Explained

जगातील एकमेव स्तंभरूपी शिवलिंगाचे रहस्य! असं मंदीर जिथं विष्णू आणि महादेव एकाच गाभाऱ्यात आहेत…

मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत महादेवाचे शिवलिंग नेहमी जमिनीवर, एका पिंडीच्या स्वरूपात पाहिले असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का… की या संपूर्ण पृथ्वीवर एक असेही रहस्यमयी मंदिर आहे, जिथे महादेवाचे शिवलिंग जमिनीवर नाही, तर चक्क दोन विशाल खांबांच्या रूपात उभे आहे..? होय, सायन्सलाही चक्रावून टाकणारे हे जगातील एकमेव स्तंभरूपी शिवलिंग आपल्या महाराष्ट्रात आहे! पवित्र प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर, घनदाट बेलाच्या जंगलात लपलेलं हे एक असं जागृत तीर्थक्षेत्र आहे, जिथं केवळ महादेवच नाही, तर भगवान विष्णू सुद्धा लाकडी स्तंभाच्या रूपात उभे आहे. हरि आणि हर म्हणजेच, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे एकत्रित असणारं हे एकमेव मंदीर आहे. पण या मंदिराचे रहस्य एवढ्यावरच संपत नाही. या बनाचे रक्षण आजही दोन गुप्त शिवगण करतात, ज्यांना ‘वीरसाहेब’ म्हटले जाते.

आज याच मंदीराची काही रहस्य आपण या व्हिडीओतून समजून घेणार आहोत. नदीतून वाहून आलेले हे दोन खांब दर ५० ते ६० वर्षांनी का बदलले जातात? आणि या क्षेत्राची पायी यात्रा केल्यास थेट काशीचे पुण्य कसे मिळते? हे सगळं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज एका अलौकिक देवस्थानाचा इतिहास तुमच्यासमोर उलगडणार आहे!

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक गाव आहे – बेलापूर. पूर्वी या ठिकाणी बेलाची असंख्य झाडे असल्यामुळे या गावाला ‘बेलापूर’ किंवा प्राचीन काळी ‘बिल्वपुरी’ असे म्हटलं जायचं. पुराणातील कथेनुसार, एकदा भगवान शिव आणि माता पार्वती या वनातून फिरत असताना माता पार्वतीला तहान लागली. संपूर्ण वनात कुठेही पाणी नव्हते. तेव्हा महादेवांनी तिची तहान भागवण्यासाठी बेलाचे एक पान जमिनीवर टाकले आणि तिथे एका पवित्र कुंडाची निर्मिती झाली. हेच ते ‘बिल्वकूंड’. या कुंडातील पाणी प्राशन करून पार्वतीने आशीर्वाद दिला की, ‘या कुंडात जे कोणी स्नान करतील, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील’. आजही मंदिराच्या परिसरात ही ऐतिहासिक बारव दिमाखात उभी आहे, जिथे भाविक आवर्जून स्नान करतात.

ही झाली गावाची ओळख, आता वळूया व्हिडिओच्या सर्वात मुख्य मुद्द्याकडे… याच गावाच्या जवळ हरिहर केशव गोविंदाचं मंदीर आहे. आता नावावरुन हे मंदिर नक्की शिवाचे आहे की विष्णूचं हा प्रश्न पडतो? तर प्राचीन कथेनुसार, त्रिपुरासूर राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला आणि तो ऋषी-मुनी आणि देवांचा संहार करू लागला. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. तेव्हा एक आकाशवाणी झाली की, ‘पृथ्वीवरील बिल्वतीर्थामध्ये स्नान करून शिवोपासना केल्यास तुमच्यावरचे विघ्न टळेल’. त्यानुसार, भगवान विष्णूंसोबत सर्व देवांनी या सरोवरात स्नान केलं आणि येथे शिवलिंगांची स्थापना केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्वतः श्रीविष्णूंनी ज्या शिवलिंगाची स्थापना केली, त्याला ‘केशव’ नाव पडलं. आणि देवराज इंद्राने स्थापन केलेल्या शिवलिंगाला ‘गोविंद’ म्हटले गेलं! पुढे महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि आशीर्वाद दिला की, ‘या हरिहर केशव गोविंदाचे दर्शन करणाऱ्याला सर्व पापांतून मुक्ती मिळेल’. म्हणजेच, हे मूळ स्थान शिव आणि विष्णूच्या एकत्रित शक्तीचे केंद्र आहे.

पण मित्रांनो, या मंदिराशी जोडलेली आणखी एक गूढ कथा आहे. जी फार कमी लोकांना माहिती आहे. समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी घेतलेले ‘मोहिनी रूप’ महादेवांच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. ते रूप पुन्हा पाहण्यासाठी व्याकुळ झालेल्या महादेवांनी याच बिल्वतीर्थाजवळील एका गुप्त गुहेत कठोर समाधी घेतली.

