
ब्रेकिंग न्यूज.. देशभरातील सायबर फसवणुकीचं थेट कनेक्शन आता अहिल्यानगरशी जोडले गेलं आहे. सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, जिल्ह्यातील अनेक बँक खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय.
मंडळी, अहिल्यानगर सायबर पोलिसांनी ‘म्युल अकाउंट’ रॅकेटविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. तपासात अहिल्यानगर शहरासह संगमनेर, शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यातील तब्बल १२ जणांच्या बँक खात्यांमध्ये देशभरातील सायबर फसवणुकीची रक्कम जमा झालीये.
सायबर गुन्हेगार स्वतःची बँक खाती वापरत नाहीत. ते सामान्य नागरिकांना कमिशनचं आमिष दाखवून त्यांची बँक खाती, एटीएम कार्ड किंवा बँकिंग सुविधा वापरतात. अशा खात्यांना ‘म्युल अकाउंट’ म्हटलं जातं.
फसवणुकीतून मिळालेले पैसे आधी या खात्यांमध्ये जमा केले जातात आणि त्यानंतर एटीएम किंवा धनादेशाद्वारे तातडीने काढून घेतले जातात. या खात्यांमध्ये देशभरातील विविध फसवणुकीतून तब्बल ४० लाख ६८ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि पैसे काढणाऱ्या व्यक्तींचा सखोल तपास सुरू केला आहे. आता याबाबत अहिल्यानगरमधून काय काय धकाकदायक माहिती समोर येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे..





