Latest

‘या’ निवडणुकीपासून खऱ्या अर्थानं ‘धक्कादायक’ निकालाची परंपरा सुरु झाली…

नगरचे राजकारण, अगदीच बेरकी. राज्यातला सगळ्या जास्त सहकार इथल्या मातीत रुजला आणि फुलला. इथं जेवढं उसाचं पिक आलं, तेवढेच कारखाने उभे राहिले. तब्बल वीसेक साखर कारखाने नगरला आहेत. राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा असल्यानं नगरला राजकारणाचं पिकही जोमात वाढलं. इथल्या मातीत कम्युनिष्ट टाकले, जिल्हा डाव्यांचा झाला. इथल्या मातीत पंजा टाकला, जिल्हा काँग्रेसमय झाला. इथल्या मातीत घड्याळ टाकलं, जिल्हा राष्ट्रवादीचा झाला. गेल्या काही वर्षांत तर इथल्या मातीत कमळही फुललंय. इथं जेवढं तत्वाचं राजकारण झालं, तेवढ्याच कुरघोड्या आणि पाडा-पाडीही झाल्या. दगाफटका इथल्या मातीला नवा नाही. अशाच एका दगाफटक्यात येथे सहकारातील एका दिग्गजाला अवघ्या एका मतानं पराभव स्विकारावा लागला होता.

नगर जिल्ह्याला स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचाही मोठा इतिहास आहे. नगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाला तब्बल ७४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये देशात पहिला सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा या मतदारसंघाची पायाभरणी झाली. पहिल्या दोन निवडणुका या मुंबई राज्याच्या भाग मानल्या गेल्या. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर खरं तर १९६६ नंतर विधान परिषद निवडणुकांमध्ये रंजकता आली. १९६६ ते २०२६ पर्यंत विधान परिषदेच्या या मतदारसंघात तब्बल १० आमदार निवडून गेले. या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची १९८४ ची निवडणूक एवढी ऐतिहासिक झाली की, तिची आजही चर्चा होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही चौथी निवडणूक होती. याच निवडणुकीत सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या शंकरराव कोल्हेंचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता.

नगर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका जेवढ्या त्वेषाने लढवल्या गेल्या, तेवढ्याच त्वेषानं विधान परिषद निवडणुकाही लढवल्या गेल्या. १९६६ साली या मतदारसंघातून शेवगावचे रहिवासी आणि प्राथमिक शिक्षकांचे नेते पांडुरंग फलके पहिल्यांदा विजयी झाले. त्यानंतर १९७२ च्या दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते मारुतराव घुले पाटील यांनी पारनेरचे माजी आमदार व तेव्हाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब भगत यांचा पराभव केला. तिसरी निवडणूक १९७८ ला झाली. त्यात काँग्रेसचे दिग्गज नेते आबासाहेब निंबाळकर यांनी जनता पक्षाचे उमेदवार झुंबरलाल सारडा यांचा पराभव केला. 1984 ला झालेली चौथी निवडणूक ही ऐतिहासिक होती. ती अत्यंत चुरशीची आणि रंजक ठरली. श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष जनार्दन टेकावडे यांनी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसकडून लढताना, कोपरगावचे काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. पाचवी निवडणूक जनार्दन टेकावडे यांनीच पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत श्रीरामपूरचे अपक्ष उमेदवार मधुकर देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर यशवंतराव गडाख, अरुणकाका जगताप यांनी दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर आता राहुरीचे दिग्गज नेते प्राजक्त तनपुरे यांनी बिनविरोध ही जागा पटकावली.

पण या सगळ्या निवडणुकीत १९८४ ची, एका मताची ती निवडणूक एकदम खतरनाक झाली होती. जून १९८४ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने लष्कराने ‘ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं. त्याच्या निषेधार्थ इंदिरा गांधी यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी त्यांची ३१ ऑक्टोंबर १९८४ ला गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेने सबंध देश हादरला होता. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर डिसेंबर १९८४ मध्ये देशात ८ व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत काँग्रेस पक्षाने ५४३ पैकी तब्बल ४१५ जागा जिंकून स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय मिळवला. इकडं राज्यातील राजकीय वातावरणही तापलेलंच होतं. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजी आणि शरद पवारांची विरोधी भूमिका यामुळे आव्हानांचा काळ होता. शरद पवारांनी इंडियन काँग्रेस सोशलीस्ट या नव्या गटाची स्थापना केली होती. त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या सरकारला आणि केंद्रातील काँग्रेसला तगडे आव्हान दिले होते. डिसेंबर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार बारामतीमधून स्वतः खासदार म्हणून निवडून आले होते.