महादेव अनेक दिवस कैलासावर न परतल्यामुळे माता पार्वतीने दोन शिवगण – ‘वीर रक्ष’ आणि ‘वीर दक्ष’ यांना महादेवांच्या शोधात पाठवले. त्यांना याच गावातील एका गुहेत महादेव समाधीस्थ दिसले. पण तिथे आल्यावर हे दोघे शिवगणसुद्धा महादेवांच्या भक्तीत इतके लीन झाले की तेही तिथेच समाधीस्थ झाले! पुढे पार्वतीने विष्णूंच्या सहाय्याने महादेवांना जागृत केले आणि महादेव कैलासावर गेले. परंतु, भावसमाधीत गेलेले ते दोन्ही शिवगण याच बनात कायमचे राहिले. जे पुढे ‘वीरसाहेब’ म्हणून प्रसिद्ध झाले. असं मानलं जातं की आजही हे वीरसाहेब या हरिहर बनाचे रक्षण करतात! मंदिरात दररोज त्यांच्या मुखवट्यांची पूजा केली जाते. आणि माघ शुद्ध अष्टमीला त्यांचा प्रकट दिन गोडी शेव आणि दुधी भोपळ्याचा नैवेद्य दाखवून साजरा केला जातो.

आता प्रश्न येतो की, विष्णूंनी शिवलिंग स्थापन केले होते, तर मग आज गाभाऱ्यात दिसणारे हे दोन खांब कुठून आले? तर यामागे वारकरी संप्रदायाचा एक अद्भूत चमत्कार सांगितला जातो. साधारण ९०० वर्षांपूर्वी बेलापूरचे नागू आणि डांगू हे दोन भाऊ वयाच्या ८-९ वर्षांपासून खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरीची पायी वारी करायचे.

वृद्धावस्थेत जेव्हा शरीर थकले आणि वारी अशक्य झाली, तेव्हा त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले की, ‘देवा, तूच आमच्याकडे ये’. त्याच वेळी त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की प्रवरा नदीत चंदनाचे दोन स्तंभ वाहून येत आहेत. तेच माझे रुप समज… अगदी त्याचप्रमाणे त्यांना ते स्तंभ नदीत सापडले. त्यांनी ते बाहेर काढले आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा महादेवाच्या याच गाभाऱ्यात केली! विठ्ठल हा विष्णूचाच अवतार असल्याने, या स्तंभांवर विष्णूच्या रूपातील ‘केशवराज’ आणि ‘गोविंदराज’ यांचे चांदीचे मुखवटे लावून पूजा सुरू झाली. या संतांनी याच परिसरात देह ठेवला आणि आज मंदिराच्या बाजूलाच संत नागु व डांगु यांच्यासह परमहंस विद्यानंद स्वामी आणि केशवदास स्वामी यांचीही पवित्र समाधी स्थानेही आहेत.

आता सर्वात मोठा प्रश्न, हे स्तंभ जर चंदनाचे आहेत आणि ही कथा जर ८००-९०० वर्षांपूर्वीची आहे. तर ते चंदनाचे स्तंभ खराब झाले नाहीत का? किंवा ते खराब होत नाहीत का? तर तसं नाही. कायम पडणारे अभिषेकाचे पाणी व इतर पदार्थांमुळे हे स्तंभही खराब होतात. या लाकडी स्तंभांवर दररोज जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक केला जातो. लाकूड कितीही उच्च दर्जाच्या चंदनाचे असले, तरी सततच्या ओलाव्यामुळे ते ५० ते ६० वर्षांत हळूहळू जीर्ण होते. त्यामुळे मंदिराच्या परंपरेनुसार, दर ५० ते ६० वर्षांनी हे स्तंभ बदलले जातात. पूर्वी हे स्तंभ चंदनाचे होते, परंतु ते वारंवार जीर्ण होत असल्यामुळे मधल्या काळात सुरक्षेसाठी तिथे ‘स्फटिक’ चे स्तंभ बसवण्यात आले. परंतु, मंदिराची मूळ लाकडी स्तंभांची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी, अगदी अलीकडे म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये ५४ वर्षांनंतर पुन्हा एकदा जुने स्तंभ बदलून, पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने नवीन भव्य लाकडी स्तंभांची गर्भाशयात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे!

जर तुम्ही या मंदिराची वास्तुकला पाहिली, तर हे मंदिर हेमाडपंती शैलीचे असून ते संपूर्ण दगडांमध्ये कोरलेले आहे. जमिनीपासून ७ ते ८ फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी १०-१२ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या समोर एक भव्य प्राचीन दीपमाळ आहे, ज्याच्या आतून एक अरुंद जिना वर जातो. या दीपमाळेच्या टोकावरून संपूर्ण केशव गोविंद बनाचा निसर्गरम्य नजराणा पाहता येतो. बेलापूर बन, बेलापूर बुद्रुक आणि उक्कलगाव या तिन्ही ठिकाणी हरिहराचे शिवलिंग आहे. अशी दृढ श्रद्धा आहे की, ज्या भाविकाला काशीला जाणे शक्य नाही, त्याने जर या तिन्ही स्थानांची पायी परिक्रमा केली, तर त्याला थेट काशी विश्वेश्वराच्या यात्रेचे महापुण्य लाभते! महाराष्ट्र शासनाने या क्षेत्राला ‘क’ दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित केले आहे. काशिचे पुण्य घडविण्यासाठी रोज शेकडो भाविक या जवळ-जवळ असलेल्या तिन्ही देवस्थानाची पायी परिक्रमा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button