
अन्न व औषध प्रसासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडेंची नियुक्ती झाली. भेसळखोर गडबडले. नगरसह महाराष्ट्रातील दूध संकलनाच्या फुगलेल्या आकड्यांतील हवा निघून गेली. १५ दिवसांत तब्बल २० ते ३० टक्क्यांनी दूध संकलन घटले. वडापाव व अन्न अन्नपदार्थ्यांच्या हातगाड्याही बंद दिसू लागल्या. हाँटेलमधून पनीरचे खाद्यपदार्थ देणे बंद झाले. एवढंच कशाला, गुटखा-माव्याच्या काही टपऱ्याही बंद झाल्या. कृत्रिमरित्या पिकवलेली फळे, बेकरी उत्पादने, भेसळयुक्त गूळ, खाद्यतेल, चिक्की- आईस्क्रीम, भ्रामक जाहीराती करून रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या आयुर्वेदीक औषधांनीही गाशा गुंडाळला. झोपेचं सोंग घेणाऱ्या एफडीच्या स्थानिक अधिकाऱ्यांची झोपमोड झाली. आयुक्तांच्या आदेशानंतर महाराष्ट्रभर छापेमारी, पाठलाग, धरपकड सुरु झाली. भेसळखोरांना पळता भुई थोडी झाली.
विशेष म्हणजे, फक्त १५ दिवसांत हे सगळं झालं. एफडीएच्या वेबसाईटवर आलेल्या प्रत्येक तक्रारींची शाहनिशा सुरु झाली. एफडीएकडे अशीच एक तक्रार होती, शिर्डीतील पेढ्यांची… मंगळवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या पेढ्यांवरही वक्रदृष्टी फिरवली. अगदी दगडासारखे व बुरशीयुक्त पेढे एफडीएच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रसादाच्या नावाखाली महाराष्ट्रातील सगळ्याच तिर्थक्षेत्रावर सुरु असणारा बोगस खव्याचा हा गोरखधंदा, तुकाराम मुंडेच्या नजरेतून सुटला नाही.
या खव्यांची प्रयोगशाळेत तपासणी झाल्यावर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. कदाचित काही महाभाग पकडलेही जातील. आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे आल्यावर, सामान्यांच्या जिवाशी खेळणारे गायब झालेत. आपले काळे धंदे बंद करुन ते परागंदा झालेत. परंतु हे सगळं यापुढंही असंच सुरु रहावं, ही अपेक्षा… दरम्यान, एफडीएचं पथक मंगळवारी शिर्डीत आल्यानं अनेकांचा बीपी वाढला. बोगस पेढ्यांचा वास लगेच महाराष्ट्रभर पसरला. शिर्डीत नेमकं काय झालं? आणि खव्यांचा हा काळाबाजार नेमका कसा होतो?
शिर्डीत पान-फुले जशी रस्तोरस्ती विकली जातात. तसाच पेढा, बर्फी, खडीसाखर किंवा गोड काजू-रेवड्याही विकल्या जातात. अगदी फुटाफुटांवर प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. आता या दुकानांतून प्रसाद घेतला तर त्याच्या पॅकींगवर ना उत्पादकाचे नाव असते, ना एक्स्पायरी डेट. त्या प्रसादाच्या पाकीटावर मॅन्यूफॅक्चरिंग डेटही नसते. फक्त आकर्षक लेबल लावून हा प्रसाद विकला जातो. याच प्रसादाबाबत एफडीएकडे यापूर्वीही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु नगरचा अन्न व औषध प्रशासन विभाग किंवा थेट शिर्डी नगरपालिकाही या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत होती. परंतु आता सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी एफडीएचा कारभार हाती घेतल्यावर, नगरच्या एफडीएच्या अधिकाऱ्यांची झोप मोडली. एफडीएचे पथक शिर्डीत दाखल होत, त्यांनी प्रसादाच्या दुकानांवर धाडी घातल्या. पेढ्यांचे नमुने गोळा केले. सर्व नमुने सील केले. प्रयोगशाळेत पाठवले. आता या पेढ्यांचा अहवाल आल्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई होईल.
तसं पाहिलं गेलं तर फक्त शिर्डीच नाही, तर शनिशिंगणापूर, मढी, मोहटादेवी, देवगड, कोरठण खंडोबा, सिद्धटेक यासंह इतर सगळ्याच देवस्थानमध्ये पेढ्याच्या नावाखाली बोगस प्रसाद विकला जातो. आता एक किलो पिव्वर खवा तयार करायचा म्हणजे, किमान चार ते पाच लिटर दूध लागते. शिवाय किमान सहा ते आठ तास ते आटवावे लागते. त्यासाठी वीज किंवा गॅस लागतो. या सगळ्यांचं गणित केलं, तर किमान चारशे ते पाचशे रुपये लागतात. शिवाय खव्याचं ट्रान्सपोर्टेशन, उत्पादक त्यानंतर डिलर, त्यानंतर सबडिलर हे सगळं पाहिलं तर किमान एक किलो खवा हातात येईपर्यंत सहाशे ते आठशे रुपये लागतात. हे सरळ-सोप्प गणित आहे. परंतु तरीही तुम्ही कोणत्याही दुकानात जा, अगदी दोनशे ते चारशे रुपये किलोप्रमाणे खवा मिळतो. मग हा खवा खरंच शुद्ध असेल का? तर नाही.
