Explained

मदर तेरेसांनी भेट दिलेली ‘मतमाऊली’ यात्रा कशी सुरु झाली? काय आहे हरेगावचा रहस्यमयी इतिहास!

मित्रांनो, महाराष्ट्रातल्या पंढरपूरची वारी तुम्ही पाहिली असेल. शिर्डीचे दर्शन घेतले असेल, जेजुरीचा खंडोबा पाहिला असेल… पण तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रात एक असंही गाव आहे ज्याला ‘मराठी ख्रिस्ती समाजाची पंढरी’ किंवा ‘महाराष्ट्राचे जेरुसलेम’ म्हटलं जातं..? एक असं गाव जिथे बैलपोळ्याला ख्रिस्ती शेतकरी आपल्या बैलांना सजवून चर्चमध्ये आणतात आणि तिथले युरोपियन फादर त्या बैलांवर पवित्र पाणी शिंपडून त्यांचे औक्षण करतात!

होय! आम्ही बोलतोय अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव बद्दल.. आणि तिथल्या जगप्रसिद्ध ‘मतमाऊलीच्या यात्रे’बद्दल! जिथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात लाखो ख्रिस्ती बांधव आणि इतर धर्मीय लोक एकत्र येतात. पण या गावाची उत्पत्ती कशी झाली? एका इंग्रज संचालकाचा या गावाशी काय संबंध होता? आणि मुंबईच्या वांद्रे येथील माऊंट मेरीचे रूपांतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ‘मतमाऊली’ मध्ये कसे झाले? हे सगळे रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत.

या कथेची सुरुवात होते विसाव्या शतकाच्या सुरुवातीला. श्रीरामपूर हे गाव तसं खूप जुनं नाही. गंगाराम डावखर नावाच्या एका बांधकाम कंत्राटदाराने रस्त्याचं काम करताना हे गाव वसवले होतं. याच विषयावर आम्ही एक स्वतंत्र व्हिडीओही केला होता. त्याची लिंक या व्हिडीओच्या कमेंट बाँक्समध्ये दिली आहे. तो व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला श्रीरामपूरचा जडणघडण समजेल. आता येऊ, आपल्या आजच्या विषयाकडे…

सुरुवातीला हरेगाव कारखान्याचा हा भाग अत्यंत दुष्काळी होता. शेतकऱ्यांना फक्त पावसाच्या पाण्यावर शेती करायची माहिती होती. पाटाने म्हणजेच कालव्याने पाणी देणे हे पाप समजले जायचे! पण १९१० च्या दशकात इंग्रज सरकारने ‘डेक्कन इरिगेशन स्कीम’ आणली आणि भंडारदऱ्याचे पाणी इथे पोहोचले. सुरुवातीला शेतकऱ्यांनी पाणी वापरायला नकार दिला, पण इंग्रजांनी लोकांच्या हातापाया पडून त्यांना पाण्याचा वापर करायला लावला. पुढे पुणे आणि इतर भागातून जगताप, गिरमे, ढाकले, ससे ही मंडळी इथे आली आणि त्यांनी ऊस शेती सुरू केली.

आता येतो या कथेचा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट! १९१७ मध्ये बेलापूर स्टेशनजवळ ब्रॅडी कंपनीने ‘बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अलाइड लिमिटेड’ नावाचा कारखाना सुरू केला. हा महाराष्ट्रातला पहिलाच खासगी साखर कारखाना होता! या कारखान्यामुळे गरिबी हटली आणि समृद्धी आली. या कारखान्याचा एक अतिशय लोकप्रिय इंग्रज संचालक होता, ज्याचे नाव होते ‘हॅरिसन’. याच हॅरिसन साहेबाच्या नावावरून या भागाला आधी ‘हरीगाव’ आणि नंतर ‘हरेगाव’ किंवा ‘बेलापूर फॅक्टरी’ हे नाव पडलं.!

सुरुवातीला कारखान्यात काम करणारे गरीब कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये म्हणजेच खोपटांमध्ये राहायचे. पण एक दिवस एका भीषण आगीत या सगळ्या झोपड्या जळून खाक झाल्या! पण म्हणतात ना, संकट हे संधी घेऊन येते. कारखाना व्यवस्थापन आणि युनियनने मिळून इथे देशातील एक सर्वोत्तम कामगार वसाहत निर्माण केली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण १९४० च्या दशकातच हरेगावमध्ये सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, कामगारांसाठी मोफत दवाखाना, मुलांसाठी शाळा आणि दूध डेअरी व कोंबडी पालन सारखे प्रकल्प सुरू होते! म्हणजेच, हरेगाव हे त्या काळातील एक अतिशय आधुनिक आणि श्रीमंत गाव बनले होते.

आता वळूयात या व्हिडिओच्या मुख्य मुद्द्याकडे – ‘मतमाऊलीची जत्रा’ कशी सुरू झाली?

