
जामिनावर घरी परतलेल्या तरुणाचा काही दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि आता त्याच्या कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पण, शिर्डी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं ?
तर मंडळी, साहिल सुखदेव खंडीजोड असं मृत तरुणाचं नाव असून, तो कोपरगाव तालुक्यातील वेस गावचा रहिवासी होता. ३१ ऑगस्ट रोजी चुलते सागर खंडीजोड यांना भेटण्यासाठी तो शिर्डी पोलीस ठाण्यात गेला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
९ सप्टेंबरला जामिनावर घरी परतल्यानंतर साहिलने पोलिसांनी लाकडी काठी आणि चापटांनी मारहाण केल्याचं कुटुंबाला सांगितल्याचा दावा आहे.
५ ऑक्टोबरला त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तपासणीत मेंदूत रक्तस्राव झाल्याचं समोर आलं. ६ ऑक्टोबरला शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र ८ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता साहिलचा मृत्यू झाला.
आता सीसीटीव्ही फुटेज जतन करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे. या आरोपांची चौकशी होऊन सत्य समोर येणार का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.





