Explained

ADCC Bank Election | सेवा सोसायट्यांचे तब्बल १०० नेत्यांच्या नावांचे ठराव; रंगत वाढली, काय होईल?

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजलाय. सेवा सोसायट्यांना ठराव दाखल करण्याची मुदत गुरुवारी, १६ जुलैला संपली. या ठरावात बरंच नाट्य पहायला मिळालं. सेवा सोसायट्या मतदारसंघात १४ तालुक्यांतून १४ जण, बँकेचे संचालक होणार आहेत. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील नेत्यांमध्ये बराच वर्चस्ववाद रंगला. बँकेच्या संचालकांच्या २१ जागांपैकी १४ जागा सोसायटी मतदारसंघाला, दोन जागा महिला राखीव,एक जागा अनुसूचित जाती-जमातीला, एक जागा ओबीसींना, एक जागा एन-टीला, शेतीपूरक मतदारसंघाला एक जागा आणि बिगर शेती मतदारसंघाला एक जागा, असं संचालक मंडळाचं गणित आहे. तालुक्यातील जे दिग्गज नेते असतात, त्यांना खरंतर सेवा सोसायटी मतदारसंघातूनच बँकेत जावं लागतं. म्हणूनच हे ठराव ज्यावेळी होत होते, तेव्हा चांगलीच चुरस पहायला मिळाली. आता हे ठराव निवडणूक विभागानं जिल्हा बँकेकडे पाठवले असून, लवकरच अंतिम यादी तयार होणार आहे. गेल्यावेळी महाविकास आघाडीनं २१ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या. परंतु तरीही, विखे-कर्डिले गटानं पडद्यामागून डावपेच खेळत, जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष बसवला होता. पण आता कर्डिले साहेब हयात नाहीत. सभापती राम शिंदे व आ. विवेक कोल्हे हे भाजपाचेच असले तरी, ते विखेंचे अंतर्गत विरोधक समजले जातात. त्यामुळे विखे गटाला जिल्हा बँकेपासून दूर ठेवण्यासाठी, ते थोरात गटाशी हातमिळवणीही करतील, अशाही शक्यता आहेत. कर्डिले नसताना, एकटे विखे या सर्वांशी दोन हात कसे करतात? हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे. जिल्हा बँकेची गेल्या टर्मची गंमत व यंदाची स्थिती, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत…

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली. त्यानंतर पहिल्यांदा एक सदस्यीय
प्रशासक व त्यानंतर त्री सदस्यीय प्रशासकांकडे जिल्हा बँकेचा कारभार देण्यात आला.प्रशासक नेमणुकीतही राजकारण पहायला मिळालं. आता निवडणूक आयोगानं बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय. यंदा विविध मतदारसंघातून तब्बल साडेपाच हजार मतदार बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान करतील.सेवा सोसायट्यांचे ठराव घेण्याचा पहिला टप्पा गुरुवारी १६ जुलैला पूर्ण झाला.ठराव प्रक्रियेत यंदा अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. खा. निलेश लंके व सभापती राम शिंदे, हे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक होतील अशा चर्चा आहेत. त्यामुळे पारनेर व कर्जत-जामखेडमध्ये सोसायटी ठरावावरुन बराच वाद झाला. पारनेर तालुक्यात तर संचालकांच्या कथित अपहरणाचे नाट्यही घडले. इतर तालुक्यातही आमदार किंवा माजी आमदारांच्याच नावाने बहुतांश ठराव झाले. काही ठिकाणी अनपेक्षित ठराव झाल्याने यावेळी हे मतदान चांगलेच चुरशीचे होईल, असे सांगितले जात आहे.

