
नगर जिल्ह्यात एकामागून एक गुन्हे घडतच आहेत. गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूर धगधगत असताना, आता संगमनेर तालुक्यातही एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना डोळ्याने पाहणाऱ्या या मुलीच्या आईला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. हे सगळं इतकं भयंकर होतं, की मुलगी व तिची आई अजूनही दहशतीत आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला गजाआड केले.
२०२६ हे वर्ष नगरकरांसाठी धक्कादायक ठरलंय. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या, तब्बल २५ ते ३० घटना पहिल्या सहा महिन्यांत घडल्या. त्यापैकी अनेक गुन्ह्यात पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु तरीही हे प्रकार थांबता थांबेनात. वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारीमध्ये राहुरी तालुक्यातील एका १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर नाशिकच्या जंगलात अत्याचार झाला. राहुरी पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यानंतर त्याच महिन्यात तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलीवर हाँटेल कामगाराने अत्याचार केला. एलसीबीनं त्या नराधमाला सापळा लावून अटक केली. त्याच महिन्यात नगरमध्ये एका वर्गशिक्षकाने चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.
पोलिसांनी या शिक्षकालाही पोस्कोअंतर्गत अटक केली. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये जामखेड तालुक्यातही एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका साडेतेरा वर्षाच्या मुलीवर तिच्या बापाने व एका हाँटेल चालकाने बळजबरी अत्याचार केला. बरं, हा प्रकार फक्त एकदाच घडला नाही. तर या कोवळ्या मुलीवर वारंवार अत्याचार झाला. हे दोन्ही नराधम सध्या गजाआड आहेत.
जुलै २०२६ मध्ये पाथर्डी तालुकाही हादरला. एका १४ वर्षाच्या मुलीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. आता हे फक्त काही अतिचर्चेत आलेल्या घटना होत्या. परंतु गेल्या सहा महिन्यांत मुली व महिलांवरील अत्याचाराच्या तब्बल २५ ते ३० घटना नगरमध्ये घडल्या आहेत. हे सगळं गंभीर आहे. हे सगळे प्रकार अंगावर काटा आणणारे आहेत.नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १४ तालुक्यांत असे प्रकार घडले, हे त्याहून भयंकर होतं.
आता गेल्या मंगळवारी आमावस्येच्या दिवशी नगर जिल्ह्यात पुन्हा हादरला. संगमनेर तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीवर जबरी अत्याचार करण्याचा प्रकार घडला. मुलीच्या आईने धीर दाखवत, संगमनेर शहर पोलिसांत जाऊन हा सगळा प्रकार सांगितल्यावर पोलिसही हादरले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही ३३ वर्षीय महिला १५ वर्षांची मुलगी व मुलासह संगमनेर तालुक्यातील एका गावात राहते. मोलमजुरी करून ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. १४ जुलैला रात्री फिर्यादी महिला, तिची मुलगी आणि मुलगा नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. १५ जुलै रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेला अचानक जाग आली.
तेव्हा शेजारी झोपलेली तिची मुलगी अंथरुणात दिसली नाही. अगोदर मुलगी प्रातःविधीला गेली असेल असे तिला वाटले.परंतु १५-२० मिनिटं मुलगी घरात न आल्याने तिच्या आईला काळजी वाटली. त्यानंतर फिर्यादीने तात्काळ हातामध्ये बॅटरी घेऊन घराबाहेर जात मुलीचा शोध सुरू केला. बाथरुमची जागा, अंगण, आणि परिसरात मुलीचा शोध घेतला. तालुक्यात बिबट्याच्या वावराच्या बातम्या येत असल्याने आईचं काळीज धस्स झालं. त्यानंतर तिने घराशेजारी असलेल्या शेतात मुलीचा शोध सुरु केला.
शेताजवळ गेल्यावर तिला काहीतरी आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने ती गेली, तेव्हा तिची मुलगी व आरोपी गणेश चंद्रभान गायकवाड (वय २८, रा. खांडगाव, ता. संगमनेर) हे आक्षेपार्ह अवस्थेत होते. फिर्यादीने मुलीला जवळ बोलावले असता, आरोपीने तिला धमकावले. “तुझ्या आईकडे जाऊ नको. तुला कोण काय करतंय ते मी बघतो. कुणी काही केलं तर, एखाद्याला मारून टाकीन,” अशी धमकी आरोपीनं दिली. फिर्यादी महिला फोन आणण्यासाठी घरात गेली असता, आरोपीने तिथून पळ काढला.
त्यानंतर फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन सगळा प्रकार विचारला. तेव्हा मुलीने सांगितले की, आरोपी गणेश रात्री तीन वाजता खिडकीजवळ आला. त्यानं आपल्याला उठवलं. दरवाजा उघडायला सांगितला. नंतर शेतात नेऊन आपल्यावर अत्याचार केला. मुलीचं हे कथन ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली. फिर्यादीत पुढे सांगितल्याप्रमाणे, आरोपी गणेश गायकवाड व या फिर्यादीच्या कुटुंबाची पूर्वीपासून ओळख आहे. गणेश हा फिर्यादीच्या मावस भावासोबतच रोजंदारीचे कामे करत असतो. त्यामुळे त्याची व या कुटुंबाची पूर्वीपासून ओळख आहे. याच ओळखीतून आरोपीने या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
पीडितेच्या आईने दिलेल्या लेखी तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम ६४, कलम ३५१ (२), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ कलम ४, ६, ८ आणि १२ अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करत आहेत.
या घटनेने संपूर्ण तालुका हादरला. अल्ववयीन मुलींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. आज मोबाईल ही काळाची गरज बनली असली तरी आपली मुलं मोबाईलचा वापर कसा करतात, हे पालकांना डोळ्यात तेल घालून पाहणे आवश्यक झाले आहे. सोशल मीडियातील विविध प्लॅटफार्मद्वारे आपल्या मुलांपर्यंत नको तो मजकूर सहज पोहोचतो. चॅटींगसाठीही नुसते व्हाट्सअॅपच नाही, तर इतर अनेक प्लॅटफार्म वापरले जातात. त्यातूनच प्रेम, नातेसंबंध, लैंगिक शिक्षण, आकर्षण, याबाबत अल्पवयीन मुलां-मुलींमध्ये अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. हे सगळं चिंताजनक आहे. त्यातूनच असे प्रकार वाढले आहेत. शाळा, पालक, समाज आणि पोलिस या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. समाज सजग झाला तरच असे प्रकार थांबणार आहेत.





