
मंडळी, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आषाढसरींनी जोरदार हजेरी लावली असून, अवघ्या ३६ तासांत धरणात तब्बल एक टीएमसीहून अधिक नवीन पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे भंडारदरा धरण आता तब्बल ८० टक्के भरले आहे.
मंडळी, गेल्या तीन ते चार दिवसांपासून पश्चिम घाटातील घाटघर, रतनवाडी, पांजरे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटघर येथे चोवीस तासांत तब्बल १८५ मिलिमीटर, तर रतनवाडीत १७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
परिणामी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. केवळ ३६ तासांत १ हजार २०१ दशलक्ष घनफूट नवीन पाणी धरणात दाखल झाले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ८ हजार ७३५ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला असून धरण ८० टक्के भरले आहे.
दरम्यान, निळवंडे धरणाच्या पाणलोटातही पावसाचा जोर कायम आहे. सध्या या धरणात ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
दुसरीकडे हरिश्चंद्रगड परिसरातही पावसाचे सातत्य कायम असल्याने मुळा नदीचा विसर्ग सायंकाळी १७ हजार २३५ क्युसेकपर्यंत पोहोचला आहे.
एकूणच, पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. यामुळे आगामी काळात भंडारदरा, मुळा , निळवंडे लवकरच भरेल असे आशादायक चित्र सध्या आहे.





