Explained

Ahilyanagar Police Transfar | 19 अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोण कुठं गेलं? का गेलं?

अहिल्यानगरचे पोलिस अधिक्षक म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर मुम्मका सुदर्शन चर्चेत आले होते. सुदर्शन यांची कार्यशैली पाहता, ते अहिल्यानगर पोलिस दलाला वळण लावतील, असं सांगितलं जात होतं. मुळात सोमनाथ घार्गे यांच्याकडे एसपी पदाचा कारभार असताना, पोलिस दलावर अनेक गंभीर आरोप झाले होते. या सगळ्या व्यवस्थेला रुळावर आणण्याचे काम सुदर्शन यांना करावे लागणार होते. अहिल्यानगर लाईव्ह २४ नं ही या व्यवस्थेवर सुदर्शन चक्र कधी फिरेल, अशी बातमी केली होती. याच बातमीबाबत काही सकारात्मक आऊटपूट हाती आलंय. गुरुवारी नगर जिल्ह्यातील १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सगळ्यात महत्त्वाची बदली राहील, ती नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याची… स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची अखेर एलसीबीतून बदली करण्यात आली.

मुळात सगळ्यात जास्त तक्रारी होत्या, त्या याच एलसीबीविरोधात… सोमनाथ घार्गे यांनी जून २०२५ मध्ये एलसीबीची टीम बदलली होती. परंतु याच टीमने ड्रग्ज प्रकरणापासून ते थोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे कित्येक गोरखधंदे केले. आताही एलसीबीच्या टीममध्ये अनेक करप्टेट कर्मचाऱ्यांची भरती आहेत. परंतु आता म्होरक्या बदलल्यानंतर या कर्मचाऱ्यांचीही उचलबांगडी कधी होते, याची प्रतिक्षा आहे. दूध भेसळीचा रखडलेला तपास, वाळू तस्करांवर केलेली कृपादृष्टी, गुटखा-मावा विक्रेत्यांकडून सुरु असलेले हप्ते, जुगार-दारु अड्यांना दिलेले पाठबळ या सगळ्या कारणांमुळे एलसीबीतील इतर कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणे गरजेचे आहे.

१५ जानेवारी २०२५ ला नगर स्थानिक गुन्हे शाखेचा एक भयंकर प्रताप उघड झाला. शिर्डीतील ग्रो मोअर फायनान्स कंपनीचा संचालक भुपेंद्र सावळे याला एलसीबीच्या पथकानं पकडलं. आठ लाखांच्या फसवणुकीचा आरोप या सावळेवर होता. नाशिककडे जाताना लोणीजवळ सापळा रचून एलसीबीच्या पथकानं त्याला ताब्यात घेत नगरला आणलं. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे भाऊ व काही मित्रही होते. मी फसवणूक केलेली नाही. फक्त शेअर बाजारात चढ-उतार आल्याने मी लोकांचे पैसे देऊ शकलो नाही, असं सावळेनं पोलिसांना सांगितलं. परंतु तरीही तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, अशी धमकी या एलसीबीच्या टीमनं दिली.

अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल करायचा नसेल, तर दीड कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी एलसीबीच्या टीमनं केली. सावळेनं एवढं रोख पैसे माझ्याकडे नाहीत, असं सांगितल्यावर, एलसीबीच्या टीमनं न भूतो न भविष्यती असं धक्कातंत्र अवलंबलं. या टीमनं संशयीत आरोपी सावळेकडून थेट ऑनलाईन दीड कोटी रुपये घेतले. अखेर, दुसऱ्या दिवशी हे सगळं उजेडात आल्यावर मात्र पोलिस दलाला धक्काच बसला. अखेर चौकशीअंती, हे सगळं खरं निघाल्यावर हा भयंकर प्रताप करणारे एलसीबीचे एपीआय तुषार धाकराव, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे व गणेश भिंगारदे यांना निलंबीत करण्यात आलं.

याच एलसीबीचे यापूर्वीही गंभीर प्रकार उघडकीस आले होते. श्रीगोद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी गेल्यावेळच्या पावसाळी अधिवेशनात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. श्रीगोंदा तालुक्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा प्रताप त्यांनी थेट विधानसभेत वाचून दाखवला होता. त्यानंतर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनीही एलसीबीच्या दोन कर्मचाऱ्यांची कुंडलीच विधानसभेत वाचून दाखवली होती. नगरचं एलसीबी खातं, किती करप्टेड झालंय, हे त्यावेळी महाराष्ट्रानं पाहिलं. त्यानंतर पुढच्या काही महिन्यात याच एलसीबीच्या कर्मचाऱ्यानं थेट पकडलेले ड्रग्ज चोरून ते विक्री करण्याचा प्रताप केला. एलसीबीचा पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याला पुणे पोलिसांनी अटक केल्यावर एलसीबी पुन्हा चर्चेत आली.

