
मंडळी, श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगरच्या गाजलेल्या खूनप्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. विशेष व सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांनी आरोपी हुसैन अब्दुल्ला पठाण याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप, 15 हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
फिर्यादी शाहीन रमजान पठाण यांच्या तक्रारीनुसार, आरोपीने बहिण मरीयम दादामियाँ पठाण हिच्यावर जादूटोणा व करणी केल्याचा संशय घेत कोयत्याने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या मरीयमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी. डी. उजे यांनी केला. सरकार पक्षातर्फे अॅड. पी. पी. गटणे, अॅड. एम. आर. नवले आणि अॅड. एन. आर. कहाणे यांनी प्रभावी बाजू मांडली, तर पीएसआय घाणे आणि पोहेका सय्यद यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले. न्यायालयाने नऊ साक्षीदारांचे जबाब आणि भक्कम पुरावे ग्राह्य धरत आरोपीचा बचाव फेटाळून लावला.





