Explained

‘सुरभि’चा कोट्यवधींचा गैरव्यवहार? रुग्ण आणि गुंतवणूकदारांची लुटमार नेमकी कशी झाली?

सुरभि हाँस्पीटलमध्ये कोट्यवंधींचा घोटाळा झाल्याचा आरोप सध्या होत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी आलेल्या नव्या व्यवस्थापनाने हा घोटाळा उघडकीस आणलाय. या नव्या व्यवस्थापनाने नेमलेल्या फाँरेन्सिक ऑडीटच्या टीमने घोटाळ्यांचे कोटींचे आकडे समोर आणले. नव्या व्यवस्थापनाच्या विस्तृत अहवालानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल झाले. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करुन व वेगवेगळ्या नातेवाईकांना सोबत घेऊन या हाँस्पीटलमध्ये नेमका कसा घोळ करण्यात आला, याबाबत हॉस्पिटलचे डायरेक्टर अमित कोठारी यांनी नुकतीच माहिती दिली. त्यांच्याच माहितीच्या आधारे आम्ही हे सगळं प्रकरण तुमच्यासमोर मांडत आहोत…

नगर शहरातील सुरभी हाँस्पीटल हे शहरात नाही तर जिल्ह्यात नावाजलेले रुग्णालय आहे. परंतु हे रुग्णालय सध्या एका घोटाळ्याच्या निमित्ताने चर्चेत आले. सुरभिचे मॅनेजमेंट गेल्या तीन वर्षांपूर्वी पूर्णपणे बदलले. या नव्या व्यवस्थापनाच्या नेतृत्वाखाली रुग्णांना अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उच्च दर्जाची विश्वासार्ह आरोग्यसेवा सध्या दिली जात असल्याचे सांगितले जातेय. नव्या व्यवस्थापनाने अतिशय ठोस आणि आक्रमक भूमिका घेत डॉ. राकेश गांधी आणि त्यांच्या लाभार्थी टोळीने केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांचा छडा लावला. त्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची स्वतंत्र टीम नेमली. त्यांनी सादर केलेल्या विस्तृत अहवालानुसारच तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी गुन्हा दाखल झाला.

या रुग्णालयात आर्थिक गैरव्यवहार नेमका कसा झाला आणि त्याला कोण जबाबदार होते याबाबत सुरभि हॉस्पिटलचे डायरेक्टर अमित रसिकलाल कोठारी यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. त्यात ते म्हणतात की, २०१७ – २०२३ या कालखंडामध्ये डाँ. गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळे घोटाळे करुन कोट्यवधींचा निधी गोळा केला. त्यातील काही ठराविक रक्कमच कंपनीच्या ‘बुक्स ऑफ अकाउंट’ मध्ये नोंदवली गेली. काही रक्कम असुरक्षित कर्ज म्हणून तर काही रक्कम भाग भांडवलामध्ये दाखविली गेली. अर्थात याची कोणतीही कल्पना गुंतवणूकदारांना कधीच दिली गेली नाही.

प्रत्यक्षात हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदार आणि भागधारकांना त्यातील दैनंदिन आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात कोणतीही माहिती कळू दिली गेली नाही. २५ हजार रुपये मासिक मानधनावर काम करणारे सीए नितेश गुगळे हे त्यांचे नातेवाईक सर्व आर्थिक व्यवहार पहात होते. तसेच हॉस्पिटलशी संबंधित असलेले सॉफ्टवेअर त्यांचे दुसरे नातेवाईक प्रितेश गुगळे यांच्या मालकीचे होते. हे दोघेही गांधी यांचे नातेवाईक आहेत ही बाब खूप उशिराने गुंतवणूकदारांच्या लक्षात आली.

हॉस्पिटलच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण सुरुवातीच्या काळात तत्कालीन चेअरमन विजय निकम, राकेश गांधी आणि आशिष भंडारी यांच्याकडेच होते. नंतर ते फक्त राकेश गांधी आणि आशिष भंडारी या दोघांकडेच राहिले. या सर्व व्यवहारांचे रेकॉर्ड गांधी आणि त्यांच्या टोळीने नव्या व्यवस्थापनाने चौकशी सुरू करताच केबिन फोडून लंपास केले. तशी रीतसर तक्रार देखील नोंदविण्यात आली होती.

