
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजकारण चांगलंच रंगताना दिसतंय. राजूरमधील एका कार्यक्रमात तालुक्यातील दिग्गज नेते एकाच मंचावर आले आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मिश्किल वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं.
‘मी नाव वल्हवतो, तुम्ही सर्व एकाच नावेत या,’ असं म्हणत विखेंनी इच्छुक उमेदवारांना एकजुटीचा संदेश दिला. मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन करताना त्यांनी ‘मतभेद चालतील, पण मनभेद नकोत,’ असा सल्लाही दिला.
या मंचावर आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, मधुकर नवले, सीताराम गायकर आणि कैलास वाकचौरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
विशेष म्हणजे, भविष्यात खासदारकीसाठी मतं मागायला यावंच लागेल, असं सांगत विखेंनी राजकीय संकेतही दिले. आता त्यांच्या या आवाहनानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेते खरंच एकत्र येणार की राजकीय समीकरणं वेगळंच वळण घेणार, याकडे लक्ष लागलंय.





