Explained

स्पा सेंटरपासून लॉजपर्यंत… अहिल्यानगरमधील XXX रॅकेटची Inside Story

अहिल्यानगरमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; PITA कारवाईने खळबळ

अहिल्यानगर… एक शांत आणि ऐतिहासिक शहर. पण याच शांत शहराच्या एका गजबजलेल्या भागात, एलसीबीच्या पथकानं गुरुवारी केलेल्या एका कारवाईनं, संपूर्ण जिल्हा हादरला. एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याची सूत्रधार होती एक ५६ वर्षांची महिला – रजनी प्रभाकर डहाळे! पण ही कारवाई कोणी केली? हे रॅकेट कसं चालवायचं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वी अहिल्यानगरमध्ये पिटा कायद्यांतर्गत कुठे कारवाया झाल्या आहेत? या संपूर्ण काळ्या धंद्याची इनसाईड स्टोरी आज पाहणार आहोत…

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर सध्या छापे सुरु आहेत. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार आणि एलसीबीचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत होतं. तेव्हा गजानन कॉलनीतील एका घरात महिलांमार्फत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती, या पथकाला मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत पथकातील एका पोलीस कर्मचार्‍याला बनावट ग्राहक म्हणून संबंधित ठिकाणी पाठविलं.

ठरलेल्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष या घरावर छापा टाकला. छाप्यावेळी रजनी डहाळे या महिलेला ताब्यात घेण्यात आलं. रजनी हडाळे ही ५६ वर्षांची महिला येथे राहत होती. आजूबाजूच्या शेजाऱ्यांसाठी ती एक सामान्य महिला होती, पण या घराच्या चार भिंतींच्या आड रजनीने एक काळा बाजार मांडला होता. ती स्वतःच्या राहत्या घरातच हा कुंटणखाना चालवत होती. गरिबी आणि आर्थिक हलाखीचा गैरफायदा घेऊन ती महिलांना पैशांचं आमिष दाखवायची आणि आपल्या घरी आणून त्यांच्याकडून देहविक्री करून घ्यायची. तिची रॅकेट चालवण्याची पद्धत अतिशय हुशारीची होती. ती एजंट्स आणि मोबाईलच्या माध्यमातून थेट ग्राहकांशी संपर्क साधायची. पूर्ण खात्री पटल्याशिवाय कोणालाही घरात प्रवेश नसायचा. पण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने एक धाडसी प्लॅन आखला आणि रजनीचा पर्दाफाश झाला.

डहाळे हिच्या घराची झडती घेतली असता, तेथे अन्य तीन महिला आढळून आल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या महिलांनी रजनी डहाळे हिने त्यांना देहविक्रीच्या व्यवसायासाठी आणल्याचे सांगितले. डहाळे ही ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातील काही रक्कम महिलांना देत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती. तर त्याच पैशातील मोठा वाटा स्वतःकडे ठेवत होती, अशी माहितीही या महिलांनी पोलिसांना दिली. या कारवाईत उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार विकास साळवे, विष्णु भागवत, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, विजय ठोंबरे, चिमा काळे यांनी सहभाग घेतला.

मित्रांनो, रजनी डहाळेचे हे प्रकरण अहिल्यानगरसाठी नवीन नाही. यापूर्वीही अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पिटा’ अंतर्गत शहरात आणि जिल्ह्यात अनेक मोठ्या कारवाया झाल्या आहेत, ज्यात महिला दलाल आणि लॉज मालकांचा पर्दाफाश झाला आहे. गेल्या वर्षभरात पिटाअंतर्गत कोणकोणत्या कारवाया झाल्या ते एकदा पाहू…

मे २०२६ (स्पा सेंटरवर छापा) :
अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील साई मिडास इमारतीमध्ये असलेल्या ‘अँक्यूम स्पा सेंटर’वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धडक छापा टाकला होता. स्पाच्या नावाखाली तिथे हायप्रोफाइल देहविक्री सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी ४ पीडित महिलांची सुटका केली होती आणि तिथल्या महिला मॅनेजर व दलालांवर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

जून २०२६ (सुपा-पारनेर कारवाई):
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवेलगत असलेल्या दोन हॉटेल आणि लॉजवर छापा टाकला होता. हॉटेलच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि ५ महिलांची सुटका केली होती. त्या छाप्यातही पिटाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

मे २०२५ (डांगेगल्ली गुजराती लॉज छापा):
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डांगेगल्ली येथील गुजराती लॉजवर कोतवाली पोलिसांनी सायंकाळी छापा टाकला होता. तिथेही बनावट ग्राहक पाठवून काउंटरवर बसलेल्या एका पुरुषासह, महिला दलालांना आणि ७ जणांना पोलिसांनी पिटा कायद्यान्वये बेड्या ठोकल्या होत्या.

गजानन कॉलनीतील एका रहिवासी घरात चालणारा गोरखधंदा पोलिसांच्या कारवाईमुळे आता उद्ध्वस्त झाला. पण समाजात लपलेले असे अनेक पांढरपेशे दलाल अजूनही सक्रिय असू शकतात. पोलीस त्यांचे काम चोख बजावत आहेत, पण नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे. तुमच्या आजूबाजूला, वस्तीत किंवा सोसायटीमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यास, किंवा अज्ञात लोकांची सतत संशयास्पद ये-जा दिसल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा. तुमची एक सतर्कता कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button