याच गदारोळात स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या. याच निवडणुकीसाठी शरद पवार हे नगर जिल्ह्यातील नेत्याच्या शोधात होता. नगर जिल्हा हा खरंतर त्याकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु येथे कम्युनिष्टही तगडे होते. कम्युनिष्ट आणि काँग्रेस अशीच येथे परंपरागत लढत होत होती. परंतु आता, शरद पवारांनी त्यांच्या समाजवादी काँग्रेसला नगरची ही जागा मिळविण्याची तयारी केली. नगर हा सहकाराचा जिल्हा असल्यानं या निवडणुकीत सहकारातीलच एखादा दिग्गज उभा राहणार, हे पवारांनी ओळखलं होतं. मग सहकारातील नेत्याला फाईट कोण देऊ शकतं? याची चाचपणी पवारांनी सुरु केली. काँग्रेसकडून कोपरगावचे दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांच्या नावाची चर्चा होती. ती पवारांपर्यंत गेली. मग पवारांनीही डाव टाकला. त्याकाळी जनार्दन टेकावडे हे श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात प्रामुख्याने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती, हेच मतदार असतात. टेकावडे यांचे जिल्ह्यातील नगरसेवकांमध्ये ओळख होती. स्थानिक नेत्यांसोबतही त्यांचे वैयक्तिक संबंध होते. मतदारांशी थेट संपर्क असलेला असा हुकमी उमेदवार निवडणुकीत विजयाची शक्यता वाढवू शकतो, हे पवारांनी ओळखलं. त्यामुळे पवारांनी टेकावडेंशी संपर्क साधला. त्यांना उमेदवारीची ऑफर दिली.

आता या ऑफरमागे अजून एक कारण होतं. नगरच्या उत्तरेच्या राजकारणात बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे यांची मक्तेदारी होती. या प्रस्थापित नेत्यांच्या हुकूमशाहीला आणि सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला विरोध करणारा एक मोठा वर्ग जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये तयार झाला होता. तिकडे नेवासा-शेवगावमधील यशवंतराव गडाख आणि मारुतराव घुले पाटील यांसारखे नेते काँग्रेसमध्ये असूनही विखे-कोल्हे गटाच्या विरोधात असल्याच्या, चर्चा होत्या. या अंतर्गत असंतोषाला संघटित करण्यासाठी शरद पवारांना एका अशा उमेदवाराची गरज होती, जो या विखे-कोल्हे विरोधी मतांचे ध्रुवीकरण करू शकेल. टेकावडे या चौकटीत तंतोतंत बसत होते. दुसऱ्या बाजूने विचार केला तर, या निवडणुकीपूर्वी १९८० ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव कोल्हेंनी कोपरगावातून शंकरराव काळेंचा पराभव केला होता. कोल्हे काँग्रेस-आय कडून तर काळेंनी काँग्रेस-यू कडून ही निवडणूक लढवली होती. तब्बल दहा हजारांनी काळेंचा पराभव झाला होता. हा पराभव काळेंच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे काळे शरद पवारांनाच मदत करणार हे फिक्स होतं. राहिला विषय विखेंचा तर,उत्तरेतील यापूर्वीच्या काही निवडणुकांचा अनुभव पाहता, विखेही कोल्हेंबाबत सकारात्मक नव्हते. त्यामुळे हे दोघे एकाच पक्षात असले तरी, विखेंची थेट मदत कोल्हेंना होणार नव्हती, असा पवारांचा कयास होता.

झालं. पवारांनी हे सगळं हेरुन जनार्दन यशवंत टेकावडे यांनाच उमेदवारी दिली. या निवडणुकीसाठी ४२६ मतदार होते. या सगळ्या मतदारांशी वैयक्तीक संपर्क साधण्याची रणनीती पवारांनी आखली. कागदावर काँग्रेसचे बहुमत स्पष्ट असतानाही, पवारांनी टेकावडे यांच्या माध्यमातून ‘अंडरकरंट’ तयार केला. काँग्रेसच्याच गोटातून मते फुटू शकतात, हा विश्वास टेकावडेंनाही होता. त्यातून प्रचार सुरु झाला.आणि मतदानानंतर जे व्हायचं तेच झालं. ४२६ पैकी ४२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दोन मतदार मयत होते. मतमोजणी दरम्यान ३ मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण वैध मतांची संख्या ४२१ राहिली. या ४२१ मतांमध्ये शंकरराव कोल्हेंना २१० मतं मिळाली. तर टेकावडेंना २११ मतं मिळाली. अवघ्या एका मताने टेकावडे विजयी झाले. केवळ १ मताच्या या ऐतिहासिक फरकामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजरामर झाली. या पराभवानंतर शंकरराव कोल्हे यांनी न्यायालयात धाव घेऊन पुनर्मोजणीची मागणीही केली होती. परंतु कायदेशीर प्रक्रियेनंतरही जनार्दन टेकावडे यांचाच विजय अंतिम ठरला. मतदान हे गुप्त पद्धतीनं असल्यानं नेमकं काय झालं, याच्या फक्त चर्चा झाल्या. प्रत्यक्षात कोणत्याच शंकेला पुरावा नव्हता. फक्त चर्चाच होत्या. शंकरराव कोल्हेंसारख्या दिग्गजाचा पराभव झाला होता. टेकावडे खऱ्या अर्थानं जायंट किलर ठरले. शरद पवारांच्या रणनीतीचे मुख्य मोहरे ठरलेल्या टेकावडे यांनी या विजयानंतर मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी सलग दोन वेळा या विधान परिषद मतदारसंघाचे यशस्वी प्रतिनिधित्व केलं. १९८४ च्या पराभवानंतर त्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. ते पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात महसूल, सहकार, परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्क अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्रीही बनले. पण या एका मताच्या पराभवाच्या चर्चा मात्र कायम होत राहिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button