Explained

Vakilrao Langhe | प्रचाराला सायकल, विकासकामांना सायकल… कायम सायकलवर फिरणारा आमदार…

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी १९५० ला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरु केला. त्याच काळात जिल्ह्यात डाव्या विचारांचे नेतेही तयार होत होते. सुरुवातीला कामगार, कष्टकरी, खंडकरी व त्यानंतर ६० च्या दशकात साखर कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, यांच्या प्रश्नांना घेऊन कम्युनिष्ट आंदोलने होऊ लागली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीनंतर, म्हणजेच ६२ आणि ६७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सहकारातील नेते आणि कम्युनिष्ट यांच्यातील संघर्ष चांगलाच रंगला. अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहुरी आणि नेवासे हे पूर्वी कम्युनिष्टांचे गड मानले जायचे. १९५० ते १९८० पर्यंत नगर जिल्हा हा याच लाल बावट्यांचा गड समजला जायचा.काँम्रेड डी. बी. कुलकर्णी, काँम्रेड दत्ता देशमुख, काँम्रेड पी. बी. कडू, काँम्रेड चंद्रभान आठरे यांच्यासोबत नेवाशाचे काँम्रेड वकीलराव लंघे हेही लाल बावट्याचे कट्टर कार्यकर्ते होते. कुठलाही डौलबाजपणा न करता, साधा आणि सरळ दिसणारा नेता म्हणजे काँम्रेड, ही त्याकाळी या नेत्यांची ओळख होती. कम्युनिष्टांच्या या सगळ्याच, नेत्यांनी कमी-अधिक प्रमाणात सत्ता भोगली. दत्ता देशमुख आमदार झाले. पी.बी. कडूही आमदार झाले. अगदी तसेच वकीलराव लंघे, हेही दोनदा नेवाशाचे आमदार झाले. आमदार असतानाही सायकलवर फिरणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. याच वकीलराव लंघे यांची पहिली निवडणूक आज आपण पाहणार आहोत. या निवडणुकीत त्याकाळी दिग्गज समजल्या जाणाऱ्या यशवंतराव गडाखांचा त्यांनी पराभव केला होता….

१९७२ चा काळ हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि वादळी कालखंड मानला जातो. या काळात राज्यात भीषण दुष्काळ, पक्षांतर्गत संघर्ष, डाव्या चळवळींचे राजकारण आणि नव्या सामाजिक संघटनांचा उदय एकाच वेळी पाहायला मिळला होता.मार्च १९७२ मध्ये महाराष्ट्रात चौथ्या विधानसभेची निवडणूक पार पडली.पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन इंदिरा काँग्रेसने २७० पैकी तब्बल २२२ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. वसंतराव नाईक पुन्हा मुख्यमंत्री झाले. परंतु काँग्रेसच्या या वादळातही कम्युनिष्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, लाल निशाण पक्ष यांनी आपली जादू दाखवली होती. काँग्रेसच्या याच वादळाला रोखून जमीनीला घट्ट पाय रोवून नेवासा मतदारसंघातून त्यावेळी काँम्रेड वकीलराव लंघे निवडून आले होते.

वकीलराव लंघे यांचा जन्म नेवासा तालुक्यातील शिरसगावला झाला. ते मुळचे त्याच गावचे. लंघे आडनावाची लोक जास्त असल्यानं, या गावाला लंघ्याचं शिसरगाव असंही म्हणतात. गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नेवासा तालुक्यात त्याकाळी काँग्रेसचं वर्चस्व होतं. स्वातंत्र्यानंतर शेवगाव पट्यात मारुतराव घुले व त्यानंतर ६० च्या दशकात नेवासा पट्ट्यात यशवंतराव गडाख हे दोन नेते उदयाला आले. दोघेही काँग्रेसचे. लंघेवर मात्र कम्युनिष्टांचा प्रभाव होता. १९५० आणि १९६० च्या दशकात नगर जिल्ह्यात डाव्या विचारांची आणि कम्युनिस्ट पक्षाची मोठी लाट होती. शेवगाव आणि नेवासा हा भाग गरीब कोरडवाहू शेतकरी आणि ऊसतोड कामगारांचा होता. या भागातील शोषणाविरुद्ध वकीलराव लंघे यांनी सुरुवातीपासूनच कम्युनिस्ट पक्षाचा ‘लाल बावटा’ हाती घेतला. त्याच काळात साखर कारखानादारीही उदयाला येत होती. कारखानदार हा गट श्रीमंतांचा तर गरीब शेतमजुरांना कुणीच वाली नव्हतं. अशा परिस्थितीत लंघेंनी कामगार, शेतमजुरांसाठी संघर्ष सुरु केला. लंघेंची लोकप्रियता वाढू लागली. त्यातूनच कम्युनिष्टांच्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी त्यांना नेवासा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा आग्रह केला. १९६७ च्या निवडणुकीत काँगेसच्या घुलेंनी, तब्बल ५,३२३ मतांनी लंघेंचा पराभव केला. पहिल्या निवडणुकीत अपयश आलं. पण लंघे थांबले नाहीत. त्यांनी आपलं कार्य अधिक जोमानं सुरु केलं. त्यानंतर १९७२ ला विधानसभेच्या निवडणुका लागल्या. वकीलराव लंघे यांना कम्युनिष्ट पार्टीनं पुन्हा तिकीट दिलं. मारुतराव घुले हे काँग्रेसचे विद्यमान आमदार होते. परंतु इंदिरा गांधींना काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांची गरज होती. काँग्रेसकडून लढू शकणारा एक तरुण नेता त्यावेळी काँग्रेसकडे होता. नाव होतं, यशवंतराव गडाख.

