मित्रांनो, जरा विचार करा… आजच्या जगात माणूस स्वतःचं हक्काचं एक घर बांधण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावतो. रक्ताचं पाणी करतो… पण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत एक असा अद्भूत, चमत्कारी सिद्ध पुरुष होऊन गेला, जो दरवर्षी पंढरपूरच्या वारीला निघण्यापूर्वी आपल्याच राहत्या झोपडीला स्वतःच्या हाताने पेटवून द्यायचा! होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं… झोपडी धडाधड जळत असायची, आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत असायच्या आणि हे महान संत त्या जळत्या घराच्या राखेचा टिळा आपल्या कपाळावर लावून पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीला निघून जायचे!
कोण होते हे वैराग्यमूर्ती? का करायचे ते असं कृत्य? या मागे कोणती अद्भूत लीला लपली होती? आज आपण नगर जिल्ह्यातील अशा एका अद्भूत आणि अलोकिस संतांच्या जिवनचरीत्राचा आढावा घेणार आहोत. ज्यांच्या सप्ताहाची नोंद थेट गिनीज बुक ऑफ रेकाँर्डमध्ये झाली आहे. व्हिडीओतील अनेक संदर्भ आणि पुराव्यानिशी सांगणार आहोत.
आजच्या व्हिडीओत आपण वैराग्यमूर्ती सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या याच अद्भूत लीलेचे काही किस्से पाहणार आहोत. गंगागिरी महाराजांचा जन्म १८१४ मध्ये एका गोसावी कुटुंबात झाला. पुणतांब्यापासून २५ किमी अंतरावर गोदातिरी असलेले कापूस वडगाव हे त्यांचे जन्मस्थान. येथे त्यांचे वडील देवगिरी हे गावात धर्मकार्ये व पोथीवाचन करीत. त्यामुळे गंगागिरी महाराजांवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. वयाच्या बाराव्या वर्षापासून ते गावात पोथीवाचन करू लागले.
कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता. ते नामांकित पहेलवान होते. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी नाथबाबा या सत्पुरुषाचे शिष्यत्व स्वीकारले. आदिनाथ भगवान शिव, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर अशी नाथबाबांची गुरुपरंपरा सांगितली जाते. गुरुआज्ञेनुसार गंगागिरी महाराजांनी सराला बेटात कठोर साधना केली. त्या साधनेमुळे ते योगीराज म्हणून संबोधले जाऊ लागले. ब्रिटिश आणि निजामसत्तेच्या काळात त्यांनी या प्रदेशात लोकांमध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक जागृती करण्याचे काम केले.
रहस्याचा हा धागा समजून घेण्यासाठी आपल्याला गोदावरी नदीच्या पात्रात वसलेल्या ‘श्रीक्षेत्र सरला बेटावर’ जावं लागेल. हे बेट म्हणजेच गंगागिरी महाराजांचे मुख्य तपोभूमी केंद्र होते. महाराज हे केवळ सामान्य संत नव्हते, तर ते निसर्गावर ताबा मिळवलेले एक ‘सिद्ध पुरुष’ होते. पण त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात रहस्यमय प्रसंग म्हणजे वारीला जाताना झोपडी पेटवून देणे. जेव्हा आषाढी किंवा कार्तिकी वारी जवळ यायची, तेव्हा महाराज आपल्या झोपडीतील सर्व सामान बाहेर काढायचे आणि झोपडीला आग लावून द्यायचे. अनेक लोक त्यांना विचारायचे, “महाराज, असं का करता?” तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर एक अद्भूत हसू असायचं.
ते सांगायचे, “मागे काही पाश नको!” म्हणजेच, विठ्ठलाच्या भेटीला जाताना मनामध्ये घराची, मालमत्तेची किंवा या संसाराची कोणतीही आसक्ती, कोणताही मोह उरू नये, म्हणून ते आपल्या हाताने मोहाचे प्रतीक असलेली झोपडीच जाळून टाकायचे! विचार करा, ज्या पुरुषाचे वैराग्य इतक्या टोकाचे असेल, ज्याचा अहंकार पूर्णपणे जळून राख झाला असेल, त्यांच्या दिव्य दृष्टीला या जगातली कोणती गोष्ट अशक्य असेल? आणि याच दिव्य दृष्टीने त्यांना एका मोठ्या रहस्याकडे खेचून आणले, जे शिर्डीत दडलेले होते!
