Explained

‘या’ गावातील प्रत्येक जण पहिल्या महायुद्धात उतरला होता..! काय आहे ‘जेऊर’चा थरारक इतिहास?

मित्रांनो, जेव्हा- जेव्हा देशाच्या रक्षणाचा आणि शौर्याचा इतिहास लिहिला जातो, तेव्हा महाराष्ट्रातील एका गावाचं नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं जातं. आज आम्ही तुम्हाला एका अशा वीरभूमीची गोष्ट सांगणार आहोत, जिचा इतिहास ऐकून तुमची छाती अभिमानानं फुगेल. अंगावर काटा येईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वसलेलं एक असं गाव, जिथून एकाच वेळी तब्बल ७५ सैनिक थेट पहिल्या महायुद्धाच्या रणांगणावर उतरले होते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय… एक किंवा दोन नाही, तर तब्बल ७५ रणधुरंधर…. काही शत्रूचा थरकाप उडवून विजयी होऊन परत आले, तर काहींनी सातासमुद्रापार सर्वोच्च बलिदान दिलं.

आजही या ७५ वीरांची नावं गावच्या मुख्य वेशीवर एका ऐतिहासिक शिलालेखाच्या रूपाने दिमाखात उभी आहेत. पण जेऊर गावाची कथा फक्त एवढ्यावरच थांबत नाही. साक्षात अन्नपूर्णा माता म्हणजेच श्री बायजाबाईचा अद्भूत आणि प्राचीन इतिहास या गावाला लाभलाय. शिवाय या गावाच्या आसपासच उगम पावते जीवनवाहिनी मानली जाणारी सीना नदी… इतिहास, अध्यात्म आणि शौर्याचा हा थरारक प्रवास

चला तर मग, सर्वात आधी वळूयात या गावाच्या त्या रक्तरंजित आणि अत्यंत अभिमानास्पद लष्करी इतिहासाकडे. साल होतं १९१४ ते १९१९. संपूर्ण जग पहिल्या महायुद्धाच्या भीषण आगीत होरपळत होतं. ब्रिटिशांना भारतीय सैनिकांच्या शौर्याची नितांत गरज होती. आणि अशा ऐतिहासिक प्रसंगी, नगर तालुक्यातील जेऊर या गावातील तरुणांनी मागे न हटता थेट युद्धात उडी घेण्याचा निर्णय घेतला.

विचार करा, ज्या काळात दळणवळणाची कोणतीही साधनं नव्हती, परदेशात काय परिस्थिती आहे हे माहित नव्हतं, अशा काळात जेऊरमधील ७५ तरुणांनी सातासमुद्रापार जाऊन शत्रूशी दोन हात केले. या महायुद्धात काहींना वीरमरण आलं तर काही जण गावाची मान अभिमानाने उंच करून परतले. त्यांचीच नावे आज गावात असलेल्या एका शिलालेखावर कोरलेली आहेत.

पण जेऊरच्या मातीतील हा शौर्याचा गुण तिथेच थांबला नाही. पहिल्या महायुद्धानंतर १९६२ चं भारत-चीन युद्ध असो, १९६५ आणि १९७१ चं भारत-पाकिस्तान युद्ध असो, की स्वातंत्र्यलढा… प्रत्येक ठिकाणी जेऊरच्या जवानांनी शत्रूला धुळ चारली. अगदी १९९९ च्या कारगिल युद्धातही या पंचक्रोशीतील तरुण सीमेवर तैनात होते. याच मातीचे सुपुत्र बाबासाहेब वाघमारे यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली, ज्यांचं स्मारक आजही गावात प्रेरणा देत उभं आहे. कारगिल युद्धाच्या वेळी गावचा यात्रोत्सव असताना आणि अनेकांचे नुकतेच लग्न झाले असतानाही, देशसेवेची हाक येताच इथले जवान कुटुंब सोडून सीमेवर धावून गेले, हा अगदी अलिकडचा इतिहास आहे.