मग याच खव्यातून पेढा, बर्फी तयार करुन ती आत्तापर्यंत सगळ्याच देवस्थानमध्ये विकली जात होती. परंतु याकडे ना एफडीएनं लक्ष दिलं ना नगरपालिका-ग्रामपंचायतींनी लक्ष दिलं. शिर्डीतही असंच घडत होतं. प्रत्येक दुकानात १०० ते २०० रुपयांच्या पॅकींगमध्ये पेढ्यांचा प्रसाद मिळत होता. कंदी, देशी, पिव्वर… या गोंडस नावाखाली हा पेढा विकला जात होता. परंतु या पेढ्याच्या पॅकींगवर ना उत्पादकाचे नाव असायचे, ना उत्पादनाची तारीख, बॅच नंबर, मुदत समाप्तीची तारीख असायची… लाखो भाविकांच्या श्रद्धेशी व त्यांच्या जिवाशी खेळ सुरु होता. हा पेढा अगदी कडक, टणक व बुरशीयुक्त होता. तरीही तो दुकानांत अगदी एसीत विकला जात होता.
शेकडो तोंडी व लेखी तक्रारी आल्या परंतु त्यावर कारवाई होत नव्हती. परंतु आता श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या याच बाबांच्या शिर्डीत, एफडीएनं धाडी टाकल्या. पेढ्यांच्या कारवाईनंतर याच शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपहारगृहांमध्ये वापरला जाणारा खवा, पनीर, दूध आणि तूप यांचीही सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दिल्या जाणाऱ्या लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणार्या तुपाचा दर्जाही तपासला जावा अशी, अशी भाविकांची इच्छा आहे.
हा झाला बातमीचा एक भाग, परंतु बोगस खवा कसा तयार होतो, हे जर पाहिले तर ते आणखी धक्कादायक आहे. यापूर्वी भारतातील अनेक राज्यात एफडीएनं केलेल्या कारवाईत बोगस खव्याच्या कारखान्यांवर कारवाया झाल्या. भेसळयुक्त खव्यात स्टार्च, मैदा, वनस्पती तूप, आणि स्वस्त मिल्क पावडर मिसळून पेढा तयार केला जात असल्याचे दिसले. हा खवा तयार करण्यासाठी दूध वापरण्याऐवजी केमिकल्सचा वापर केला जात होता. खव्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात शिजवलेले बटाटे, रताळे किंवा काँर्नफ्लोअर म्हणजेच स्टार्कही मिसळले जात असल्याचे या पथकाला दिसले होते.
आता हा खवा कसा तयार केला जात होता, तर स्वस्त स्किम्ड मिल्क पावडरमध्ये पामतेल घालून घट्ट पेस्ट तयार केली जायची. त्याच पांढरा रंगही टाकला जायचा. ही पेस्ट हुबेहुब खव्यासारखी दिसायची. कधी कधी खव्याला पांढरा-गुलाबी रंग येण्यासाठी व तो जास्त काळ टिकण्यासाठी त्यात युरिया, डिटर्जंट पावडर किंवा शवगृहात वापरले जाणारे फाँर्मेलिनही वापरले जात होते. हे सगळे पदार्थ विषारी असतात. माणसाच्या शरीरात ते स्लो पाँईझनचे काम करतात. परंतु भेसळखोर हे सगळं वापरून खवा तयार करायचे. त्यातूनच पेढा, बर्फी व इतर पदार्थ तयार व्हायचे. या बनावट खव्यात पिठीसाखर मिसळून तो खवा मंद आचेवर गरम केला जातो.
पेढ्याला दुधाची चव येण्यासाठी त्यात कृत्रिम इसेन्स व रंग मिसळले जातात. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यापासून गोल गरगरीत पेढे तयार केले जातात. शिर्डीत विकल्या जात असलेल्या पेढेही असेच तयार केले जात होते का? हा प्रश्न आता समोर आला आहे. अर्थात, एफडीएच्या तपासणीत हे सगळं समोर येईलच. आपण शिर्डीतील पेढ्यात असं काही आहे, असा दावा करत नाही, परंतु यापुर्वी झालेल्या बनावट खव्याच्या तपासणीत, हे सगळं सापडलंय एवढंच सांगतोय.
युरिया, डिटर्जंट, फाँर्मोलिन हे सगळं विषारी असतं. परंतु ते जर या खव्यात व पेढ्यात वापरलं जात असलं तर, हे अगदीच धक्कादायक आहे. एफडीएनं नगर जिल्ह्यातील इतर तिर्थक्षेत्रावरही अशीच कारवाई व तपासणी करावी, अशी मागणी आता होत आहे.





