जनतेच्या हक्काचा पैसा, गरिबांच्या हक्काचे शासकीय अनुदान आणि थेट शासकीय तिजोरीवरच डल्ला मारणारा एक धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आला. राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील वादग्रस्त महिला तलाठी मंगल रूपचंद गुसिंगे हिला अखेर राहुरी पोलिसांनी अटक केली. गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारी ही महिला तलाठी अचानक ५ सप्टेंबर २०२६ रोजी राहुरी पोलिसांसमोर शरण आली. पण मित्रांनो, हे प्रकरण केवळ एका तालुक्यापुरतं किंवा काही लाखांपुरतं मर्यादित नाही. पोलीस तपासात या महिला तलाठीबाबत जे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, ते ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. या तपासातून जालन्यातील भ्रष्टाचाराचे धागेदोरे कसे उघड झाले?
सगळ्यात आधी बोलूयात, राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील पहिल्या गुन्याबद्दल… मंगल रूपचंद गुसिंगे ही माहेगाव येथे सजा तलाठी म्हणून कार्यरत होती. या कार्यकाळात, २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि लाभार्थ्यांसाठी ‘मदत व सानुग्रह अनुदान’ मंजूर झाले होते. परंतु, तलाठी मंगल गुसिंगे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता, बोगस कागदपत्रे आणि नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करून तब्बल ३ लाख ६५ हजार ३४० रुपयांचे शासकीय अनुदान भलत्याच व्यक्तींना वितरित केले.
महसूल विभागाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीने जेव्हा माहेगावच्या दप्तराची तपासणी केली, तेव्हा हा नियमबाह्य वाटपाचा घोटाळा उघडकीस आला. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार आणि राहुरीच्या तत्कालीन तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केल्यानंतर, मंडल अधिकारी विजय बबनराव बेरड यांच्या फिर्यादीवरून एप्रिल 2026 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच ही महिला तलाठी शासकीय कर्तव्यावरून गायब होऊन भूमिगत झाल्याचे बोलले गेले.
आता येतो या प्रकरणाचा सर्वात मोठा आणि थरारक भाग! पोलीस तपासात अधिकृतपणे समोर आले आहे की, एप्रिल २०२६ मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून ही महिला तलाठी तब्बल ६ महिने फरार होती. या फरार कालावधीत तिने पोलिसांना चकवा देण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या, हे आता तपासात उघड झाले आहे.
पहिली बाब – कायदेशीर पळवाटा : पोलीस तपासात समोर आले की, गुन्हा दाखल होताच अटक टाळण्यासाठी तिने वकिलांमार्फत न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे समजते. मात्र अपहाराचे गांभीर्य पाहून न्यायालयाने तिचा जामीन फेटाळल्याच्याही चर्चा आहेत.
दुसरी बाब – वारंवार लोकेशन बदलणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहत नव्हती. पोलिसांचे सायबर सेल तिच्या मोबाईल लोकेशनवर पाळत ठेवून होते, मात्र ती अत्यंत हुशारीने पोलिसांना गुंगारा देत होती, असेही बोलले जातेय.
तिसरी बाब – वरदहस्ताचा संशय : पोलीस तपासात हा सर्वात मोठा संशय व्यक्त केला जात आहे की, एक सामान्य शासकीय कर्मचारी तब्बल ६ महिने पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर कसा राहू शकतो? तिला प्रशासकीय किंवा राजकीय वर्तुळातून पडद्यामागून मोठी आर्थिक रसद आणि कायदेशीर सल्ले मिळत होते का याचाही तपास आता सुरु आहे.
अखेर पोलिसांचा वाढता तांत्रिक आणि कायदेशीर दबाव, तसेच सर्व बाजूने झालेली कोंडी पाहता, ५ सप्टेंबर २०२६ रोजी ही महिला तलाठी स्वतःहून राहुरी पोलीस ठाण्यात शरण आली. पोलिसांनी तात्काळ तिला ताब्यात घेतले आणि अटक केली. पण खरी खळबळजनक माहिती तर तिच्या अटकेनंतर झालेल्या पोलीस चौकशीत समोर आली! राहुरी पोलिसांच्या तपासात उघड झाले की, ही महिला तलाठी केवळ राहुरी पुरती मर्यादित नाही. यापूर्वी ती जेव्हा जालना जिल्ह्यात तलाठी म्हणून कार्यरत होती, तिथेही तिने भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता.
जालन्यात असताना काही वरिष्ठ आणि कनिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून, त्यांच्याशी आर्थिक संगनमत करून मंगल गुसिंगे हिने तब्बल १२ लाख २४ हजार ८०२ रुपयांच्या शासकीय निधीची अफरातफर केली असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. आता हे आरोप किती खरे व किती खोटे हे, लवकरच समोर येईल. पण, एकाच शासकीय कर्मचाऱ्याने दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत शासकीय निधी गायब करणाऱ्या या पॅटर्नने मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
मित्रांनो, पोलीस तपासातील या धक्कादायक खुलाशानंतर काही अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतात:
१. यंत्रणेतील मिलीभगत : जालना आणि राहुरी, या दोन्ही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवाय किंवा मंजुरीशिवाय एवढा मोठा निधी बँकेतून कसा निघू शकतो?
२. ऑडिट यंत्रणेचे अपयश : डिजिटल प्रणाली आणि ‘डीबीटी’ च्या युगातही असा गैरवापर उघडकीस यायला इतका वेळ का लागतो? वार्षिक ऑडिटमध्ये हे प्रकार आधी का समोर आले नाहीत?
३. फरार काळातील मदतगार कोण?: ६ महिने तिला लपवून ठेवणारे, आश्रय देणारे आणि पोलिसांपासून वाचवणारे पाठीराखे कोण होते? पोलीस तपासात यांचीही नावे समोर येणे गरजेचे आहे.
सध्या राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे तपास पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मंगल गुसिंगे हिच्या पोलीस कोठडीत जालन्यातील त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे समोर येणार का? अपहार केलेली ही रक्कम वसूल होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते?





