महाराष्ट्रामध्ये सक्षम नेतृत्व असेल तर शेतकऱ्यांच्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडवून आणता येतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना दिवसा आणि हक्काची वीज मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेली सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील आस्तगाव गावच्या शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात बसविण्यात आलेल्या सौर पंपाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सिंचनाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली. विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून ग्रीड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर एक पाऊल पुढे टाकत ‘मागेल त्याला सौर पंप’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असून, शेतीला मोठी चालना मिळत आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
आस्तगाव शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात ५ एचपी क्षमतेचा सौर पंप बसविण्यात आला आहे. या पंपाच्या माध्यमातून जवळपास ५ ते १० एकर क्षेत्र ओलिताखाली आणले जात असून, शेतकऱ्याला दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या भागाला निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राहाता मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेखही डॉ. विखे पाटील यांनी केला.
पूर्वी या परिसरात दुष्काळी परिस्थितीमुळे शेती करणे अत्यंत अवघड होते. मात्र निळवंडेचे पाणी आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली सिंचन व्यवस्था यामुळे आज त्याच परिसरात शेती फुलताना दिसत आहे. धरण क्षेत्रात झालेला पाऊस, निळवंडेचे पाणी, सौर पंप योजना आणि महायुती सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे शेतीच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.
लोडशेडिंगच्या काळात सौर पंप ठरतोय शेतकऱ्यांसाठी आधार
सध्या काही भागांमध्ये वीजपुरवठ्याच्या वेळेत होणारे बदल आणि लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना शेतात जावे लागते, तर अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देणे अनेकदा कठीण होते. अशा परिस्थितीत ‘मागेल त्याला सौर पंप’ योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. सौर पंपामुळे दिवसा सौर ऊर्जेचा वापर करून शेतकरी आपल्या सोयीनुसार सिंचन करू शकतो. त्यामुळे लोडशेडिंग, रात्रीच्या वीजपुरवठ्याची प्रतीक्षा आणि वीजपुरवठ्याच्या अनिश्चिततेवर मात करून शेतीला वेळेवर पाणी देणे शक्य होत आहे. भविष्यात शेतीसाठी ऊर्जेची गरज भागविण्याच्या दृष्टीने सौर पंप हा शेतकऱ्यांसाठी प्रभावी आणि दीर्घकालीन पर्याय ठरणार आहे.
शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्यात महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचेही डॉ. विखे पाटील यांनी कौतुक केले. ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात होत असून, या कामाची जागतिक स्तरावरही दखल घेतली गेल्याचे त्यांनी नमूद केले.
सौर पंपाबाबत काही ठिकाणी गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. सौर पंप केवळ उन्हातच चालतो किंवा ढगाळ वातावरणात काम करत नाही, असा गैरसमज आहे. मात्र आस्तगाव येथे पाहणी केली असता पूर्णपणे ढगाळ वातावरण असतानाही सौर पंप सुरू असल्याचे दिसून आले. त्यावर स्प्रिंकलरच्या माध्यमातून शेतीला पाणी दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष सौर पंपाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले.
‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासनाकडून अनुदान मिळत आहे. ३ एचपी पंपासाठी शेतकऱ्यांना साधारण १५ ते २० हजार रुपये, तर ५ एचपी पंपासाठी साधारण ३० ते ३५ हजार रुपये भरावे लागतात. उर्वरित मोठा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेची सुरुवात गाव, शेतकरी आणि शेतीच्या समृद्धीतून होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने सौर पंप योजनेचा लाभ घेऊन दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डॉ. विखे पाटील यांनी आभार मानले. शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सौर पंप, सिंचन आणि जलसंधारणाच्या विविध योजनांमुळे शेतीला स्थैर्य मिळत असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीतूनच दुष्काळमुक्त आणि विकसित महाराष्ट्राची वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





