Explained

आसामची ‘कामाख्या’ देवी थेट महाराष्ट्रात कशी आली? कामरगावचं ‘हे’ रहस्य ऐकून अंगावर काटा येईल!

भारताच्या पूर्वेला असलेलं आसामचं गुवाहाटी… तंत्र-मंत्र, अघोरी साधना आणि ५१ शक्तिपीठांपैकी सर्वात रहस्यमयी मानलं गेलेलं ‘कामाख्या’ देवीचं स्थान! पण… गुवाहाटीच्या अरण्यातील आणि नीलांचल पर्वतावरील ही तांत्रिक देवी, तिथून हजारो किलोमीटर दूर, थेट महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात कशी अवतरली?

प्रश्न ऐकून आश्चर्य वाटलं ना? वाटणारच… पण हे १०० टक्के खरंय..! महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर-पुणे रस्त्यावरील कामरगावात आसामच्या कामाख्या देवीचं एक अतिशय जागृत आणि प्राचीन स्थान आहे. फक्त तिला इथं ‘कामाक्षी’ देवी म्हणतात. पण… आसामची ही देवी थेट नगर जिल्ह्यात येण्याचा चमत्कार घडला कसा? या मागे एक अद्भूत आणि अंगावर काटा आणणारा इतिहास दडलाय. नवरात्रीच्या निमित्ताने आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. व्हिडीओत अनेक संदर्भ गुंफण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी कथा, लोककथा आणि काही लिखित संदर्भ आभ्यासलेत.

अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर, नगरपासून अवघ्या १५ ते १८ किलोमीटर अंतरावर वसलेलं हे ‘कामरगाव’. चोहीकडून डोंगर-टेकड्यांनी वेढलेलं हे गाव. दिसायला एखाद्या टुमदार हिल स्टेशनसारखं वाटतं. पण याचा इतिहास खूप खोल आहे. गावाच्या पूर्वाभिमुख वेशीवर शके ११०१ ची नोंद आहे, म्हणजेच हे गाव पेशवेकाळाच्याही आधीपासून अस्तित्वात आहे. पूर्वी या गावाला ‘विठ्ठलपूर’ म्हटलं जायचं. पण नंतर देवीच्या नावावरून याचं नाव ‘कामरगाव’ पडलं, असं काहींचं म्हणणं आहे.

या गावाची पाटीलकी वंशपरंपरेने आंधळे-पाटील घराण्याकडे आहे. ज्यांच्या गढ्या आणि शिलालेख आजही इथे पाहायला मिळतात. याच गावात नागनाथांचं भव्य पांडवकालीन मंदिर आहे. गावाजवळून वाहणाऱ्या वालुंभा नदीच्या उगमस्थानी तपश्चर्या करणारे वाल्मीक ऋषींचं स्थानही येथे आहे. या मंदिरांबद्दल आपण कधीतरी सखोल जाणून घेऊच, पण आता वळूयात आपल्या मुख्य प्रश्नाकडे… देवी आसाम सोडून महाराष्ट्रात कशी आली..?

तर मित्रांनो, याचं उत्तर दडलंय एका भक्ताच्या निस्सीम भक्तीत! आपण नेहमी पाहतो की भक्त देवाच्या दर्शनाला जातात, पण इथे साक्षात जगदंबा भक्ताच्या भेटीसाठी धावून आली. शेकडो वर्षांपूर्वी, कामरगावातील एक वयोवृद्ध भक्त आंधळे पाटील हे देवी कामाख्याच्या दर्शनासाठी दरवर्षी आसामला जात असल्याचं सांगितलं जातं. विचार करा, त्या काळात आजच्यासारखे रस्ते नव्हते की वाहने नव्हती. पायी किंवा घोड्यावरून हजारो किलोमीटरचा प्रवास करणं म्हणजे मृत्यूशी झुंज देण्यासारखं होतं. पण तरीही हे भक्त न चुकता कामाख्याच्या दर्शनाला जायचे. पुढं वय झाल्यामुळे एकदा त्यांना हा प्रवास अतिशय जड गेला.

मजल-दरमजल करत ते कसेबसे आसामच्या कामाख्या दरबारात पोहोचले. दर्शन तर झालं, पण प्रचंड थकव्यामुळे त्यांना जाणवलं की, आता पुन्हा एवढा प्रवास करून जिवंत घरी परतणं आपल्याला जमणार नाही. ते देवीच्या मूर्तीसमोर ढसाढसा रडू लागले. अतिशय व्याकुळ होऊन ते म्हणाले… “आई, ही माझी शेवटचीच भेट समज, आता मला नीट चालताही येत नाही…” देवीचं ते रूप डोळ्यात साठवून, जड अंतःकरणाने तो भक्त गावी परतला.

