Explained

तुकाराम महाराजांच्या मंडपाची आग, शेख महंमद महाराजांनी विझवली? काय होता ‘तो’ चमत्कार…

साधारणः १६४० ते १६४५ च्या दरम्यानचा काळ असावा… देहू गावात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू होते. हजारो भाविक तल्लीन झाले होते. आणि अचानक… एका कोपऱ्यातून मंडपाला आग लागली..! वाऱ्याच्या वेगाने ती आग संपूर्ण मंडपाकडे झेपावू लागली. लोक जीवाच्या आकांताने पळू लागले. तुकोबांचे कीर्तन थांबणार असं वाटत असतानाच, एक अद्भूत चमत्कार घडला!

देहूपासून तब्बल १५० किलोमीटर लांब असलेल्या, नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातही त्यावेळी एका मुस्लिम संतांचे प्रवचन सुरु होते. त्या मुस्लिम संतांनी अचानक आपले दोन्ही हात हवेत वर केले, जणू ते काहीतरी विझवत होते. ते हात एकमेकांवर घासून चोळू लागले. काही वेळातच श्रीगोंद्यातील त्या संतांचे हात आगीत भाजल्यासारखे काळे-ठिक्कर पडले. त्यांच्या हाताला जखमा झाल्या… श्रीगोंद्यातील भाविकांना नेमकं काय झालंय, हे कळेना. दुसऱ्या दिवशी श्रीगोंदेकरांना बातमी समजते, की काल देहूतील किर्तन मंडपाला आग लागली होती. श्रीगोंद्यातील त्या मुस्लिम संताला दिव्यत्वानं ती आग समजली होती. आणि ती विझवण्यात हातभार लावल्यानेच त्यांचे हातही भाजले होते…

मित्रांनो, हे सगळं अजब वाटतंय ना? कदाचित या दंतकथा असतील. पण त्याची इतिहासातील अनेक संदर्भात नोंद आहे. त्यामुळे त्या नोंदीची दखल आपल्याला घ्यावीच लागते. कुणाला ही दंतकथा वाटत असली तरी, श्रीगोंद्यातील त्या मुस्लिम संतांची महती त्यामुळे कमी होत नाही. कोण होते हे अंतर्ज्ञानी संत? ज्यांनी १५० किमी दूर बसून संत तुकाराम महाराजांचे प्राण वाचवले? आज आपण या व्हिडिओत श्रीगोंद्यातील याच संतांची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सर्वधर्मसमभावाचा धागा असलेली ही माहिती, तुम्हाला शक्यतो कुणी सांगणार नाही..!

मित्रांनो, कथा म्हणा किंवा दंतकथा म्हणा… पण आज आम्ही जी कथा सांगणार आहोत. त्या कथेतील हिरो आहेत, संत शेख महंमद महाराज… संत शेख महंमद यांचा जन्म झाला तोच मुळी एका सूफी परंपरेत. त्यांच्या वडिलांचे नाव राजं महंमद. आणि आईचे नाव फुलाबाई. त्यांचे घराणे मूळचे बीड जिल्ह्यातील धारूरचे. शेख महंमद महाराज हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या मातीत वाढताना त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा, विठ्ठल भक्तीचा आणि ज्ञानेश्वरीचा प्रचंड प्रभाव पडला. वारकरी संप्रदायात एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण ओळ प्रसिद्ध आहे :

“नामयाचा तुका, ज्ञानाचा एका आणि कबिराचा शेखा!”

याचा अर्थ असा की, संत नामदेवांचे उत्तराधिकारी तुकाराम महाराज झाले, संत ज्ञानेश्वरांचे कार्य जसे एकनाथ महाराजांनी पुढे नेले, तसेच संत कबीरांचे कार्य महाराष्ट्रात पुढे नेणारे ‘शेख महंमद’ होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांतील अंधश्रद्धा आणि कर्मठपणावर कडाडून प्रहार केले. त्यांच्या हृदयात जसा ‘अल्लाह’ होता, तसाच त्यांचा ‘गोविंद’ म्हणजेच विठ्ठलावरही अथांग विश्वास होता.

आता येऊयात आपल्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि ऐतिहासिक प्रसंगावर….

संत शेख महंमद महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यात अत्यंत घट्ट मैत्री होती, असे संदर्भ सापडतात. ते एकमेकांना ‘गुरुबंधू’ मानत. एकदा देहूमध्ये तुकोबांचे कीर्तन सुरू असताना त्यांच्या किर्तन मंडपाला आग लावली. मंडपात एकच कल्लोळ झाला. पण त्याच वेळी श्रीगोंद्यातही शेख महंमद महाराजांचे प्रवचन सुरु होते. शेख महंमद बाबांना आपल्या अंतर्ज्ञानाने ही घटना दिसली. त्यांनी तिथेच आपले हात हवेत घासून ती आग आध्यात्मिक शक्तीने विझवली.

आता या कथेला लिखित पुरावा काय आहे?

१८ व्या शतकात महाराष्ट्रातील संतांचे प्रामाणिक चरित्र लिहिणारे संत कवी महिपती महाराज यांनी त्यांच्या ‘भक्तविजय’ या प्रसिद्ध ग्रंथात या घटनेची सविस्तर नोंद केली आहे. पुढे या दोन्ही संतांची श्रीगोंद्यातच भेट झाल्याचेही दाखले काही इतिहासकार देतात.

आता हा चमत्कार फक्त मौखिक आहे, असे गृहित धरले तरी शेख महंमद महाराज हे केवळ चमत्कार करणारे संत नव्हते. तर ते प्रकांड पंडित आणि उच्च दर्जाचे साहित्यिक होते. त्यांनी मराठी भाषेत अत्यंत उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे ‘योगसंग्राम’. योगसंग्राम’ व्यतिरिक्त ‘पवनविजय’, ‘निस्सीमबोध’ हे ग्रंथ आणि शेकडो अभंग त्यांनी लिहिले. त्यांची मराठी भाषा इतकी शुद्ध आणि रसाळ आहे की, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवताच्या तोडीची ती मानली जाते.

संत शेख महंमद महाराजांचे महात्म्य एवढे मोठे होते की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी १५९५ च्या सुमारास शेख महंमद बाबांचे मोठेपण ओळखून त्यांना श्रीगोंद्यात मोठा मठ बांधून दिला होता. जमिनीची सनद इनाम दिली होती. इतकेच नाही, तर पुढे जाऊन छत्रपती घराण्याने आणि पेशव्यांनी देखील या मठाला नेहमीच राजाश्रय दिला. आजही श्रीगोंद्यातील मठात ती ऐतिहासिक कागदपत्रे आणि परंपरा जतन करून ठेवलेली पाहायला मिळते. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन औरंगजेबाने तब्बल ४०० एकर जमीन बाबांसाठी दिल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांत सापडतो.

आज शेकडो वर्षे झाली, तरीही श्रीगोंदा शहरात संत शेख महंमद महाराजांची संजीवन समाधी दिमाखात उभी आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इथे हिंदू बांधव महाराजांना ‘संत’ म्हणून पूजतात आणि मुस्लिम बांधव त्यांना ‘बाबा’ म्हणून मानतात. एकाच वास्तूत सुफी फकिरी आणि वारकरी संप्रदायाचा विठ्ठल गजर एकत्र घुमतो. आजच्या काळात, जिथे समाजात जाती-धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात आहेत, तिथे संत शेख महंमद महाराज हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि शांततेचा सर्वात मोठा दीपस्तंभ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button