अधिकारी व कर्मचारी बदलूनही, एलसीबीत स्वच्छ अधिकारी व कर्मचारी मिळेनात, अशी चर्चा पुन्हा सुरु झाली. तत्कालीन पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी ११ महिन्यांपूर्वी एलसीबीची स्वच्छता करण्याच्या उद्देशाने किरणकुमार कबाडी यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचा प्रभारी पदभार सोपवला होता. परंतु आता मुम्मका सुदर्शन यांनी ११ महिन्यांत कबाडींची उचलबांगडी केली. त्यांच्या कर्मचाऱ्याने केलेले ड्रग्ज विक्री प्रकरण, लाचखोरीचे प्रकरण, गुटखा प्रकरणात त्यांच्या कर्मचाऱ्यांचा आढललेला सहभाग, बनावट दूध प्रकरणाचा रेंगाळलेला तपास, या सगळ्या कारणांमुळे त्यांची उचलबांगडी झाल्याचे सांगितले गेले. आता त्यांची बदली शिर्डीतील साई सुरक्षा मंदीरात करण्यात आली आहे. याच एलसीबीचा कारभार आता पोलिस निरीक्षक हरिष भोये यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आता हे भोये आपल्या टीमचा कसा कस काढतात, हे लवकरच कळेल.

कबाडी यांच्यासह श्रीरामपूर शहर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, अहिल्यानगर शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प, एमआयडीसी तसेच श्रीगोंदा, घारगाव अशा अनेक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यातील काही अधिकार्‍यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता, तर काहींच्या कार्यक्षेत्रात गुन्हे वाढले होते. या बदल्यांमध्ये एसपी सुदर्शन यांनी धक्कातंत्र वापरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. एसपींनी कोणत्या १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या ते एकदा पाहू…

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांची मुदतपूर्व बदली झाली. ते आता नियंत्रण कक्षात गेले. त्यांच्याकडे पोलीस उपअधीक्षक गृह पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्या जागी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी बालाजी वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली.

नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची राहुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. तर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी बदली करण्यात आली.

श्रीगोंद्याचे प्रभारी किरण शिंदे यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रभारीपदी करण्यात आली. सर्वात जास्त गाजलेल्या पाथर्डी पोलिस ठाण्यातही बदलीचे वारे वाहिले. पाथर्डीचे प्रभारी विलास पुजारी यांची बदली मानव संसाधन विभागात करण्यात आली. तर मानव संसाधन विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची नियुक्ती पाथर्डी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी करण्यात आली.

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी संभाजी गायकवाड यांची बदली दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रभारीपदी करण्यात आली. त्यांच्या जागी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी नितीन देशमुख हे आले. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला अद्याप पूर्णवेळ प्रभारी देण्यात आलेला नसून सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

नेवासा पोलीस ठाण्याचा कार्यभार यापूर्वी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्याकडे होता. आता नेवासा पोलीस ठाण्यास पूर्णवेळ प्रभारी मिळाला असून, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तेथे नियुक्ती करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे प्रभारी बाबासाहेब बोरसे यांची बदली घारगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे.

घारगावचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी झाली.
एमआयडीसीचे प्रभारी माणिक चौधरी आणि भिंगार कॅम्पचे प्रभारी जगदीश मुलगीर यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याची धुरा कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली.

याशिवाय राहाता पोलीस ठाण्याचा पदभार दीपक सरोदे यांच्याकडे देण्यात आला. कर्जत पोलीस ठाण्याची जबाबदारी हनुमान गायकवाड यांच्याकडे देण्यात आली. लोणी पोलीस ठाण्याचे प्रभारीपद सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा होती. त्यांच्याकडे आता लोणीचा सहायकचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन एसपींनी त्यांचे सुदर्शन चक्र फिरवले. परंतु आता एलसीबीतील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणंही गरजेचं आहे. नेवासा तालुक्याची जबाबदारी असलेले एलसीबीचे काही कर्मचारी हे पूर्वी सोनई पोलिस ठाण्यातच कार्यरत होते. आता त्यांच्याकडे एलसीबीतही नेवाशाचीच जबाबदारी दिलीय. ज्या तालुक्यातील पोलिस ठाण्यात हे कर्मचारी पूर्वी कार्यरत होते, तेथेच त्यांची बदली झाल्याने गुन्हेगारांकडून आर्थिक तडजोडी वाढल्याच्या चर्चा आहेत.

एलसीबीत काम केलेल्या व सध्या कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची चौकशी करण्याची मागणीही आता होऊ लागली आहे. गाड्या, बंगले, प्राँपर्टी, उच्चभ्रू राहणी, नातेवाईकांच्या नावावर जमीनी व इतर व्यवहार हे सगळं तपासलं गेलं पाहिजे, अशी चर्चा होऊ लागली आहे. नवे एसपी हे सगळं शोधून काढतील, अशा अपेक्षा आहे. अर्थात, एलसीबीतील सगळेच कर्मचारी करप्टेड नाहीत. परंतु जे करप्टेड आहेत, त्याच्याही बदल्या व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button