महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक इतिहासात २० ऑक्टोबर २०२६ हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. वारकरी संप्रदायाचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या गादीवर एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. गेल्या २२ वर्षांपासून गडाचा गाडा हाकणारे न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री महाराजांनी स्वेच्छानिवृत्तीचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि गडाची धुरा कृष्णा महाराज शास्त्रींकडे सोपवली. पण कोण आहेत हे नवीन महंत? ज्यांची मातृभाषा मराठी नाही, जे मूळचे महाराष्ट्राचेही नाहीत, ते थेट या राजेशाही गडाच्या सर्वोच्च गादीवर कसे विराजमान झाले? एका खोलीत तब्बल १२ वर्षे घालवून संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत करणाऱ्या या तरुण तपस्वीचा ‘तेलंगणा ते भगवानगड’ हा प्रवास थक्क करणारा आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण भगवानगडाचा ७५ वर्षांचा ज्वलंत इतिहास, गडाचे महात्म्य आणि नव्या महंतांची नियुक्ती यामागचे संपूर्ण गुपितं सविस्तर जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, भगवानगडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा गडाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कृष्णा महाराज शास्त्री या ऐतिहासिक गडाचे ४ थे मठाधिपती म्हणून विराजमान झाले. कृष्णा महाराज शास्त्री हे मूळचे तेलंगणा राज्यातील आहेत. त्यांनी सुमारे १७ वर्षांपूर्वी अध्यात्माच्या ओढीने आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी या पवित्र गडावर पाऊल ठेवले. ते केवळ संप्रदायाच्या अभ्यासातच नाही, तर आधुनिक शिक्षणातही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आपले पदव्युत्तर म्हणजेच एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. भगवानगडावर आल्यानंतर त्यांनी गडावरील ‘ज्ञानेश्वरी विद्यापीठात’ राहून मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून ज्ञानार्जन सुरू केले. तब्बल १२ वर्षे त्यांनी कठोर साधना केली. भाषा वेगळी असूनही, बुद्धिमत्ता आणि भक्तीच्या जोरावर त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची संपूर्ण ९ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. त्यांची हीच अफाट क्षमता पाहून दोन वर्षांपूर्वीच नामदेव शास्त्रींनी त्यांना आपला गादीचा वारसदार म्हणून निवडले. यापूर्वी त्यांनी पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे महंत म्हणूनही ३ वर्षे उत्तम कार्यभार सांभाळला.
आता आपण वळूयात या गडाच्या देदीप्यमान इतिहासाकडे, ज्याने महाराष्ट्राला सामाजिक समतेची नवी दिशा दिली. भगवानगडाची स्थापना राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी केली. सुरुवातीला भगवानबाबा हे बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे कार्यरत होते. मात्र, तिथे झालेल्या अंतर्गत मतभेदानंतर त्यांनी नारायणगड सोडण्याचा निर्णय घेतला. बाबा नगर- बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खरवंडी गावाजवळच्या एका ओसाड टेकडीवर आले. याच टेकडीला प्राचीन काळात ‘धौम्यगड’ म्हटले जायचं. जिथं पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषींनी तपश्चर्या केली होती.
१९५१ च्या विजयादशमीच्या दिवशी भगवानबाबांनी या गडाची पायाभरणी केली. या गडाच्या बांधकामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात सिमेंट किंवा लाकडाचा वापर न करता, पूर्णपणे पाषाणात हे बांधकाम करण्यात आले. मराठवाड्यातील लाखो ऊसतोड मजूर, गरीब शेतकरी आणि भाविकांनी स्वतःच्या पाठीवरून दगड वाहून, श्रमदानातून आणि पदरच्या पैशातून हा गड उभा केला. अखेर १ मे १९५८ रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचे भव्य उद्घाटन झाले. आणि त्यानंतर धौम्यगडाचे नाव ‘श्री क्षेत्र भगवानगड’ असे ठेवण्यात आले.
भगवानगड हा केवळ एक धार्मिक मठ नाही. तर तो ‘अठरापगड जातींचे ऐक्यपीठ’ आहे. भगवानबाबांनी या गडावरून लाखो ऊसतोड मजुरांच्या जीवनाला दिशा दिली. ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली केली, व्यसनमुक्तीची मोठी चळवळ चालवली. आणि पशुहत्या बंदीसारखे क्रांतीकारी निर्णय घेतले. गेल्या ७५ वर्षांत या गडाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. भगवानबाबांनंतर गादीवर आलेले दुसरे महंत भीमसिंह महाराज हे राजपूत समाजाचे होते. ज्यावरून या गडावर जात-पातीला अजिबात थारा नाही हे सिद्ध झाले. त्यानंतर आलेले तिसरे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी गडाचा शैक्षणिक आणि आध्यात्मिक विस्तार प्रचंड मोठा केला. या गडाचे राजकीय वजनही तितकेच मोठे आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी या गडावरून ऐतिहासिक ‘दसरा मेळाव्याची’ परंपरा सुरू केली. हा मेळावा इतका शक्तिशाली आहे की, मराठवाडा आणि महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार, हे या गडाच्या दसरा मेळाव्यातून ठरल्याची उदाहरणे आहेत. या गडावरून निघणारी पंढरपूर-आळंदी पालखी ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पालखी मानली जाते.
अनेक मठांमध्ये गादी आणि मालमत्तेवरून मोठे वाद कोर्टापर्यंत जातात. पण भगवानगडाची परंपरा वेगळी आहे. येथे मठाधिपती निवडताना जात, भाषा किंवा प्रांत पाहिला जात नाही. केवळ ‘योग्यता, ज्ञान आणि आध्यात्मिक अधिकार’ पाहिला जातो. यावेळचा गादी हस्तांतरणाचा सोहळा आणखी एका कारणाने खास ठरला. सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून, कोणताही डामडौल किंवा थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने हा पट्टाभिषेक सोहळा पार पाडला. नामदेव शास्त्री महाराजांनी स्वतः नूतन महंतांना गडाचा मानाचा फेटा बांधला. यापुढे नामदेव शास्त्री महाराज हे गडाचे बौद्धिक आणि मार्गदर्शकाचे काम पाहणार आहेत, तर कृष्णा महाराज शास्त्री गडाचा विस्तार आणि व्यवस्थापन सांभाळतील, असे सांगण्यात आले आहे.
तेलंगणातून आलेल्या एका उच्चशिक्षित तपस्वीला सर्वोच्च सन्मान देऊन भगवानगडाने संपूर्ण देशासमोर भाषाभेद आणि प्रांतभेद मिटवण्याचा एक अनोखा आदर्श ठेवला.





