Explained

Explained : सावधान..! नगरमध्ये काही हजार कोटींचा घोटाळा, एसपींनी सांगितली तपासाची दिशा…

अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्यावर्षी सिस्पे, इन्फिनीटी, बिटकाँईन, ग्रो-मोअर, नगर अर्बन असे अनेक घोटाळे गाजले. एकट्या सिस्पे व इनफिनाईट बिकनचा घोटाळा काही हजार कोटींत असल्याचे सांगितले गेले. या सर्व घोटाळ्यांची माहिती व तपासाची दिशा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत सांगितली. एसपींच्या या पत्रकार परिषदेनंतर, नगरचं गुन्हेगारी जग पुन्हा एकदा समोर आलं. आता सर्व फसवणूक झालेल्यांना त्यांची रक्कम खरंच परत मिळेल का, हा प्रश्न आहे.

पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील वार्षीक गुन्हेगारी व कारवायासंदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. गेल्या वर्षभरात नगर जिल्ह्यात गाजलेल्या हजारो कोटींच्या घोटाळे त्यांनी तपशीलवार सांगितले. या घोटाळ्यात फक्त पांढरपेशेच नाही, तर शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, महसूल कर्मचारी, पोलिस असे सगळेच फसविले गेले. सुरुवातीला या कंपन्यांनी चांगला परतावा दिला व त्यानंतर सगळं चंबूगबाळ उचलून पोबारा केला. सिस्पे इन्फीनाईट कंपन्यांविरोधात तोफखाना, सुपा, श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. हे चार गुन्हे 14 कोटी 47 लाख 98 हजार 572 रुपयांच्या घोटाळ्याचे होते. त्यानंतर पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली. आत्तापर्यंत सुमारे 200 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले गेले आहेत. कंपनी, कंपनीचे संचालक, एजंट अशी सुमारे 200 बँक खाती गोठविली गेली आहेत. त्यातील सुमारे 113 कोटी 42 लाख 32 हजार 572 रुपये फ्रीज करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना पैसे मिळण्यासाठी शासनाकडे एमपीआयडीनुसार प्रस्तावही पाठवविला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना लवकरच त्यांचे पैसे मिळतील, अशा शक्यता पोलिसांनी व्यक्त केल्या.

शिर्डीतील ग्रो मोअर कंपनीबाबही एसपी घार्गे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, या कंपनीविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. तपासात या कंपनीकडून २८ कोटी ७१ लाख ५८ हजार ५२३ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात शासनाकडे ५ कोटी ४८ लाख ५५ हजार ९५२ रुपयांचा एमपीआयडी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नगर अर्बन बँक प्रकरणात मात्र अपहाराचा आकडा आणखी भयावह आहे. बँकेच्या संचालकांविरोधात २९१ कोटी २५ लाख ६१ हजार रुपयांच्या अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १३ आरोपींविरोधात एमपीआयडी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान ३ कोटी १५ लाख १ हजार ८५.०६ रुपये इतकी रक्कम फ्रिज करण्यात आली असून, ७२ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मालमत्तेची एकूण किंमत ३४ कोटी ५७ लाख ७९ हजार ६१०.०५ रुपये इतकी आहे. या प्रकरणातील एम.पी.आय.डी. प्रस्तावाची एकूण रक्कम ३७ कोटी ७२ लाख ८० हजार ६९५.५६ रुपये इतकी आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या या व्यापक व कडक कारवाईमुळे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात अपहृत रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत, असे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले. आता ही रक्कम खरंच कधी मिळेल, हा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button