Explained

अहिल्यानगरची वाघीण..!जिनं पतीसाठी, एका भुयारी वाड्यात ३० इंग्रजांना मातीखाली गाडलं…

शौर्याचा इतिहास म्हटला की, आपल्याला झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराबाई किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी आठवतात. पण… याच मातीत अशीही एक रणरागिणी जन्माला आली, जिने आपल्या पतीच्या रक्षणासाठी आणि मराठेशाहीच्या अब्रूसाठी हातात भाला घेतला… बरं, नुसता भाला घेतला नाही, तर तिनं एकटीनं तब्बल ३० इंग्रज सैनिकांना यमसदनी पाठवलं..! होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय… या एकट्या विरपत्नीनं ३० गोऱ्या सैनिकांना नरकात पाठवलं. इंग्रजांचा काळ बनलेली या माऊली म्हणजे… मराठेशाहीचा शेवटचा आधारस्तंभ असलेल्या सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या वीरपत्नी लक्ष्मीबाई डेंगळे! आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या पानात हरवलेल्या याच अद्भूत रणरागिणीची थरारक शौर्यगाथा पाहणार आहोत. तर चला, इतिहास अनुभवूया…

ऐतिहासिक व्हिडीओ सुरु करताना पुन्हा एक आठवण… आम्ही आमच्या व्हिडीओचे संदर्भ जेवढे अचूक होतील, तेवढे घेत असतो. आजचा व्हिडीओ आ. बा. जोशी आणि आबा चांदोरकर यांच्या “श्रीशिवशाहीचा लेखनालंकार” या ग्रंथातील काही मुद्यांवरुन व काही ऐतिहासिक दत्यावेजावरुन घेतलेला आहे. व्हिडीओतील सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या वीरपत्नीच्या नावाबाबत साशंकता आहे. इतिहासाच्या मुख्य प्रवाहात या पराक्रमी रणरागिणीचे नाव अधिकृतपणे स्पष्टपणे नोंदवले गेलेले नाही. बहुतांश इतिहासकार आणि ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख केवळ ‘सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या वीरपत्नी’ असाच केलेला आहे. स्थानिक पातळीवर काही जुन्या लोककथा व सोशल मीडियावरील इतिहास अभ्यासकांच्या संदर्भांनुसार, त्यांचे नाव लक्ष्मीबाई डेंगळे असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आम्हीही या व्हिडीओत त्या वीरपत्नीचे नाव लक्ष्मीबाई डेंगळे असेच नोंदवले आहे. नावात बदल असल्यास आम्हाला तो कमेंट बाँक्समध्ये नक्की कळवा…

तर चला, कथा सुरु करुयात…

या कथेची सुरुवात होते, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ‘निमगाव जाळी’ या गावातून. याच गावात जन्मलेले एक सामान्य शेतकरी पुत्र म्हणजे त्रिंबकजी डेंगळे. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या, अचाट साहसाच्या आणि स्वामीनिष्ठेच्या बळावर त्रिंबकजींनी थेट दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या दरबारात कारभारी म्हणून सर्वोच्च स्थान मिळवले. मराठा साम्राज्य पेशवाईच्या उत्तरार्धात, अंतर्गत फितुरीने इंग्रजांच्या जाळ्यात अडकले होते. तेव्हा इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा एकच माणूस पुण्यात होता, तो म्हणजे त्रिंबकजी डेंगळे! इतिहासकार त्यांना ‘मराठेशाहीचा शेवटचा आधारस्तंभ’ म्हणतात. कारण, इंग्रज भारतात पाय रोवू पाहत असताना त्रिंबकजींनी त्यांना रोखण्यासाठी संपूर्ण देशात बंडाची ठिणगी टाकली होती.