गुंतवणूकदारांसाठी हॉस्पिटलचे आर्थिक व्यवहार हे एखाद्या अभेद्य भिंती सारखे होते. प्रत्यक्ष कार्य करणारे डॉक्टर्स व अन्य काही सहकाऱ्यांनी जेव्हा या संदर्भात प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा अरेरावी करून आणि सतत आवाज चढवून भांडणं करत ,”तुम्ही यात लक्ष देऊ नका” असे वारंवार सुनावले गेले. रुग्णांच्या बद्दल देखील अहंकारातून अवमानकारक अशी भाषा गांधी यांच्याकडून वापरली जाऊ लागली. तत्कालीन चेअरमन विजय निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी गांधी आणि भंडारी यांच्या आडून अप्रत्यक्ष नियंत्रण मात्र त्यांनी स्वतःकडेच ठेवले होते. दैनंदिन प्रशासकीय व्यवहारामध्ये त्यांचा नेहमीच हस्तक्षेप असे. त्यांच्या बाबत कोणी प्रश्न विचारला तर गांधी अंगावर धावून जात असत.

याच कालावधीमध्ये कोविड आला. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असायची त्यावरही सर्व नियंत्रण राकेश गांधी, आशिष भंडारी, विजय निकम यांचेच होते. रोख रक्कम घेऊन रुग्णांना डिस्चार्ज देणे, घेतलेल्या रकमेची नोंद बुक्स ऑफ अकाउंट मध्ये न करणे, प्रितेश गुगळे यांचे सॉफ्टवेअर वापरून बनावट व खोटी बिले तयार करणे असे असंख्य उद्योग या काळामध्ये घडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये देखील हॉस्पिटल विषयी रोष निर्माण झाला. परंतु गांधी यांच्या अरेरावीपणा पुढे फारसा कोणी आवाज उठवला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वर्षाच्या आर्थिक ताळेबंदात कंपनी तोट्यात दाखवण्यात आली. हॉस्पिटल आर्थिक अडचणीत आहे. तोट्यात आहे. अशाच प्रकारच्या गोष्टी गुंतवणूकदारांना सांगितल्या जात होत्या.

हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर एकूण सहा व्यक्ती होत्या. परंतु संचालक मंडळाची बैठक राकेश गांधी आणि आशिष भंडारी हे दोघेजण परस्पर घेत होते आणि बाकी संचालकांच्या केवळ सह्या घेतल्या जात होत्या. तसे जबाब दोन जबाबदार संचालकांनी पोलिसांकडे दिले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेत देखील गोलमाल पद्धतीचे उत्तरे देऊन गुंतवणूकदारांचा विश्वासघात करण्याचं काम सातत्याने पाच वर्ष चालू होतं.

याच कालखंडात हॉस्पिटलची लॅबोरेटरी खाजगी पद्धतीने चालविण्यास देण्याचा विषय पुढे आला तेव्हा विजय निकम यांनी “समृद्धी हेल्थकेअर” या भागीदारी कंपनीच्या नावावर ती चालवण्याची तयारी दर्शवली. अर्थात ही बाब संचालक मंडळ आणि गुंतवणूकदारांना माहीतच नव्हती.

या “समृद्धी हेल्थकेअर कंपनी” मध्ये समृद्धी विजय निकम यांची पन्नास टक्के भागीदारी होती. तर राकेश गांधी यांच्या पत्नी राजश्री राकेश गांधी आणि आशिष भंडारी यांच्या पत्नी आरती आशिष भंडारी या दोघी 25 – 25% भागीदार होत्या. समृद्धी हेल्थकेअर या कंपनीच्या ‘ओम सर्जिकल’ आणि ‘लाईफ गार्ड मेडिकोज’ अशा दोन उपकंपन्या होत्या. या दोन्ही कंपन्या मार्फत सुरभि हॉस्पिटलला औषधांचा सप्लाय होत असे. बाजारभावापेक्षा जास्त दराने औषधांचा पुरवठा करून किंवा कधी कधी नुसतीच बिलो नोंदवून लाखो रुपयांची बिले या दोन उप कंपन्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. यासंदर्भात नव्या व्यवस्थापनाने दोन वर्षांपूर्वीच मेडिकल स्टोअर्सचे ऑडिट केले गेले व त्यातून मोठ्या प्रमाणावर “रेव्हेन्यू लॉस” झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुरभि हॉस्पिटल कडून आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण राकेश गांधी आणि आशिष भंडारी या दोघांकडेच असल्यामुळे “ओम सर्जिकल्स आणि लाइफ गार्ड मेडिकोज” या त्यांच्याच कंपन्यांच्या खात्यावर हॉस्पिटल मधून लाखो रुपयांची रक्कम वर्ग केली जात होती. हा प्रकार २०१७ पासून २०२३ पर्यंत सुरू होता.

