
यंदा पावसाने दगा दिला, पिकांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या हातात येणारा उताराही घटला! मात्र, याच संकटाच्या काळात सोयाबीनच्या बाजारभावाने शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. नांदेडमध्ये नव्या सोयाबीनला नेमका किती भाव मिळतोय?
यंदा सोयाबीन उत्पादकांसाठी खरीप हंगाम मोठ्या संकटाचा ठरला आहे. पीक वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी पिके करपली. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली.
नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र तब्बल ४ लाख ६९ हजार २७५ हेक्टर आहे. मात्र, अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.
दुसरीकडे, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक कमी असल्याने दराला आधार मिळत आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६,१८५ ते ६,८८० रुपये भाव मिळत असून, सरासरी दर सुमारे ६,५०० रुपये आहे.
मात्र, कमी उत्पादनामुळे झालेलं नुकसान या दरातून भरून निघणार का? आगामी काळात आवक आणि मागणीवर बाजारभावाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढणार की घसरणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