१४ तालुक्यात कुणा-कुणाच्या नावांनी ठराव झाले, ते एकदा पाहू…
-संगममनेरमध्ये थोरात कारखाना व जोर्वे सोसायटीने माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाने ठराव केला.
-कोपरगावमध्येही आ. आशुतोष काळे व आ. विवेक कोल्हे या दोघांच्या नावांनी ठराव झाले.
-अकोल्यात आ. डाँ. किरण लहामटे, माजी अध्यक्ष सीताराम गायकर, माजी आ. वैभव पिचड, मधुकर नवले यांच्या नावांनी ठराव झाले.
-नेवाशात माजीमंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी सुनीता गडाख, शिवसेनेचे आ. विठ्ठल लंघे यांच्या नावाने ठराव झाले.
-श्रीरामपूरमध्येही माजी आ. भानुदास मुरकुटे, नगराध्यक्ष करण ससाणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाने ठराव झाले.
-नगर तालुक्यातून भाजपचे आ. अक्षय कर्डिले, प्रताप शेळके, माधव लामखडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर यांच्या नावाने ठराव झाले.
-शेवगाव तालुक्यात माजी आ. चंद्रशेखर घुले, राजश्री घुले यांच्यासह भाजप समर्थकांच्या नावानेही ठराव झाले.
-श्रीगोंद्यात माजी आ. राहुल जगताप, आमदारबंधू प्रताप पाचपुते, दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहटा यांच्या नावाने ठराव झाले.
-कर्जत तालुक्यात सभापती प्रा. राम शिंदे, मंजुषा गुंड, सुनंदा पिसाळ, काकासाहेब तापकीर, सुरेश साळुंके यांच्या नावाने ठराव झाले.
-पाथर्डी तालुक्यात आ. मोनिका राजळे, प्रताप ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, अर्जुन शिरसाट, काशिनाथ लवांडे, संभाजी वाघ यांच्या नावाने ठराव झाले.
-जामखेड तालुक्यातही प्रा. राम शिंदे व माजी संचालक अमोल राळेभात यांच्या नावाने ठराव झाले.
– पारनेर तालुक्यात सगळ्यात जास्त रंगत आली. या तालुक्यात सगळ्यात जास्त ठराव झाले. येथे खा. निलेश लंके, आ. काशिनाथ दाते, गीतांजली शेळके, माजी आ. नंदकुमार झावरे, सबाजी गायकवाड, सुजीत झावरे यांच्या नावाने ठराव झाले.
-राहाता तालुक्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या समर्थकांच्या नावानेच ठराव झाले.
– राहुरी तालुक्यात आ. प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे, उषा तनपुरे यांच्या नावाने ठराव झाले.

आता हे सगळे ठराव पाहिले तर सत्ताधारी, विरोधक आणि इतरही अनेक नव्या नावांनी ठराव झाल्याने ही रंगत अभूतपुर्व होईल, अशा शक्यता वाढल्या आहेत. गेल्यावेळी म्हणजेच, २०२१ ला झालेली निवडणूक फक्त चार जागांसाठी झाली होती. संचालकांच्या १७ जागा बिनविरोध आल्या होत्या.

गेल्या वेळी
1) पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)
2) राहात्यातून अण्णासाहेब म्हस्के
3) शेवगावमधून चंद्रशेखर घुले
4) श्रीगोंद्यातून राहुल जगताप
5) जामखेडमधून अमोल राळेभात
6) अकोल्यातून सीताराम गायकर
7) नेवाशातून माजीमंत्री शंकरराव गडाख
8) राहुरीतून अरुण तनपुरे
9) संगमनेरमधून माधवराव कानवडे
10) श्रीरामपूरमधून भानुदास मुरकुटे
11) श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे
12) कर्जतमधून आशा काकासाहेब तापकिर
13) श्रीरामपूरमधून करण ससाणे
14) कोपरगावातून आ.आशुतोष काळे
15) अकोल्यातून अमित भांगरे
16) संगमनेरमधून गणपतराव सांगळे
17) आणि कोपरगावमधून विवेक कोल्हे

हे संचालक बिनविरोध निवडून आले होते. तर विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या तीन जागांसाठी व बिगर शेती संस्थांसाठीच्या एका जागेसाठी, निवडणूक झाली होती. त्यात पारनेरमधून उदय शेळके हे निवडून आले. त्यांनी महायुतीच्या रामदास भोसले यांचा पराभव केला. नगरमधून महायुतीचे शिवाजीराव कर्डिले हे निवडून आले होते. त्यांनी महाविकास आघाडीच्या सत्यभामा बेरड यांचा पराभव केला होता. कर्जतमधून महायुतीचे अंबादास पिसाळ हे फक्त एका मताने निवडून आले होते. त्यांनी महाविकास आघाडीच्या मिनाक्षी साळुंके यांचा पराभव केला होता. तर बिगरशेती मतदारसंघातून, प्रशांत गायकवाड हे निवडून आले होते. त्यांनी दत्ता पानसरे यांचा पराभव केला होता. मतदानानंतर महाविकास आघाडीकडे १६-१७ तर महायुतीकडे फक्त पाच ते सहा जागा होत्या. तरीही २०२३ मध्ये पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि जिल्हा बँकेवर भाजपचे शिवाजीराव कर्डिले हे अध्यक्ष झाले. कर्डिले-विखे ही जोडगोळी काहीही करु शकत होती. परंतु यंदा कर्डिले हयात नाहीत. त्यामुळे स्वपक्षिय व परपक्षिय विरोधक विखेंसोबत कशी लढत देतील, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button