इसवीसन १८१८ च्या सुमारास, कोरेगावच्या युद्धानंतर इंग्रजांनी संपूर्ण महाराष्ट्रावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्रिंबकजींनी इंग्रजांसमोर गुडघे टेकले नाहीत. ते नाशिक जिल्ह्यातील निफाड जवळील आपल्या सासुरवाडीला, म्हणजेच ‘आहेरगाव’ येथील एका भुयारी वाड्यात गुप्तपणे राहून इंग्रजांविरुद्ध बंडाची आखणी करत होते. त्यापूर्वी त्यांनी ठाण्याच्या किल्ल्यातून इंग्रजांच्या कैदेतून सुटून पुन्हा स्वराज्य अबाधित ठेवण्याचा एकहाती प्रयत्न सुरु ठेवला होता. पण, नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्रिंबकजींच्याच एका ‘नाना’ नावाच्या फितूर सेवकाने आणि वाड्यात कामाला असणाऱ्या एका महिला सेवेकऱ्याने इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याला त्रिंबकजींच्या या गुप्त ठिकाणाची माहिती दिली. माहिती मिळताच, कॅप्टन स्वान्स्टन हा तब्बल एक हजार घोडदळाची बलाढ्य पलटण घेऊन पहाटेच्या अंधारात आहेरगावात दाखल झाला आणि त्यांनी संपूर्ण वाड्याला वेढा घातला! काही सैनिकांनी बाहेर गावालाही वेढा घातला. वाड्याच्या आत त्रिंबकजी एकटेच होते, त्यांच्याकडे कोणतीही फौज नव्हती. इंग्रजांनी संपूर्ण वाडा दोनदा शोधला, पण त्रिंबकजी सापडले नाहीत. त्रिंबकजी या वाड्यातच आहेत, ही पक्की बातमी इंग्रजांना होती. त्यामुळे त्यांनी तिसऱ्यांदा संपूर्ण वाड्याचा शोध घेतला. वाड्यातील गुप्त जागा, बळदी, तळघर, कोठी, भुयारी मार्ग… असं सगळं पुन्हा पुन्हा शोधलं जात होतं. तिसऱ्यांदा वाड्याचा शोध घेत असताना, इंग्रजांना धान्याच्या कोठारात एक लोखंडी चोर दरवाजा सापडला. ज्याच्या पलीकडे बुरुजावर जाणारा जिना होता. जिन्याच्या वर भिंत होती. व तेथूनच इंग्रजांना काहीतरी खोदत असल्याचा आवाज येत होता. इंग्रजांनी व्यवस्थित पाहणी केल्यावर याच जिन्यावरचा दरवाज्याजवळची भिंत फोडून त्रिंबकजी बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे इंग्रजांच्या ध्यानात आले.

इंग्रज सैनिक त्या जिन्यावरून त्रिंबकजींना पकडण्यासाठी वर चढू लागले. पण… त्याच वेळी जिन्याच्या तोंडाशी पुरुषी वेशात, कमरेला शेकडो भाले बांधून एक योद्धा काळ बनून इंग्रजांपुढे उभा राहिला! जो सैनिक वर चढायचा, त्याचा छातीचा किंवा गळ्याचा वेध तो भाला घ्यायचा! सपाक… सपाक… असा भाल्याचा सळसळाट सुटला की गोरे सैनिक जिन्यावरून रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळायचे! एक… दोन… तीन… नव्हे, तर तब्बल ३० गोऱ्या इंग्रज सैनिकांना या वीराने आपल्या भाल्याच्या टोकावर यमसदनास पाठवले! आता पुढे जाण्याची हिम्मत कुणीच करेना. अरुंद रस्ता आणि त्यात अंधार… यामुळे इंग्रज पुरते हैरान झाले. कॅप्टन स्वान्स्टन बाहेर उभा राहून हे पाहत होता, त्याचे डोळे पांढरे झाले होते. सरळ लढाईत या भालाईताला हरवणे अशक्य आहे, हे इंग्रजांच्या लक्षात आलं.

शेवटी, वैतागलेल्या कॅप्टन स्वान्स्टनने आपल्या सैनिकांना थेट गोळ्या झाडण्याचा आदेश दिला. बंदुकीच्या गोळ्या लागल्या आणि तो महान योद्धा रक्ताच्या थारोळ्यात जिन्यावर कोसळला. कॅप्टन स्वान्स्टन आणि त्याचे सैनिक धावत जिन्यावरून वर गेले. जेव्हा त्यांनी त्या मृत योद्ध्याच्या डोक्यावरचे पागोटे हटवले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला..! तो कोणी पुरुष सैनिक नव्हता, तर ती पुरुषी वेशातील खुद्द सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची पत्नी लक्ष्मीबाई डेंगळे होती..! आपल्या पतीला सुरक्षित बाहेर पडण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या या माऊलीचे शौर्य पाहून खुद्द शत्रू असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनीही तिच्यासमोर आदराने डोके टेकवले. आपल्या पत्नीचे हे बलिदान पाहून आणि पुढे जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे पाहून, अत्यंत जड अंतःकरणाने त्रिंबकजी इंग्रजांच्या स्वाधीन झाले. इंग्रजांनी त्रिंबकजींना अटक करून थेट बंगालमधील चुनारगडच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. पण, आहेरगावच्या त्या वाड्यात लक्ष्मीबाईंनी रचलेला तो रक्ताचा इतिहास आजही आपल्याला विचारतोय… की आपण आपल्या या रणरागिणींना विसरलो का..? दुर्दैवाने आपल्या शालेय पुस्तकात या वीरांगनेचे नाव आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button