
अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ९० फूट उंच पुतळा आणि महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्याची घोषणा झाली होती. मात्र, आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासमोर मोठा अडथळा उभा राहिला आहे.
मंडळी, महेश्वरच्या धर्तीवर नगर तालुक्यातील चास येथे ६६ एकर जागेवर तब्बल ५८८ कोटी रुपये खर्चून अहिल्यादेवी सृष्टी उभारण्याची योजना होती. मे २०२५ मध्ये चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे जागेची मागणी केली. मात्र, संशोधन आणि इतर प्रकल्पांसाठी ही जागा आवश्यक असल्याचे सांगत विद्यापीठाने नकार दिला. त्यामुळे आता पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातही वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या होत्या. आता अहिल्यादेवी सृष्टीसाठी जागा कुठे मिळणार आणि ५८८ कोटींचा हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी साकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





