरफायदा काही लोक घेताहेत, असा आ. पाचपुतेंचा आरोप होता. व्यावसायिक देवस्थान परिसरात रासायनिक रंग आणि ज्वलनशील रसायने मिसळलेल्या भंडाऱ्याची सर्रास विक्री करत आहेत.
एफडीएकडे अधिकृत व्याख्या नसल्यामुळे अशा भेसळ करणाऱ्यांवर आणि बनावट भंडारा विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करताना प्रशासनाला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकदा का भंडारा म्हणजे शुद्ध हळद, असा कायद्यात उल्लेख आला, तर या भेसळीला लगाम लावता येतो, असं आ. पाचपुतेंचं म्हणणं होतं.
आ. विक्रम पाचपुते अहिल्यानगर लाईव्ह २४ शी बोलताना म्हणाले की, “मी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेय. राज्यातील अनेक मंदीरात विशेषतः खंडोबाच्या मंदिरात हळदीचा भंडारा म्हणून वापर होतो. मात्र अलीकडच्या काळात या भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. याचा थेट तोटा निष्पाप भाविकांना होतो. आमच्या धार्मिक श्रद्धेवरही याचा वाईट परिणाम होतो.
या संदर्भात आमच्या वेळोवेळी बैठका झाल्या. भंडाऱ्याची ज्या वेळेस गडावर उधळण होते, त्यावेळी तो उडणारा भंडारा आपल्या श्वासातून शरीरात जातो. पूर्वीपासून भंडारा म्हणून शुद्ध हळदच विकली जात होती. पुढेही हळदच भंडारा म्हणून विकली गेली पाहिजे, या मानसिकतेचे आम्ही सर्वजण आहोत. म्हणूनच लवकरात लवकर ‘भंडारा म्हणजे हळदच’ हे कायद्यामध्ये नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे.” आ. पाचपुते यांचा हाच मुद्दा, राज्यभरातील भक्तांनी उचलून धरला.
आ. पाचपुते यांच्या या मागणीवर आयुक्त तुकाराम मुंढेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला. लवकरच याबाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “येत्या काही दिवसांत आम्ही ‘भंडारा म्हणजेच हळद’ हे कायद्यामध्ये अधोरेखित करू,” असे स्पष्ट आश्वासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आ. पाचपुतेंना दिले. अन्न व औषध प्रशासनातर्फे लवकरच या संदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी केले जाण्याची शक्यता आहे.
एखादा अपघात घडल्यावर जागे होण्यापेक्षा,अन्न व औषध प्रशासनाने अशा प्रकारांवर स्वतःहून लक्ष्य देणं गरजेचं आहे. जेजूरी, तळजापूर, कोल्हापूर, पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा, यासारख्या देवस्थानांमध्ये सर्रास हळद विक्री होते. भंडाऱ्याच्या नावाखाली भाविकही ती विकत घेतात. परंतु तिच हळद शुद्ध आहे का, या महत्वाच्या मुद्यासाठी आ. पाचपुतेंची लढाई सुरु आहे. आता याच लढाईत आ. पाचपुते कधी जिंकतात, याकडे भाविकांचे लक्ष्य लागले आहे.