मध्यंतरीच्या कोविड काळात पीपीई किट खरेदी, रेमडीसीवर इंजेक्शन खरेदी, विविध प्रकारची औषधांची खरेदी, ऑक्सिजन खरेदी याच दोन उपकंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर केली गेली. त्याचे कुठलेही रेकॉर्ड कंपनीकडे आजही उपलब्ध नाही. मात्र बिलांची रक्कम दोन्ही कंपन्यांच्या खात्यावर वर्गही होत राहिली.

दरम्यानच्या काळात कोणत्याही संचालकांना किंवा गुंतवणूकदारांना विश्वासात न घेता राकेश गांधी आणि आशिष भंडारी या दोघांनी “महाराजा एलएलपी” नावाची एक कंपनी स्थापन करून सुरभि हॉस्पिटलच्या शेजारीच असलेले हॉटेल महाराजा पॅलेस चालवायला घेतले. या ठिकाणी देखील सह्यांचे अधिकार या दोघांचेच होते. हॉटेलच्या नूतनीकरणासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी सुरभि हॉस्पिटलच्या खात्यातून “सुरभि महाराजा पॅलेस एलएलपी” या खात्यावर वर्ग करण्यात आला. ही रक्कम देखील दोघांनी मिळून वैयक्तिक फायद्यासाठी वापरली असल्याचा संशय आहे या व्यवहारात देखील हॉस्पिटलचे मोठे नुकसान झाले. यासंदर्भात देखील हॉस्पिटलच्या नव्या व्यवस्थापनाने एन.सी.एल.टी, मुंबई न्यायालयात रीतसर पिटीशन दाखल केले आहे.

हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या संबंधित आर्थिक गैरव्यवहारा संदर्भात माहिती मिळत गेल्यानंतर 2023 मध्ये विशेष सर्वसाधारण सभेत राकेश गांधी आशिष भंडारी या दोघांकडून सर्व अधिकार काढून घेण्यात आले आणि हॉस्पिटल व्यवस्थापन नवीन मॅनेजमेंटच्या ताब्यात देण्यात आले. मागील दोन ते तीन वर्षांच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये गांधी यांच्या कारकिर्दीत झालेले असंख्य गैरव्यवहार उघडकीस आणण्याचे काम सुरू होते. नव्या व्यवस्थापनाने, आर्थिक लाभाच्या स्वार्थी हेतूने सुरू असलेले सर्व संशयित व्यवहार तात्काळ थांबवले.

तसेच गांधी आणि टोळीच्या काळातील व्हेंडर्स चे प्रलंबित कोट्यावधी रुपयांचे देणे देण्याची प्रक्रिया सुरू केली आणि अवघ्या दोनच वर्षात ही संपूर्ण देणे देऊन टाकली. याच चौकशी प्रक्रियेचा एक भाग म्हणून कंपनीने पुढाकार घेऊन “फॉरेन्सिक ऑडिट” केले व या सर्व गैरबाबींची नोंद घेण्यात आली. सुमारे तीन महिने सुरू असलेल्या या ऑडिट मधून अनेक धक्कादायक बाबी, आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे, चुकीचे व्यवहार उघड झाले. या संदर्भात सुमारे ७० पानांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर नवीन मॅनेजमेंट ने धाडसाने यासंदर्भात तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि प्राथमिक तपासांती राकेश गांधी व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नव्या व्यवस्थापनांतर्गत गेल्या तीन वर्षापासून सुरभि हॉस्पिटलचे काम अत्यंत चांगले सुरू असून पंचक्रोशीतील सर्व रुग्णांचा विश्वास या हॉस्पिटलने अल्पावधीतच संपादित केला आहे. नगर जिल्ह्यातील एक नामांकित “क्रिटिकल केअर युनिट” म्हणून आणि “मल्टिसुपर स्पेशलिटी हॉस्पिटल” म्हणून आज सुरभिची ओळख आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले सर्वच कन्सल्टंट वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत अनुभवी असून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांद्वारे रुग्णांच्या आजाराचे निदान करण्याची परिपूर्ण क्षमता राखून आहेत. त्यामुळेच ही विश्वासार्हता निर्माण झाली आहे.

रुग्णांना कमीत कमी खर्चात विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे या ध्येयानेच सध्याही हॉस्पिटलचे कामकाज सुरू आहे. राकेश गांधी आणि त्यांच्या टोळीला मज्जाव केला नसता तर आत्तापर्यंत हॉस्पिटलवर अवलंबून असलेले असणारे ५०० कुटुंब उध्वस्त झाले असते आणि गुंतवणूकदारांना देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला असता. सुरभि च्या नव्या व्यवस्थापनाने धाडस दाखवून आर्थिक गुन्हेगारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून मोठे पाऊल उचलले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू असून त्यातून सत्य अखेर बाहेर येईलच,असा अमित रसिकलाल कोठारी यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button