Explained

‘केदारेश्वर महादेव मंदिरा’चं रहस्य काय? ३ खांब तुटलेत, ४था तुटला तर जग बुडेल का?

सोशल मीडियावर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल… जिथे दावा केला जातोय की जगाचा विनाश करणारी उलटी गिनती सुरू झालीय..! एका अशा मंदिराचा व्हिडिओ, जिथे चार खांबांपैकी ३ खांब आधीच कोसळले आहेत आणि संपूर्ण महाकाय डोंगर केवळ एका खांबावर टिकून आहे! इंटरनेटवर दावा केला जातोय की, ज्या दिवशी हा चौथा खांब कोसळेल, त्या दिवशी या पृथ्वीचा अंत होईल, महाप्रलय येईल! मित्रांनो, हा व्हिडीओ फक्त मराठी यूट्यूबरच नाही, तर अनेक हिंदी, इंग्रजी, मल्याळम आणि सर्वच भाषांतील यूट्यूबर्सनी केला आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरातील अनेकांचं टेन्शन वाढलंय. पण मित्रांनो, या व्हिडीओत दाखवलं गेलेलं मंदीर हे दुसरं-तिसरं कुठं नसून ते अहिल्यानगर जिल्ह्यातलं आहे… होय, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या याच मंदीरातील काही रहस्यांनी व दाव्यांनी जगाचं टेन्शन वाढवलं… आज आपण हे मंदीर, त्याबाबतचे दावे आणि सत्य हे सगळं पाहणार आहोत.

मित्रांनो, सर्वात आधी हा व्हिडीओ काय आणि व्हायरल दाव्या काय? ते समजून घेऊयात. सर्वात आधी एक मोठी गल्लत दूर करूया. अनेक व्हायरल पोस्टमध्ये व्हिडीओत दाखवलेल्या मंदिराला कळसूबाई शिखरावरील मंदिर म्हटलं जातं. पण ते चुकीचं आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यात असलेल्या हरिश्चंद्रगडावर स्थित आहे. याला ‘केदारेश्वर गुहा’ किंवा ‘केदारेश्वर महादेव मंदिर’ असं म्हटलं जातं. हरिश्चंद्रगड हा केवळ एक किल्ला नाही. तर तो एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चमत्कार आहे. कलचुरी आणि राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात, म्हणजेच साधारणपणे ६ व्या ते ११ व्या शतकाच्या दरम्यान या गुहेची आणि मंदिराची निर्मिती झाली असावी, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. या गुहेच्या मध्यभागी साधारण पाच ते सहा फुटांचे एक अतिशय प्राचीन आणि भव्य शिवलिंग आहे. पण या गुहेची रचना इतकी अद्भुत आहे की, जी पाहिल्यानंतर आजचे आधुनिक विज्ञानही चक्रावून जाते!

आता येऊया त्या मुख्य रहस्यावर, ज्याने संपूर्ण इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. या केदारेश्वर गुहेच्या चारी कोपऱ्यात कधीकाळी चार महाकाय खांब होते. पण आज तुम्ही तिथे गेलात, तर तुम्हाला दिसेल की तिथले ३ खांब पूर्णपणे तुटलेले आहेत. हा संपूर्ण डोंगर, हा प्रचंड खडक आता केवळ एकाच खांबावर उभा आहे. पौराणिक कथा आणि स्थानिक मान्यतेनुसार, हे चार खांब म्हणजे हिंदू धर्मातील चार युगांचे प्रतीक आहेत :

सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग…

असे मानले जाते की, जेव्हा जेव्हा एका युगाचा अंत झाला, तेव्हा त्या युगाचे प्रतिनिधित्व करणारा खांब आपोआप कोसळला!
१. जेव्हा सत्ययुग संपले, तेव्हा पहिला खांब कोसळला.
२. जेव्हा त्रेतायुग संपले म्हणजेच प्रभू श्रीराम अवतरले तेव्हा दुसरा खांब कोसळला.
३. आणि जेव्हा द्वापरयुग संपले म्हणजे भगवान श्रीकृष्ण अवतरले, तेव्हा तिसरा खांब कोसळला.

