जे कुठंच होत नाही, ते नगरला होतं. कुठंच नव्हता एवढा सहकार या जिल्ह्यात होता.त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरही नगर जिल्हा राज्यात कायम चर्चेत असायचा. या जिल्ह्यात विठ्ठलराव विखे, अण्णासाहेब शिंदे, बी. जे. खताळ, दत्ता देशमुख, बाबुराव तनपुरे, मारुतराव घुले, आप्पासाहेब राजळे, आबासाहेब निंबाळकर, यशवंतराव गडाख, काळे-कोल्हे, बाळासाहेब भारदे, असे एक ना अनेक दिग्गज होऊन गेले. १९६० व १९७० च्या दशकात नगर जिल्ह्यात अमुलाग्र बदल होत गेले. सहकार चळवळ फोफावत गेली. अनेक तालुक्यात साखर कारखाने उभे राहू लागले. जशी काँग्रेसच्या ताकद वाढत होती, तशीच डाव्या विचारसरणीची ताकदही वाढत होती.कॉम्रेड पी. बी. कडू, कॉम्रेड दत्ता देशमुख आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड यांसारख्या बलाढ्य नेत्यांनी साखर कारखान्यातील कामगार आणि शेतमजुरांचे मोठे संघटन उभे केलं होतं. काँग्रेससमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. सहकारातील अनेक दिग्गज काँग्रेससोबत असले तरी, अनेकांनी सहकारी साखर कारखाने उभे केल्याने त्यांच्या-त्यांच्यातही अंतर्गत गट तयार व्हायला लागले होते. वरुन एकत्र दिसणारे अनेक नेते, आतून मात्र एकमेकांसोबत छुपे युद्ध करु लागले होते.घराणेशाहीलाही सुरुवात झाली होती. नोव्हेंबर १९६९ मध्ये केंद्रात इंदीरा गांधींचे सरकार स्थापन झाले. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे ते मार्च १९७१ मध्ये विसर्जित झाले. हे स्वतंत्र भारतातील पहिले अल्पमतातील सरकार ठरले. त्यानंतर १९७१ ला पाचव्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या. तेव्हा कोपरगावचे तत्कालीन खासदार होते अण्णासाहेब शिंदे.अण्णासाहेब शिंदे हे उत्तरेतील काँग्रेसचे मोठे नेते. दोनदा ते येथूनच खासदार होते. केंद्रात मंत्रीही होते. परंतु तरीही कोपरगावमधून तिसरी निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना उत्तरेऐवजी दक्षिणेची निवडणूक लढवायची होती. मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. चव्हाणांना आता कोपरगावसाठी नवा उमेदवार शोधावा लागणार होता. याच उमेदवाराचा शोध आणि या निवडणुकीतील गमतीजमती आज आपण पाहणार आहोत…
अण्णासाहेब शिंदे हे १९६७ पर्यंत या मतदारसंघाचे खासदार होते. परंतु त्यांना सलग दोन निवडणुकीत मिळालेली मतांची आकडेवारी ही कमी होत गेली. उत्तरेत कम्युनिष्ठांचा प्रभाव वाढत होता. राहुरीचे पुंजाजी बापूजी कडू अर्थात पी. बी. कडू नावाचं वादळ उत्तरेत घोंगावू लागलं होतं. कडू हे फक्त राहुरी तालुक्यातीलच नाही, तर राज्यातील मोठे नेते होते. स्वातंत्र्यसैनिक होते. अण्णासाहेब शिंदे, धर्माजी पोखरकर, भाऊसाहेब थोरात, पी. जी. भांगरे, माजी खासदार चंद्रभान आठरे पाटील, रावसाहेब शिंदे, अशा अनेक सहकाऱ्यांसोबत ते समाजकारण आणि राजकारणात सक्रीय होते. वकीलही होते. कम्युनिष्ट पार्टीच्या वतीने त्यांनी विधानसभेच्या १९५२ आणि १९६२ च्या निवडणुका लढवल्या. परंतु तनपुरे यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला. आता याच कडू पाटलांना कम्युनिष्ठांनी कोपरगाव लोकसभेची उमेदवारी दिली होती. अण्णासाहेब शिंदेंनी नकार दिल्यावर कडू पाटलांविरोधात लढण्यासाठी काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध सुरु झाला.
संगमनेरचे बी. जे. खताळ पाटील, कोपरगावचे शंकरराव काळे,लोणीचे विठ्ठलराव विखे, राहुरीचे बाबुराव तनपुरे आदींच्या नावाची चर्चा झाली. खताळ, तनुपरेंना लोकसभा लढविण्याची इच्छाच नव्हती. विठ्ठलराव विखेंनाही कधीच निवडणूक लढवायची नव्हती. त्यामुळे दिग्गजांचा प्रश्न सुटला. शंकरराव काळे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यामुळे पेच पुन्हा वाढला. इकडं, इंदिरा गांधींना ज्येष्ठांपेक्षा तरुणांना उभं करायचं होतं. त्यामुळे तरुण उमेदवाराचा शोध सुरु करण्याच्या सुचना, केंद्रीय काँग्रेसकडून आल्या. यशवंतराव चव्हाणांनी विठ्ठलराव विखे व अण्णासाहेब शिंदेंना उमेदवार शोधण्याची जबाबदारी दिली. त्याच दरम्यान चंद्रभान आठरे पाटील हे मोठे नेते नुकतेच काँग्रेसमध्ये आले होते. त्यांच्या नावाचीही उमेदवारीसाठी चर्चा झाली. त्यांनीही अगोदर होकार कळवून, ऐनवेळी नकार कळवला. आता काँग्रेसच्या नेत्यांची गोची झाली.
