Explained

पहिला गनिमीकावा, राजे शरिफजींचं बलिदान…. काय होती भातोडीची लढाई?

वर्ष होतं, १६२४..! मोगल आणि आदिलशाहीची ८० हजारांची अथांग फौज महाराष्ट्रावर चालून आली होती. तेव्हा अहमदनगर हे निजामशाहीचं मुख्य केंद्र होतं. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर आणि अवघे काही मराठा सैनिक या महासंकटासमोर उभे होते. पण मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याच सालानं भारतीय इतिहास कायमचा बदलला! मोगल आणि आदिलशाहीला हादरवून सोडणारा आणि जगातील पहिला भव्य गनिमी कावा याच युद्धात खेळला गेला. ही कहाणी आहे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या अचाट बुद्धिमत्तेची, भोसले घराण्याच्या रक्ताच्या आहुतीची आणि स्वराज्याच्या खऱ्या पायाभरणीची! चला जाणून घेऊया… नगर शहराजवळच्या ऐतिहासिक ‘भातवडीच्या लढाईचा’ थरारक इतिहास!”

अगोदर, या लढाईच्या वेळचा इतिहास समजून घेऊ.. साल होतं १६२४ चं. अहमदनगरची निजामशाही मुळापासून उखडून टाकण्यासाठी दिल्लीचा मोगल बादशहा जहांगीर आणि विजापूरचा सुल्तान आदिलशहा हे एकत्र आले होते.
-मोगलांचा मुख्य सेनापती लष्कर खान
-अदिलशाहीचा मुख्य सेनापती मुल्ला मोहम्मद लारी
-इखलास खान आणि फर्हाद खान यांच्यासारखे वजीर. शिवाय निजामशाहीचे शत्रू असलेले राजे निंबाळकर आणि घाटगे हे सरदारही निजामशाहीविरुद्ध एकत्र आले होते. याच संयक्त ८० हजारांच्या फौजेनं नगरकडे कूच केली होती.

ही माहिती निजामशाहीत अहमदनगरला येऊन धडकली.

-तेव्हा निजामशाहीत मुख्य वजीर होता मलिक अंबर
-आणि निजामशाहीत सगळ्यात शूर सरदार होते शहाजीराजे भोसले
-याच सैन्यात आपल्या अतूल्य पराक्रमासाठी ओळखले जाणारे शहाजीराज्यांचे धाकटे बंधू शरीफराजे भोसलेही होते. शिवाय मलिक अंबर आणि शहाजीराजांना साथ द्यायला खेळोजी भोसले, मालोजी भोसले, काकडे असे इतर सरदारही होते. परंतु हे सगळं असूनही शहाजीराजांकडे होती फक्त १५ ते २० हजारांची फौज…

१६२४ चा ऑक्टोबर महिना होता. दोन्ही फौजा अहमदनगरजवळील भातोडी येथे आमनेसामने आल्या. शत्रूचा तळ विस्तीर्ण मैदानात होता. शत्रूला आपल्या अफाट संख्येचा माज होता. मुल्ला मोहम्मद लारी पूर्णपणे गाफील होता. पण शहाजीराजांची नजर काही वेगळंच टिपत होती. भातवडी गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर त्या काळात एक मातीचा मोठा बंधारा बांधला होता. पावसाळा नुकताच संपल्यानं या बंधारा कम धरणात, तुडुंब पाणी साठलेलं होतं. शहाजीराजे आणि मलिक अंबरनं आता निसर्गालाच आपलं शस्त्र बनववायचं ठरवलं. कारण समोर शत्रूचं लाखाच्या घरातलं सैन्य होतं, तर निजामशाहीकडे इन-मिन १५ ते २० हजार लढवय्ये होते.

आता शहाजीराजांच्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरु झाला. काहीही करुन निजामशाही वाचवायचा मुद्दा त्यांच्या डोक्यात घोळू लागला. शत्रूचं सैन्य कुठं थांबलंय, हे शहाजीराजांना माहित होतं. शहाजीराजांकडं मराठा सैन्याची कमान होती. एका रात्री त्यांनी मराठा मावळ्यांना सोबत घेत, गुप्तपणे त्या धरणाची भिंतच फोडली! मोगलांचं सैन्य गाढ झोपेत होतं. पण अचानक धरणाचं पाणी आल्यानं हे सैन्य सैरभैर झालं. लाखो गॅलन पाणी अचानक मोगल-आदिलशाहीच्या छावणीत घुसलं..! तोफा, हत्ती आणि घोडे चिखलात रुतून बसले. मोगल छावणीत एकच हाहाकार उडाला. कित्येक सैनीक वाहून गेले. कित्येक चिखलात गुदमरून मेले. भारतीय युद्धाच्या इतिहासातील हा पहिला भव्य गनिमी कावा होता, ज्याने शत्रूला लढण्यापूर्वीच हतबल केले होतं!

