ज्या झाडांना गेल्यावर्षी फक्त काही ग्रॅम जांभळं आली, त्याच झाडांखाली यंदा जांभुळांचा अक्षरशः सडा पडलाय. न भूतो न भविष्यती अशी जांभळं आलीय. यंदा जांभुळांचा हाच सुकाळ पाहिल्यावर, काही पोस्ट व व्हिडीओ व्हायरल झालेत. त्या व्हिडीओत मुबलक जांभळं म्हणजे दुष्काळाची चाहूल… असं सांगितलं गेलंय. त्यामुळे चिंता वाढलीय. १९७२ पेक्षाही भयानक दुष्काळ यंदा पडेल, अशा चर्चा सुरु झाल्यात. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचंच काय, पण सामान्यांच्याही काळजाचा ठोका चुकलाय. जांभळं जास्त आल्यावर खरंच दुष्काळ पडतो का? हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. जांभळं आणि दुष्काळ याबाबत काही भाकडकथा जशा व्हायरल होताहेत, तसंच काही हवामान तज्ज्ञांचं मतही व्हायरल होतंय. इन्स्टा, फेसबूक, यू-ट्यूब अशा सगळ्याच सोशल मिडिया साईटवर सध्या जांभळ आणि दुष्काळाचं हेच जांभूळपुराण फाँरवर्ड होताना दिसतंय.
जांभळं दिसली की, शाहीर विठ्ठल उमापांचं जांभूळआख्यानही आठवतं. महाभारतातील एका जांभळाच्या कथेच्या प्रसंगाला शाहीरी टच देऊन विठ्ठल उमापांनी जांभूळआख्यान रचलं होतं. उन्हाळा हा जांभुळांचा सिझन. उन्हाळ्यात जांभळं बाजारात येतात. पण यंदा याच जांभुळांनी मार्केट खाल्लंय. यंदा न भूतो न भविष्यती जांभळं बाजारात आलीय. झाडांखाली तर अक्षरशः जांभुळांचा सडाच पडलेला दिसतोय. गेल्या पन्नास वर्षात एवढी जांभळं कधीच आली नव्हती, असं खुद्द म्हातारे-कोतारे सांगताहेत. काहींनी तर अगदी आजीच्या बटव्यातील दंतकथाही सुरु केल्यात. जेव्हा जांभळं जास्त येतात, तेव्हा भयंकर दुष्काळ पडतो, असं अनेकांचं म्हणणं आहे. एकीकडे देशावर अलनिनोचं संकट असताना, हे दुष्काळाचं संकट खरं होईल, अशी गुंफणही काहींनी केलीय.
ज्या उन्हाळ्यात जांभळाचे असे सडे पडतात , त्या वर्षी दुष्काळ असतो” असं जुनी माणसं सांगतात. पारंपरिक ज्ञान हे वनस्पतीशास्रानुसार अगदी बरोबर आणि अचूक असल्याचा काहींचा दावा आहे. विज्ञानात या रंजक आणि तितक्याच धक्कादायक प्रक्रियेला “मास्टिंग” किंवा “स्ट्रेस फ्रुटिंग” म्हटलं जाते. झाडांनी स्वतःला संपवून जास्तीत जास्त फळे देण्याच्या या शेवटच्या प्रयत्नाला कधीकधी “सुसाईड फ्रुटिंग” किंवा “बंपर क्रॉप” देखील म्हणतात, असाही दावा करण्यात आलाय. आता हे नक्की काय आहे आणि यामागचे विज्ञान काय सांगते, ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊ…
‘सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट’ म्हणजेच अस्तित्वाची लढाई… आपली ‘जनुके पुढे चालू ठेवण्याचा’ नियम निसर्ग तंतोतंत पाळतो. जेव्हा झाडाला जमिनीखालून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते किंवा हवामानात मोठे बदल होणार असे संकेत मिळतात, तेव्हा झाड “बचावात्मक” होते. झाडाला जाणीव होते की कदाचित पुढील काळात आपण जगू शकणार नाही. अशा वेळी स्वतःला वाचवण्याऐवजी, आपली प्रजाती पृथ्वीवर टिकून राहावी म्हणून झाड आपली संपूर्ण ऊर्जा ‘बिया’ तयार करण्यासाठी वापरते. त्या वर्षी झाड नवीन पालवी फुटणे किंवा फांद्या वाढवणे पूर्णपणे थांबवते. कारण नवीन पानांना जगवण्यासाठी जास्त पाणी आणि अन्न लागते.
झाड ती ऊर्जा वाचवून फक्त आणि फक्त जांभळाचे उत्पादन वाढवण्यावर केंद्रित करते. यामुळेच मागच्या वर्षी ज्या झाडांना तुरळक फळे होती, ती झाडेही यंदा फळांनी बहरुन गेली आहेत. जांभळाचे मूळ हे ‘सोटमूळ’ प्रकारातील असते. ते जमिनीच्या अगदी खोल थरापर्यंत जाते. जेव्हा भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावते, तेव्हाच या मुळांना ताण जाणवतो. हा पाण्याचा ताण म्हणजेच येणाऱ्या दुष्काळाचे किंवा कडक उन्हाळ्याचे संकेत असतात, असही काही व्हायरल पोस्टमध्ये सांगितलं गेलंय. म्हणूनच, ज्या वर्षी उन्हाळ्यात जांभळाचा असा अभूतपूर्व सडा पडतो, तो निसर्गाचा भविष्यातील कोरड्या कालखंडाचा इशारा असतो, असा दावा करण्यात आलाय.