कारखान्यामुळे हरेगाव आणि नगर जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी होती. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या वांद्रे येथे ‘माऊंट मेरी’चा प्रसिद्ध उत्सव असायचा. नगरच्या गरीब भाविकांना मुंबईला जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. बरेच जण सावकाराकडून हातउसने पैसे घेऊन मुंबईची वारी करायचे. सन १९४८ च्या ऑगस्ट महिन्यात काही नोंदींनुसार येथे १९३९ मध्ये फादर बादर आले. एका गरीब ख्रिस्ती व्यक्तीने माऊंट मेरीचा नवस फेडण्यासाठी मुंबईला जाण्याकरिता धर्मगुरू फादर गेरार्ड बादर यांच्याकडे पैसे मागितले. तेव्हा फादर बादर म्हणाले, “तुम्हाला नवस फेडण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही. तुमचा नवस इथे हरेगावातच फेडला जाईल. तुमच्या नवसातून तुम्हाला मुक्त करण्याचा अधिकार मला आहे.” त्यानंतर, ८ सप्टेंबर १९४७/१९४८ रोजी हरेगावमध्ये पहिल्यांदा या यात्रेची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते! पहिल्या जत्रेला फक्त ३०० भाविक होते.

आता पाहू हे नाव कसे बदलले?

इंग्रज गेल्यानंतर ग्रामीण भागातील भोळ्या-भाबड्या जनतेने इंग्रजी शब्द ‘माऊंट मेरी’ चा अपभ्रंश केला. ‘माऊंट’ चे झाले ‘मत’ आणि ‘मेरी’ चे झाले ‘माऊली’… आणि अशा प्रकारे जन्माला आली आपली लाडकी ‘मतमाऊली’!

फादर बादर यांच्यानंतर आलेले फादर जॉन हाल्दनर यांनी हरेगावात एक भव्य, टोलेगंज आणि अतिशय उंच शिखर असलेले ‘संत तेरेझा चर्च’ बांधले. या चर्चचे शिखर इतके उंच आहे की त्या काळी चर्चमधील जाडजूड घंटेचा आवाज आसपासच्या अनेक खेड्यापाड्यांमध्ये ऐकू जायचा. ही घंटा इतकी जड होती की ती वाजवण्यासाठी २-३ मुलांना तिच्या जाड तारेला लोंबकळावे लागायचे! जेव्हा लोकांना विचारले जायचे की चर्चचे शिखर एवढे उंच का? तेव्हा फादर म्हणायचे, “हे उंच शिखर ख्रिस्ती धर्माच्या प्रगल्भतेची जाणीव करून देते.”

या जत्रेचे स्वरूप महाराष्ट्रातील इतर कोणत्याही देवीच्या उरुसासारखे किंवा जत्रेसारखेच असते. मेरी माऊलीची पालखी म्हणजेच मिरवणूक बैलगाडीतून काढली जाते. गावातील महिला हातात आरती घेऊन, पायावर घागरी ओतून या मिरवणुकीचे स्वागत करतात. सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. लोक आपले आजारपण बरे व्हावे म्हणून माऊलीला मेणाचे हात, पाय किंवा पोट अर्पण करून नवस फेडतात! हरेगावच्या इतिहासातला सर्वात सुवर्णक्षण आला १९८६ साली, जेव्हा खुद्द मदर तेरेसा यांनी या ऐतिहासिक चर्चला भेट दिली होती!

विचार करा, ज्या गावाची ख्याती थेट मदर तेरेसांपर्यंत पोहोचली, ते ठिकाण किती पवित्र असेल. जुन्या काळात या यात्रेत रात्रीच्या वेळी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. संत तेरेझा शाळेचे शिक्षक मिळून रंगमंचावर ‘अश्रूंची झाली फुले’ सारखी प्रसिद्ध मराठी नाटके सादर करायचे. ज्यामध्ये चर्चच्या फादरनी देखील भूमिका केल्या आहेत! नाटक संपल्यावर मध्यरात्री गावोगावातून आलेल्या भजनी मंडळांच्या स्पर्धा रंगायच्या. दुसऱ्या दिवशी रविवारी कबड्डी आणि व्हॉलीबॉलच्या मॅचेस व्हायच्या.

आजच्या काळात दळणवळणाची साधने वाढल्यामुळे या यात्रेला लाखो भाविक देशभरातून हजेरी लावतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात जे स्थान पंढरपूरच्या वारीला आहे, तेच स्थान मराठी ख्रिस्ती समाजासाठी या मतमाऊलीच्या यात्रेला आहे. गेल्या ७०-८० वर्षांपासून ही परंपरा हरेगावच्या जनतेने हिंदू-ख्रिस्ती एकोप्याचे प्रतीक म्हणून जपली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button