
पुण्यातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी भाजपने आता अहिल्यानगरच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांवर विश्वास टाकला आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभारी नियुक्त केले आहेत. या नियुक्त्यांमध्ये नगर जिल्ह्यातील तीन नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजपने माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार विक्रम पाचपुते आणि आमदार विवेक कोल्हे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या तिन्ही नेत्यांना पुणे विभागातील वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शिक्षक आणि पदवीधर मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
आता या तीन नेत्यांच्या अनुभवाचा आणि स्थानिक राजकीय संपर्कांचा पक्षाला किती फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या नियुक्त्यांमुळे नगरच्या नेत्यांची राजकीय ताकद पुण्यातही दिसणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