यशवंतराव गडाख हे नुकतेच राजकारणात आले होते. सोनई परिसरात त्यांच मोठं नाव होतं. १८६७ ते १९७२ या काळात ते नेवासा पंचायत समितीचे सभापतीही होते. पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर त्यांचं तालुक्यात नावही झालं होतं. त्यामुळे काँग्रेसने घुलेंऐवजी गडाखांना उमेदवारी दिली. या वर्षी राज्यात दुष्काळ होता, हा भाग निराळा. परंतु नेवासा तालुक्याची परिस्थितीही जरा बदलली होती. विद्यमान आमदार असूनही घुलेंना तिकीट दिलं नाही, म्हणून त्यांचे कार्यकर्ते नाराज होते. तर एकडे उत्तरेत, या निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब विखे निवडून आले होते. त्यांच्याविरोधात राहुरीचे पी. बी. कडू हे कम्युनिष्ट पक्षाकडून उभे होते. नेवासा तालुक्यातून विखेंना म्हणजेच काँग्रेसला लीड मिळालं असलं तरी विखेंच्या अपेक्षेप्रमाणे हे लीड मिळालेलं नव्हतं. म्हणून स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांवर त्यांचा राग होता, अशा चर्चा होत्या.

एकीकडे घुलेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी आणि दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठांची नाराजी, हेच लंघेंनी हेरलं. मुळात यापूर्वीच्या पंचवार्षीक निवडणुकीत पराभूत झाल्याने लंघेंना निवडणुकीचा अनुभव पाठीशी होता. गेल्या पाच वर्षांत त्यांनी लाल बावटा नेवाशाच्या ग्रामीण भागात घराघरात पोहोचवला होता. त्या तुलनेने गडाख विधानसभेला अगदीच नवखे होते. याच संधीच लंघेंनी सोनं केलं. गोरगरीब जनता, ऊसतोड कामगार आणि छोट्या शेतकऱ्यांनी काँम्रेड वकीलराव अण्णांना भरभरुन साथ दिली. निकाल लागला तेव्हा वकीलराव लंघेंना ३१ हजार ३२९ तर यशवंतराव गडाखांना २८ हजार ९७ मतं मिळाली होती. काँग्रेड आण्णा पहिल्यांदा आमदार झाले होते. गडाखांच्या विद्यमान सभापतींचा त्यांनी ३ हजार २३२ मतांनी पराभव केला होता. हा पराभव फक्त गडाखांचाच नाही, तर थेट काँग्रेसचा झाला होता. कारण देशभर काँग्रेसची लाट असताना, काँम्रेड वकीलरावांनी गड जिंकला होता.

या विजयानंतर काँग्रेड लंघेंनी मागे वळून पाहिलं नाही. आमदार असतानाही सायकलवर फिरणारा हा नेता पुढच्या वेळी म्हणजेच १९७८ ला पुन्हा आमदार झाला. यावेळी काँग्रेसनं पुन्हा तिकीट बदललं. यावेळी काँग्रेसनं एकनाथ निंबाळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. परंतु या निवडणुकीतही ९९५ मतांच्या थोड्या फरकानं वकिलराव लंघे पुन्हा निवडून आले. साखर सम्राटांच्या मतदारसंघात हा काँम्रेड नेता सलग दोनदा आमदार झाला. काही बातम्यांचा आधार घेतला, तर काँम्रेड लंघे आण्णा हे आमदार झाल्यावरही कायम सायकलवर फिरायचे. प्रचारालाही सायकल आणि विकासकामांची पाहणी करायलाही सायकल, असा त्यांचा कार्यकाळ राहिला.

पहिल्या पराभवानं यशवंतराव गडाखही खचले नाहीत. त्यांनी स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रित केले. २० जून १९७९ रोजी ते नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. १९८४ पर्यंत सलग ५ वर्षे ते अध्यक्ष राहिले. त्यांच्या या ५ वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. विशेषतः भयानक दुष्काळी परिस्थितीत त्यांनी सलग सात महिने छावण्या आणि रोजगाराचे मोठे काम केले. याच काळात त्यांनी ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना गायींचे वाटप करून श्वेतक्रांतीची पायाभरणी केली. १९७८ लाच मुळा शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. त्यानंतर १९८४ पासून सलग तीन टर्म ते लोकसभेतही गेले. १९९१ च्या नगर लोकसभेत तर त्यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखेंचाही पराभव केला. दिवस बसून राहत नसतात, हेच या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button