चिखलात अडकलेल्या शत्रूवर शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांनी आपल्या घोडदळासह वादळासारखा हल्ला केला! तलवारी खणखणू लागल्या. या घनघोर युद्धात वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी राजे शरीफजी भोसले शत्रूचे सैन्य कापत पुढे सरकत होते. इतिहासकार सांगतात की, शरीफजीराजे हे आदिलशाहीच्या आघाडीच्या तुकडीवर तुटून पडले. अत्यंत अटीतटीच्या संघर्षात शत्रूचे बलाढ्य सरदार आणि त्यांच्या सैन्याने शरीफजींना चारी बाजूंनी वेढले. अनेक शत्रूंना कंठस्नान घालत असतानाच, शत्रूच्या जोरदार वारामुळे राजे शरीफजी भोसले यांना वीरमरण आले!

या तरुण मराठा वीराने निजामशाही वाचवण्यासाठी आणि भोसले घराण्याच्या सन्मानासाठी आपल्या रक्ताची आहुती दिली. आपल्या सख्ख्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच शहाजीराजांच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू दाटले. दुःखाचे रूपांतर क्रोधात झाले! शहाजीराजे काळभैरवासारखे शत्रूवर तुटून पडले. त्यांनी आदिलशाहीचा मुख्य सेनापती मुल्ला मोहम्मद लारी याला रणांगणात जागेवरच ठार केले. मोगलांचा मुख्य सेनापती लष्कर खान याला मराठ्यांनी जिवंत कैद केले. शत्रूचे उरलेले सरदार पळून गेले आणि मराठ्यांनी एक ऐतिहासिक, अशक्यप्राय विजय मिळवला!

भातवडीच्या या अभूतपूर्व विजयाची चर्चा भारतभर झाली. तब्बल लाखभर फौजेचा पराभव शहाजीराजांच्या १०-१५ हजार मावळ्यांनी केला होता.

१. या विजयामुळे शहाजीराजे भोसले यांचे नाव संपूर्ण दख्खनमध्ये, दक्षिण भारतात महापराक्रमी योद्धा म्हणून गाजले.
२. या लढाईने सिद्ध केले की, योग्य रणनीती आणि ‘गनिमी काव्याच्या’ जोरावर मूठभर सैन्यही अथांग फौजेचा पराभव करू शकते.
३. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हीच लढाई स्वराज्याची खरी पायाभरणी करणारी लढाई ठरली. शहाजीराजांनी याच युद्धकौशल्याचे बाळकडू पुढे आपले सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलं. शिवाजी महाराजांनी याच गनिमी काव्याचा पाया व्यापक करून मोगल आणि आदिलशाहीला गुडघे टेकवायला भाग पाडले होते.

मित्रांनो, जेव्हा आपण शिवशाहीचा इतिहास पाहतो, तेव्हा अहिल्यानगर या भूमीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे तेच शहर आहे, जिथे भोसले घराण्याची गढी म्हणजेच शहाजीराजांचा वाडा दिमाखात उभा आहे. सध्याच्या नगर अर्बन बँक परिसरात हा वाडा आहे. याच मातीत मालोजीराजेंनी स्थापन केलेले ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिर आहे. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रात इतर कुठेही न आढळणारा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा एकत्रित असा एकमेव दुर्मिळ पुतळा, नगरच्या वास्तू संग्रहालयात जतन केलेला आहे! थोडक्यात सांगायचे तर, स्वराज्याची पहिली पायाभरणी आणि भोसले घराण्याच्या पराक्रमाची सुरुवात याच अहिल्यानगरच्या मातीतून झाली होती!

आज १६२४ च्या त्या ऐतिहासिक लढाईला आणि शरीफजींच्या बलिदानाला शतके उलटली आहेत, पण भातोडी पारगाव येथील शरीफजीराजेंची समाधी आजही आपल्याला त्या पराक्रमाची आठवण करून देते. गनिमी काव्याची पहिली ठिणगी टाकणाऱ्या या भूमीला आणि वीर शरीफजीराजेंच्या बलिदानाला आमचा मानाचा मुजरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button