पण खरी लीला पुढे घडली. रात्री भक्ताच्या स्वप्नात साक्षात कामाख्या देवी प्रकट झाली. देवी म्हणाली, “तू माझ्या भेटीची चिंता करू नकोस. तुला चालता येत नाही ना? म्हणून मी स्वतः तुझ्या घरी राहायला आले आहे! पण लक्षात ठेव, मी इथे फक्त तुझी वैयक्तिक आराध्य म्हणून राहणार नाही. मी सगळ्या जगाची आई आहे. त्यामुळे माझ्यावर तुझा कुठलाही अधिकार दाखवू नकोस. तुझं हे घर मंदिराच्या रूपाने सगळ्यांसाठी खुलं कर, तरच मी इथे कायमची राहीन.”

त्या भक्ताने आनंदाने स्वप्नातच देवीला वचन दिलं. सकाळी उठून त्याने गावकऱ्यांना ही अद्भूत गोष्ट सांगितली. स्वतःचा राहता वाडा रिकामा केला. कुटुंबाला गोठ्यात हलवलं आणि जिथे देवीने जागा दाखवली होती, तिथे गावकऱ्यांच्या मदतीने देवीची स्थापना केली! आज जे मंदिर आपण पाहतो, ते खरं तर त्या भक्ताचं घर होतं. हा चमत्कार आजही कामरगावात जिवंत असल्याच्या अनेक खुणा आहेत. ज्या भक्ताच्या घरात देवी राहते, त्यांचे वंशज आजही स्वतःच्या दारात होळी पेटवत नाहीत; त्यांची होळी थेट देवीच्या मंदिरासमोर पेटते! देवीचे मुख्य मुखवटे आणि दागिने वर्षभर आंधळे पाटलांच्या देव्हाऱ्यात सुरक्षित असतात.

आता सर्वात थक्क करणारी गोष्ट…

आसाममधील कामाख्या देवीला तांत्रिक पूजेत मांसाहारी किंवा तामसिक नैवेद्य दाखवला जातो. पण, कामरगावातील तो भक्त शुद्ध शाकाहारी होता. आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी देवीने इथे स्वतःचा नैवेद्यच बदलला! होय, कामरगावात देवीला मांसाहार अजिबात चालत नाही. मांसाहार करून मंदिरात प्रवेश करायला सक्त मनाई आहे. जर कोणी तसा प्रयत्न केला, तर देवी त्याला लगेच कडक शिक्षा किंवा साक्षात्कार घडवते, असे अनेक थरारक अनुभव गावकऱ्यांनी घेतले आहेत, असंही म्हणतात…

कामरगावची आणखी एक मोठी विशेषता म्हणजे, इथे १८ पगड जातीचे आणि विविध धर्मांचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात. देवीला मनोभावे पूजतात. इतर मंदिरांमध्ये सुवासिनी महिलांची ओटी भरली जाते, पण कामरगावात पहिला मान असतो तो लहान कुमारिकांचा! वैशाख शुद्ध पंचमीला जेव्हा देवीची मोठी यात्रा भरते, तेव्हा गावातल्या प्रत्येक घरात पुरणपोळीचा नैवेद्य बनतो आणि मानाच्या ५ कुमारिकांना पुरणपोळी व साजूक तुपाचं जेवण देऊन ‘देवी स्वरूप’ म्हणून पूजलं जातं. श्रावणात इथे भव्य सप्ताह होतो, तर नवरात्रात नऊ दिवस देवीचा मोठा जागर केला जातो.

देवीने भक्ताला दिलेल्या वचनानुसार, ती आज संपूर्ण गावाची आणि जगाची माऊली बनून इथे वास करत आहे. हे देवस्थान नवसाला पावणारे अत्यंत जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तुमच्या मनात श्रद्धा आणि शुद्ध आचरण असेल, तर देवी भक्ताचे दुःख आणि पिडा नक्कीच दूर करते. मित्रांनो, तुम्हाला कामरगावच्या या जागृत आणि रहस्यमय देवस्थानाबद्दल आधी माहिती होती का? तुम्ही कधी या देवीचे दर्शन घेतले आहे का? किंवा तुमच्या परिचयातील कोणाला देवीचा काही अद्भूत अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा! अहिल्यानगर-पुणे रोडवर असलेल्या या देवीचे दर्शन तुम्हीही आयुष्यात एकदा नक्की घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button