त्याच काळात बाळासाहेब विखे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. अचानक त्यांचं नाव समोर आलं. उमेदवार मिळत नसल्यानं आणि स्वतः मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी जबाबदारी दिल्यानं, विठ्ठलराव विखे पाटलांनी बाळासाहेबांना निवडणुकीत उभं राहण्याचा आदेश दिला. बाळासाहेब विखेंच्या गळ्यात अनपेक्षित आणि बळजबरीनं लोकसभेची उमेदवारी पडली. समोर विरोधातील उमेदवार होते, काँम्रेड पी. बी. कडू…
मतदारसंघाचा विचार केला तर, काँग्रेसकडे उत्तरेत दिग्गज नेते होते. अण्णासाहेब शिंदे, बी. जे. खताळ, स्वतः विखे पाटील, श्रीरामपूरमध्ये आदीक, नेवाशात घुले-गडाख, राहुरीत तनपुरे, कोपरगावात काळे परंतु तरीही चर्चा मात्र पी. बी. कडू पाटलांचीच होती. कडू पाटील यांनी सुरुवातीच्या काळात विठ्ठलराव विखेंना या साखर कारखान्याच्या स्थापनेत मोठी मदत केली होती. मात्र पुढे कडू पाटील कम्युनिस्ट पक्षात सक्रिय झाले आणि संपूर्ण नगर जिल्ह्यात ‘लाल बावट्याचा’ दबदबा निर्माण केला होता.ते स्वातंत्र्यसैनिक तर होतेच, परंतु लढवय्ये नेते होते. त्यामुळे विखे-कडू हा सामना, दोन जुन्या सहकाऱ्यांमधील आणि दोन टोकाच्या विचारसरणीमधील होता. त्याऊलट बाळासाहेब विखेंची ही पहिलीच मोठी निवडणूक होती. नगर जिल्ह्यातील राजकीय गणितांमुळे काँग्रेसमधीलच काही अंतर्गत गट आणि विरोधी विचारांचे नेते बाळासाहेबांना पहिल्याच निवडणुकीत पराभूत करण्यासाठी गुप्तपणे एकत्र आल्याच्या चर्चा झाल्या. विखे पाटीलांचे सहकार क्षेत्रातील वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील इतर काही मातब्बर नेत्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कडू पाटीलांना छुपी ताकद दिल्याचे त्यावेळी सांगितले गेले. बाहेरून हे नेते विखेंसोबत असले तरी, आतून ते विखेंच्या विरोधात काम करु लागल्याचे विखेंना समजले. तोपर्यंत विखे पाटीलांनीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात कामाचे मोठे नेटवर्क तयार केले होते. विरोधकांनी कितीही एकजूट केली, तरी विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी गाव न् गाव पिंजून काढले आणि विखेंच्या बाजूने वातावरण फिरवलं. विखेंचा पराभव व्हावा, ही जिल्ह्यातीलच नाही तर थेट राज्यातील काही नेत्यांची इच्छा होती. परंतु बाळासाहेबांनी शेवटच्या काही दिवसांत स्वतः प्रचार हातात घेतला आणि वातावरण फिरवलं. त्यावेळी या मतदारसंघात तब्बल साडेसहाशे ते सातशे गावी होती. या सगळ्या गावांत बाळासाहेबांनी स्वतः फिरत लोकांना जोडलं. काँग्रेसचे काही स्थानिक नेत्यांची गेम लक्षात आल्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनीही या मतदारसंघात दोन सभा घेतल्या.
तिकडे, कडू पाटलांनीही प्रचाराचा झंजावात सुरुच ठेवला. कधी सायकलवर तर कधी पायी प्रचार करत हवा केली. अकोले, संगमनेर, राहुरी हे कम्युनिष्ठांचे बालेकिल्ले होते. या तिन्ही तालुक्यांत कडू पाटलांनी जोरदार प्रचार केला. पण अगदी शेवटच्या काही दिवसांत विखेंची जादू चालली. निकाल लागला त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनाही धक्का बसला. थोड्याथिडक्या नाही तर, तब्बल ६८ हजार ४४२ मतांनी बाळासाहेब विखे निवडून आले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब विखेंना १ लाख ७९ हजार ४९२ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी पुंजाजी बापूजी कडू यांना १ लाख १० हजार ०५० मते मिळाली होती. विखे पाटील यांनी हा सामना ६९,४४२ मतांच्या फरकाने जिंकला होता.कडू पाटीलांनी कडवी झुंज दिली होती. कोणतीही संसाधने हातात नसताना, त्यांनी १ लाखांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यांच्या स्वतःच्या राहुरी तालुक्यानं त्यांना आघाडी दिली होती, परंतु इतर तालुक्यात ते कमी पडले होते. या निवडणुकीतील पराभवानंतर कॉम्रेड पी. बी. कडू पाटील शांत बसले नाहीत. त्यांनी अधीक जोमाने कम्युनिस्ट चळवळ आणि सामाजिक कार्य सुरू ठेवले. पुढं १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा आमदारकीही मिळवली. या निवडणुकीने मात्र जिल्ह्याला बाळासाहेब विखेंच्या रुपाने एक नवा नेता दिला.