थोडक्यात सांगायचे तर… जांभळाचे झाड आत्महत्या करत नाही, तर स्वतःचे बलिदान देऊन आपल्या पुढच्या पिढीला जन्म देण्याचा प्रयत्न करत असते. निसर्गाचे हे चक्र थक्क करणारे आहे. इथे हा निसर्गाने दिलेला गर्भित संकेत दुर्लक्षून चालणार नाही
आजींचे पिढ्यानपिढ्यांचे निरीक्षण आणि विज्ञानाची तत्त्वे इथे तंतोतंत जुळून आली आहेत. यंदा जांभळाचा आस्वाद नक्की घ्या, पण निसर्गाने दिलेल्या या ‘दुष्काळाच्या’ संकेताकडे गांभीर्याने बघून पाणी आणि संसाधनांचा वापर जपून करण्याची गरज आहे, हेच यातून दिसून येते.! असा संदेश सध्या फाँरवर्ड केला जातोय.
मग हे सगळं खरं आहे का? खरंच दुष्काळ पडणार आहे का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. आता व्हायरल पोस्टमधील कोणताही मुद्दा हवामानतज्ज्ञ व वनस्पतीतज्ज्ञांना पटलेला नाही. जास्त जांभळे म्हणजे दुष्काळाची चाहूल, हा मुद्दा वनस्पतीशास्त्रज्ञांनी खोडून काढलाय. जास्त जांभळं येणाऱ्या प्रक्रियेला शास्त्रज्ञ भास्टिंग असं म्हणतात. एखाद्या वर्षी आंब्याच्या झाडाला जास्त आंबे येतात, तर पुढच्या वर्षी अगदी कमी आंबे येतात. हे का होतं? तर एका वर्षी जास्त फळं तयार केली तर दुसऱ्या वर्षी त्या झाडात पुन्हा फळं तयार करण्यासाठी तेवढी ऊर्जा राहत नसते. एखाद्या माणसानं आदल्या दिवशी खूप काम केलं, तर दुसऱ्या दिवशी त्याला थकवा जाणवतो. जसं माणसाचं असतं, तसंच प्राणी व झाडांचंही असतं. गेल्यावर्षी जांभळाला नगन्य जांभळं होती. त्यामुळे जांभळातील ऊर्जा टिकून होती.
त्यामुळे त्याच उर्जेतून यावर्षी जांभळाच्या झाडाला जास्त फळं आल्याचं वनस्पतीशास्त्राच्या आभ्यासकांना वाटतंय. झाडे सुसाईट फ्रुटींग किंवा आत्महत्या करुन जास्त फळे देतात, या दाव्यात तथ्य नसतं, असं विश्लेषकांचं मत आहे. कृषि विद्यापीठे, हवामान विभाग किंवा वैज्ञानिकांनीही जांभळं आणि दुष्काळाच्या मुद्याला काहीच अर्थ नसल्याचं सांगितलं आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला. शिवाय यंदा तापमानही भरपूर राहिलं. असा निसर्ग असल्यास तो झाडांच्या फळधारणेसाठीही अनुकूल समजला जातो. भरपूर पाणी व भरपूर सुर्यप्रकाश मिळाला तर निसर्ग भरभरून देतो. यंदाही तसंच झालंय. आंब्याला अंबेही जास्त आले आणि जांभळाला जांभळंही जास्त आली.
खोळंबलेल्या पावसाबाबत बोलायचं झाल्यास, यंदा एल निनोमुळं मान्सून लांबला. स्कायमेट आणि IMD च्या अंदाजानुसार, यंदा महाराष्ट्रात विशेषतः मध्य भारत आणि पश्चिम घाटात मुख्य मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीमुळे जून महिन्यात मान्सून कमकुवत राहिला. जून महिन्याचे पहिले दोन आठवडे कोरडे गेले. परंतु पुढच्या जुलै-ऑगस्टमध्ये मध्यम आणि सप्टेंबरमध्ये अधिक तीव्र पावसाची शक्यता सांगितली गेली आहे.
येत्या १८ जूननंतर दक्षिण कोकण किनारपट्टीवर पाऊस पुन्हा सक्रिय होऊ शकतो, तर विदर्भात २५ जूननंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज सांगितला गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सून २२ ते २९ जून दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून ६ जूनलाच तळ कोकणात दाखल झाला होता, परंतु उत्तर भारतातील उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे त्याची पुढील वाटचाल मंदावली. परंतु यंदा दुष्काळ वगैरे काहीच पडणार नाही, असंही सांगितलं गेलं आहे.





