
गेल्या सहा महिन्यांत झालेल्या कारवाया पाहिल्या, तर नगर हे उडता पंजाबच्या वाटेवर तर नाही ना? हा प्रश्न पडतो. जानेवारीत नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिस कर्मचाऱ्याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली. त्यानंतर फेब्रुवारीत जामखेड-कर्जत रस्त्यावर एमडी ड्रग्ज सापडले. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी सावेडीत मुकुंदनगरच्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश झाला. पोलिसांसमोर नगरचं हे ड्रग्ज रॅकेट पूर्णपणे उद्द्वस्त करण्याचं मोठं आव्हान आहे. एकीकडे जिल्ह्यात टोळीयुद्ध, खुन, दरोडे, महिलांवरील अत्याचार वाढले असताना, आता पोलिसांसमोर ड्रग्ज रॅकेटचं मोठं संकट उभं राहिलंय.आता हे ड्रग्ज कुठून आलं? आणि आत्ता पकडलेल्या टोळीनं चिंता का वाढवलीय? .
रविवारी १९ जुलैला सावेडीतील मिस्किन मळ्यात पोलिसांनी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. पोलिसांना तेथे एक कार संशयास्पद फिरताना दिसली. पोलिसांनी ती कार पकडली. कारमध्ये पाच जण होते. पोलिसांनी पकडल्यावर त्यापैकी दोघे पसार झाले. पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर कारची झडती घेतली. तेव्हा कारमध्ये 150 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, पिस्तुलासारखे दिसणारे लायटर, एअर गन, मास्क, कटावणी तसेच दरोड्यासाठी वापरले जाणारे अन्य साहित्य जप्त केले. आता पकडलं कुणाला तर, झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान यांना. हे कुठले? तर मुकुंदनगरचे. ड्रग्ज सापडलं इथपर्यंत ठीक आहे, पण या कारमध्ये दरोडा टाकताना लागणारं साहित्यही सापडलं. त्यामुळे ही टोळी ड्रग्ज तस्करी व दरोडेही टाकतेय का? हा प्रश्न सध्या तपासला जात आहे. न्यायालयाने या आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी दिलीय. पण या चार दिवसांत पोलिसांना, काय- काय वदवून घेता येतं यावर पुढचा तपास अवलंबून आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या आरोपींचं थेट पुणे व मुब्रा कनेक्शन असल्याच्या चर्चा आहेत. या टोळीचे राज्यातील इतर टोळ्यांशीही संबंध असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅट, बँक व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीची सखोल चौकशी सध्या सुरु आहे. जप्त करण्यात आलेले मेफेड्रोन नेमके कोठून आणले, ते कोणाला पुरवले जाणार होते, तसेच या आरोपींचे राज्यातील किंवा राज्याबाहेरील मोठ्या अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटशी संबंध आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. याशिवाय कारमधून पसार झालेल्या दोघा संशयितांचा शोध घेणे, त्यांना अटक करणे आणि संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करणे हे तपासातील प्रमुख उद्दिष्ट आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा उपयोग दरोडा, अपहरण किंवा अन्य गंभीर गुन्ह्यासाठी होणार होता का, याचाही तपास केला जात आहे. या टोळीबाबत शंका तेव्हा वाढली जेव्हा या टोळीचं पुणे व मुंबई कनेक्शन समोर आलं.
भारतात अफगनानिस्तान, कंबोडीया, पाकिस्तान, कझकिस्तान, इराण येथून क्रिसेंट प्रकारचे कोकेन आणले जाते. तर व्हिएतनाम, म्यानमार येथून आसाममार्गे गोल्डन ट्रँगल नामक कोकेन भारतात येते. याशिवाय नेदरलॅन्ड, अफ्रिका या देशांतून कोकेन ड्रग्ज तस्करी केले जातात. हे ड्रग्ज पुढे गोवा, बंगळुरु, पुणे, मुंबईला पाठवले जातात. नगर शहर व जिल्ह्यातही गेल्या सहा महिन्यांत अनेकदा ड्रग्जवर कारवाया झाल्या. काँलेज परिसर, पार्ट्या, पब किंवा अगदी खेड्यापाड्यातील टपऱ्यांवरही ड्रग्ज व गांजा आढळलाय. यापुर्वी पुण्यात बँकाँकवरुन आलेल्या प्रवाशाकडे साडे दहा कोटींचे ड्रग्ज सापडलेत. त्यापूर्वी कोंढवा, बिबवेवाडीत २७ लाखांचे एमडी ड्रग्ज पकडले होते. पुण्यातील व मुंबईतील मुब्रा परिसरात एमडी ड्रग्जचा व्यापार करणारी मोठी टोळी कार्यरत आहे. याच टोळ्यांच्या संपर्कात मुकुंदनगरमधील काही तरुण असल्याचे सांगितले जात आहे. मिस्किनमळा येथे पकडलेले सर्व आरोपी हे याच मुकुंदनगरमधील होते. त्यामुळे ही सगळी साखळी शोधून काढण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.
नगर जिल्ह्यातील एमडी ड्रग्जचा मोठा साठा मुंबईतील मुंब्रा आणि उपनगरांमधून स्थानिक पेडलर्समार्फत पुरवला जात असल्याच्या शंका आहेत. पुण्यातील आयटी हब, महाविद्यालयीन परिसर आणि हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेटमधून नगर जिल्ह्यातील पेडलर्स ड्रग्ज खरेदी करतात, असेही सांगितले जात आहे. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने यापूर्वी नगर-पाथर्डी रस्त्यावर केलेल्या मोठ्या कारवाईत, ओडिशा व आंध्र प्रदेशमधून आलेला कोट्यवधींचा गांजा जप्त केला होता. हा माल नगरमार्गे पुणे-मुंबईकडे पाठवला जाणार होता.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खुद्द अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आधीच्या कारवायांमध्ये जप्त केलेला ड्रग्जचा साठा चोरी करून तो स्थानिक बाजारात आणि पुणे ग्रामीण भागात विकल्याचे उघड झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर, नगर जिल्हा हा केवळ ड्रग्जचा ग्राहक नसून ओडिशा, दिल्ली, पुणे आणि मुंबईवरून येणाऱ्या अमली पदार्थांच्या वाहतुकीचा एक मुख्य ट्रान्झिट पॉइंट बनला आहे. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत.पोलिसांना उडत्या पंजाबच्या वाटेकडे जाणाऱ्या नगरला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहे.





