
नगर जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत राहणारा विषय कोणता? तर नगर-मनमाड रस्त्याचा. या रस्त्याच्या भांडवलावर कित्येक निवडणुका झाल्यात. हा रस्ता होईल, या स्वप्नांत एक तरुण, पिढी अक्षरशः म्हातारी झाली. पण या रस्त्याची साडेसाती, सरली नाही. शिर्डी व शनिशिंगणापूर या जगविख्यात देवस्थानांना जोडणारा हा रस्ता, गेल्या 20 वर्षांत कित्येकांना यमलोकाची सफर घडवून गेलाय. रस्ता तर खराब आहेत, पण कोल्हारच्या पुलावरील वाहतूक कोंडी हा नव्याने समोर आलेला प्रश्नही सध्या डोकेदुखी ठरतोय. हा रस्ता नेमका का रखडतोय? हा रस्ता चर्चेत का असतोय? हाच विषय आज आपण पाहणार आहोत…
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नगर-मनमाड रस्त्यासाठी अडीच हजार कोटींची आर्थिक तरतूद केली होती. त्यापूर्वी या कामाच्या दोनदा बीओटी तत्त्वावरील निविदाही काढल्या होत्या. या दोन्ही ठेकेदारांनी काही दिवसांनी हे काम अर्धवट सोडले. निविदा कमी रकमेत भरल्याने या ठेकेदारांना कामावरुन पळ काढावा लागला. त्यापूर्वीही एका ठेकेदाराने पळ काढला होता. त्यानंतर या तिन्ही ठेकेदारांवर कारवाई होईल, अशा बातम्या आल्या. त्यानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी हा रस्ता थेट हिवाळी अधिवेशनात मांडला. त्यानंतर गडकरी यांनी नवीन ठेकेदाराकडून हे काम करुन घेतले जाईल व कामास अडीच हजार कोटी दिले जातील, असे स्पष्ट आदेश दिले.
गडकरी यांनी हा रस्ता का पूर्ण होत नाही, याचे खरे कारण सभागृहात सांगितले. ते म्हणाले की, या रस्त्यासाठी आत्तापर्यंत अनेकदा अडथळे आले. तीन ठेकेदार पळून गेले. कामाच्या तीन वेळा निविदा काढाव्या लागल्या. ठेकेदार निविदा प्रक्रियेत भाग घेतात व 30 ते 35 टक्के कमी रकमेने काम घेतात. ते काम पूर्ण न करताच पळून जातात. खरं तर या ठेकेदारांना ठेका देताना सरकारचेच चुकते, हेही गडकरी यांनी मान्य केले. ते म्हणाले, नवीन ठेकेदारांना संधी मिळावी, म्हणून आपण कमी रकमेच्या नव्या ठेकेदारांना संधी दिली. परंतु त्यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. त्यामुळे आता योग्य ठेकेदार व योग्य रक्कमेच्या निविदा या दोन्ही बाबी तपासून पाहिल्या जातील. नवीन दोन ठेकेदारांना या कामाची संधी देण्याचे नियोजन सुरु आहे. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यावर मलमपट्टी करण्यात येईल, असेही त्यावेळी गडकरी यांनी सांगितले होते.
अनेक अडथळे पार करत अखेर सप्टेंबर महिन्यांत नगर-मनमाड रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. रस्ता करण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यास सुरुवात झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनीक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली. त्यामुळे येत्या काही महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता वाढली आहे. सावळीविहिर ते कोपरगाव या मार्गावरील उड्डाणपुलाचची कामे पूर्ण झाली आहेत. अन्य कामेही वेळेत पूर्ण होतील, असे पालकमंत्री विखेंनी सांगितले. आगामी नाशिक कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी व शनिशिंगणापूर या देवस्थानला जोडणारे सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत. महायुती सरकारने त्यासाठी भरीव निधीही दिला आहे.
हा रस्ता का खराब होतो, त्याची काही कारणेही सांगता येतात,मुळात महाराष्ट्राच्या मध्यवर्ती असणाऱ्या नगर जिल्ह्यातील हा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर रोज हजारो वाहने धावतात.
⦁ सुमारे चार-पाच राज्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने त्यावर अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते.
⦁ वारंवार नवे ठेकेदार व नित्कृष्ठ काम, यामुळे डागडुजी होऊनही अवघ्या काही महिन्यांत हा रस्ता पुन्हा जैसे थे होतो.
⦁ कधी राज्य महामार्ग, कधी राष्ट्रीय महामार्ग कधी नॅशनल हायवे ऑथोरिटी यामुळे या रस्त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.
⦁ शिर्डी व शनिशिंगणापूर या दोन्ही देवस्थानांना जोडणारा हा रस्ता असल्याने त्यावर रोज शेकडो भाविकांची वर्दळ असते.
⦁ बाह्यवळ रस्तेही खराब असल्याने याच मार्गाच जास्तीत जास्त वापर होतो. त्यामुळे तो लवकर खराब होतो.
कोपरगाव, सावळीविहीर, शिर्डी, राहाता, कोल्हार, बाभळेश्वर, राहुरी फॅक्टरी, राहुरी, शिंगणापूर फाटा अशी अनेक महत्त्वाची गावे असल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या, आठवड्यातून अनेकदा लाखांच्या घरात असते. त्यामुळेच हा रस्ता प्रमाणापेक्षा जास्त लवकर खराब होतो. जड वाहनांना पर्यायी व्यवस्था करुन दिली किंवा आहे तोच रस्ता सहा पदरी केला तर तो जास्त दिवस टिकू शकतो. शिवाय मोठ्या शहरांत उड्डाणपूल व गोदावरी, प्रवरा व मुळा या नद्यांवरील पुलांची कामेही झाली तर या रस्त्याचे आयुष्यही वाढेल, असे सांगितले जात आहे.