आता जे युग सुरू आहे, ते आहे ‘कलियुग’. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आज गुहेत जो एकमेव खांब शिल्लक आहे, तो याच कलियुगाचा खांब आहे! लोकांची अशी ठाम श्रद्धा आहे की, ज्या दिवशी कलियुगातील पाप आणि अनाचार पराकोटीला जाईल, त्या दिवशी हा चौथा खांबही कोसळेल. आणि संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल, म्हणजेच महाप्रलय येईल!

मित्रांनो, ही झाली धार्मिक आणि पौराणिक मान्यता. पण विज्ञानाच्या नजरेतून पाहिले, तर इथे अशा काही गोष्टी घडतात ज्याची उत्तरं आजही कोणाकडेच नाहीत!
-पहिले आश्चर्य –
बारमाही बर्फासारखे थंड पाणी :
या गुहेत शिवलिंगाच्या चारी बाजूंना वर्षभरात कधीही जा, तिथे तुम्हाला कंबरभर पाणी साचलेले दिसेल. हे पाणी इतके थंड असते की हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात तिथे पाच मिनिटे उभे राहणेही कठीण होतं. उन्हाळ्यात जेव्हा महाराष्ट्रात ४०-४२ अंश तापमान असतं, तेव्हाही या गुहेतील पाणी आटत नाही! आणि पावसाळ्यात जेव्हा मुसळधार पाऊस असतो, तेव्हाही हे पाणी कायम असतं! हे पाणी नेमके कुठून येतं आणि कुठं जातं? याचा शोध आजपर्यंत वैज्ञानिकही लावू शकलेले नाहीत.
-दुसरे आश्चर्य –
वास्तुकलेचा अद्भूत नमुना :
ज्यांनी हे मंदिर हजारो वर्षांपूर्वी कोरले, त्यांचे तंत्रज्ञान किती प्रगत असेल याचा विचार करा. ३ खांब कोसळल्यानंतरही, त्या डोंगराचा कोट्यवधी टनाचा भार या एकाच खांबाने कसा पेलला आहे? गुरुत्वाकर्षण आणि स्थापत्यशास्त्राचा हा एक असा चमत्कार आहे, जो थक्क करून सोडतो.

आता प्रश्न येतो, सोशल मीडियावरील तो दावा किती खरा आहे की ‘हा खांब आता कधीही पडू शकतो आणि जग संपणार आहे?’ वास्तविक पाहता, पुरातत्व विभाग आणि भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हे खांब निसर्गाच्या वेगवेगळ्या बदलांमुळे, पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे आणि हजारो वर्षांच्या हवामानामुळे झिजून कोसळले असण्याची दाट शक्यता आहे. राहिला प्रश्न चौथ्या खांबाचा, तर त्याची अवस्थाही आता पाण्याच्या सततच्या संपर्कामुळे थोडी जीर्ण झाली आहे. म्हणूनच पुरातत्व विभागाने या खांबाला लोखंडी आधार दिला आहे, जेणेकरून हा ऐतिहासिक वारसा जिवंत राहील. पण तरीही, स्थानिक लोकांची श्रद्धा आणि निसर्गाचा हा अद्भूत ताळमेळ यामुळे या मंदिराचे गूढ कमी होत नाही. कलियुगाच्या अंताची गोष्ट खरी असो वा नसो, पण निसर्गाची ही रचना आपल्याला नक्कीच थक्क करते.

तर मित्रांनो, हे होते हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहेचे आणि त्या तीन कोसळलेल्या खांबांचे संपूर्ण सत्य. महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, जी आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव करून देतात. मित्रांनो तुम्हाला या मंदीराबाबत काय वाटते? हा चौथा खांब केवळ निसर्गाचा चमत्कार आहे की खरोखरच कलियुगाच्या अंताची उलटी गिनती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button