हा काळ होता साधारण १८५० ते १८६० च्या दरम्यानचा… त्या काळात आजच्यासारखी गजबजलेली शिर्डी नव्हती, ना तिथे कोणतं भव्य मंदिर होतं. शिर्डीत फक्त एक तरुण फकीर राहायचा, जो कोणाशीही बोलत नसे, अंगावर फाटके कपडे असायचे आणि तो एका कडुनिंबाच्या झाडाखाली शांतपणे बसून राहायचा. शिर्डीचे लोक त्या तरुण फकिराला वेडा समजायचे, त्याची थट्टा करायचे. पण जेव्हा त्रिकालज्ञानी सद्गुरू गंगागिरी महाराज आपल्या वारकरी मंडळासह शिर्डी गावात आले, तेव्हा एक अद्भूत घटना घडली. कडुनिंबाच्या झाडाजवळ येताच गंगागिरी महाराजांचे पाऊल अचानक थांबले! त्यांची नजर समोर झाडाला पाणी घालणाऱ्या तरुण फकिरावर खिळली.
दोघात एकही शब्द बोलला गेला नाही, पण अंतर्मनातून एक गूढ संवाद झाला. गंगागिरी महाराजांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले की, ज्या विठ्ठलासाठी मी दरवर्षी घर दार जाळून पंढरपूरला जातो, तोच परब्रह्म आज या फकिराच्या रूपाने शिर्डीत अवतरला आहे! तेव्हा महाराज अत्यंत गंभीर झाले, त्यांनी शिर्डीच्या ग्रामस्थांना जवळ बोलावले आणि गर्जून म्हणाले, “शिर्डीकरांनो, हा साधासुधा माणूस नाही. याला वेडा समजण्याची चूक करू नका. हा तर लखलखता हिरा आहे, हिरा! हा तो ऐतिहासिक क्षण होता, जेव्हा साईबाबांच्या अवताराची पहिली घोषणा या जगासमोर झाली होती!
आता तुमच्या मनात शंका आली असेल की, ही केवळ एखादी ऐकीव कथा आहे की याला काही मजबूत आधार आहे? तर मित्रांनो, संतांच्या या अद्भूत भेटीला २ अत्यंत भक्कम लिखित पुरावे आहेत!
पुरावा क्र. १: ‘श्री साई सचरित्र’ ग्रंथातील नोंद :
साईबाबांच्या जीवनावरील सर्वात प्रामाणिक आणि कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ग्रंथ म्हणजे ‘श्री साई सचरित्र’. या ग्रंथाच्या सुरुवातीच्या अध्यायांमध्येच या प्रसंगाचा स्पष्ट आणि लिखित उल्लेख आहे की, गंगागिरी महाराजांनी तरुण साईबाबांना पाहून त्यांना ‘हिरा’ म्हटले होते.
पुरावा क्र. २: सरला बेटावरील दस्तऐवज :
श्रीक्षेत्र सरला बेट येथील प्राचीन हस्तलिखिते आणि संस्थानाच्या दस्तऐवजात गंगागिरी महाराजांच्या या शिर्डी भेटीचे आणि त्यांनी वर्तवलेल्या भाकिताचे सविस्तर वर्णन आहे.
तर मित्रांनो, विचार करा… गंगागिरी महाराजांनीच साईबाबांना जगाच्या आधी कसे ओळखले? कारण, जो माणूस दरवर्षी स्वतःची झोपडी जाळून निसर्गाशी आणि ईश्वराशी एकरूप होत होता, त्यांचा ‘मी’पणा, त्याचा ‘अहंकार’ पूर्णपणे नष्ट झाला होता. आणि ज्याचा अहंकार संपतो, त्यालाच ईश्वराचे खरे रूप दिसते. शिर्डीकरांना जे दिसले नाही, ते गंगागिरी महाराजांच्या दिव्य दृष्टीला दिसले. त्यांनी ओळखले की हा हिरा भविष्यात कोट्यवधी लोकांचे कल्याण करणार आहे. आणि आज आपण पाहतोच आहोत, त्यांचे ते भाकीत १०० टक्के खरे ठरले आहे!
सद्गुरू गंगागिरी महाराजांनी स्वतःची झोपडी जाळून जगाला मोहापासून मुक्तीचा मार्ग दाखवला, तर शिर्डीत येऊन साईबाबांच्या रूपातील हिऱ्याची पारख केली. एका महान संताने दुसऱ्या महापुरुषाच्या देवत्वाची साक्ष देणे, हा मानवी इतिहासातील अत्यंत अद्भूत प्रसंग आहे.