शौर्याच्या या गाथा ऐकल्यानंतर आता आपण वळणार आहोत जेऊरच्या भौगोलिक आणि नैसर्गिक महत्त्वाकडे… नगरसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी सीना नदी नक्की कुठे उगम पावते, हे तुम्हाला माहितीये का? या नदीचा मुख्य उगम जेऊरच्या अगदी जवळ असलेल्या ससेवाडी येथील डोंगररांगांमध्ये म्हणजेच सीनाशंकर डोंगरात होतो. निसर्गाच्या कुशीतून उगम पावणारा हा पाण्याचा छोटासा पवित्र प्रवाह ससेवाडीतून पुढे निघून जेऊर गावात प्रवेश करतो. पुढे ससेवाडी, जेऊर आणि पिंपळगाव उज्जैनी या तीनही परिसरांतील नैसर्गिक जलप्रवाह एकत्र येतात आणि तिथूनच सीना नदी खऱ्या अर्थाने प्रवाहीत होते. जेऊर परिसराला लाभलेले हे नैसर्गिक वरदान या गावाला अधिक समृद्ध आणि ऐतिहासिक बनवतं.

इतिहास आणि निसर्गाचा हा सुंदर मिलाफ अनुभवल्यानंतर आता वेळ आहे, जेऊरच्या अध्यात्मिक शक्तीची अनुभूती घेण्याची. जेऊर गावचे मुख्य ग्रामदैवत म्हणजे श्री बायजामाता मंदिर. जे गर्भगिरीच्या सुंदर डोंगरकड्यावर वसलेलं आहे. या मंदिराचा इतिहास अतिशय थक्क करणारा आहे. आख्यायिकेनुसार, शेकडो वर्षांपूर्वी बायजाबाई नावाची एक सामान्य आणि अत्यंत दयाळू मुलगी लग्न करून जेऊरला सासरी आली. एकदा ती आपल्या सासरच्या मंडळींसाठी शेतात भाकरी घेऊन जात असताना, वाटेत तिला काही भुकेलेले सैनिक आणि त्यांचे घोडे भेटले.

सैनिकांची अवस्था पाहून बायजाबाईने आपल्या जवळील भाजी-भाकरी त्यांना खायला दिली. आणि तिथेच एक मोठा चमत्कार घडला. सर्व सैनिकांनी आणि त्यांच्या घोड्यांनी तृप्त होईपर्यंत जेवण केलं, तरीही बायजाबाईच्या पात्रातील अन्न संपलं नाही. ती साक्षात अन्नपूर्णा देवीचे रूप ठरली. शेतावर असलेले सासरे बायजाबाईच्या शोधार्थ निघाले. तेव्हा बायजाबाई डोंगराच्या दगडांत लुप्त झाली. काही दिवसांनी तिने भक्तांना दृष्टांत दिला व त्यानंतर बायजाबाईचा हा स्वयंभू तांदळा प्राणप्रतिष्ठीत करण्यात आला, अशी आख्यायिका आहे.

याच बायजामातेचे तामिळनाडूच्या तंजावर शैलीत आणि आंध्रप्रदेशच्या कुशल कारागिरांनी कोरलेले भव्य गोपूर मंदीर जेऊरची शान वाढवतं. हे मंदीर नऊ मजली आहे. ९० फूट उंच असलेला हा सुवर्ण कळस दुरूनच नजरेत भरतो. दरवर्षी वैशाख पौर्णिमेला इथे ३ दिवसांची मोठी यात्रा भरते, जिथे वांगी-भाकरीचा महाप्रसाद वाटला जातो आणि महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या अटीतटीच्या कुस्त्या रंगतात.

तर मित्रांनो, असं आहे हे नगर जिल्ह्यातील जेऊर गाव. जिथे एका बाजूला साक्षात अन्नपूर्णा बायजामाता देवीचा आशीर्वाद आहे, दुसऱ्या बाजूला सीना नदीचा पावन उगम आहे, तर तिसऱ्या बाजूला पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंत देशासाठी छातीवर गोळ्या झेलणाऱ्या तब्बल ७५ शूर सैनिकांचा रक्तरंजित आणि अभिमानास्पद इतिहास आहे. शौर्य, अध्यात्म आणि निसर्गाचा असा त्रिवेणी संगम संपूर्ण महाराष्ट्रात केवळ जेऊरच्याच मातीत पाहायला मिळतो.

तुम्हाला जेऊर गावाचा हा थरारक इतिहास कसा वाटला, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याही गावात किंवा परिसरात असा एखादा लपलेला इतिहास असेल तर तो कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन आणि रोमांचक इतिहासासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button