दोन कोटींहून अधिक किंमतीचे अस्सल सोन्याचे दागिने… आणि तेही तुम्हाला कुणी फक्त ३५ लाख रुपयांत देतोय असं म्हटलं, तर तुमचा विश्वास बसेल..? नक्कीच नाही! पण, जर समोरच्याने तुम्हाला प्रत्यक्ष सोन्याचा तुकडा हातात देऊन खात्री करायला लावली तर? झटपट श्रीमंत होण्याच्या याच मोहातून अहिल्यानगरमध्ये एक असा भयानक खेळ रचला गेला, ज्याचा शेवट थेट पोलीस कोठडीत झाला.
आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या एका हाय-प्रोफाइल गुन्हेगारी कटामागे, जिथे नागपूरहून आलेल्या एका आंतरजिल्हा टोळीने नवनागापूरच्या एका व्यावसायिकाला कोट्यवधींच्या सोन्याचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं. पण, त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, हे नगर जिल्ह्यातील पहिलंच प्रकरण नाही! यापूर्वी बीडच्या महिला चोरांनी कर्जतच्या सराफाला कसं लुटलं होतं. आणि नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात हा ‘गोल्ड ट्रॅप’चा विळखा कसा वाढतोय? याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा, आरोपींची नावं आणि त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ आज आपण या व्हिडिओत उघड करणार आहोत.
सर्वप्रथम वळूयात ताज्या घटनेकडे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. ठिकाण होतं, अहिल्यानगर शहरातील जुना आरटीओ कार्यालय परिसर. नवनागापूर, एमआयडीसी भागात राहणारे ३० वर्षीय व्यावसायिक सचिन बाळासाहेब वाघ यांना अनोळखी व्यक्तींचे फोन येतात. हे भामटे अत्यंत चतुर होते. त्यांनी वाघ यांचा विश्वास संपादन करण्यासाठी एक कथा रचली. कथा अशी की, ‘आमच्या घराच्या खोदकामादरम्यान आम्हाला गुप्तधन सापडलंय. त्यात तब्बल १ किलो ६०० ग्रॅम सोने म्हणजेच पावणे दोन किलो सोनं मिळालंय. आम्हाला हे सोने तातडीने विकायचं आहे आणि आम्ही ते बाजारभावापेक्षा अत्यंत स्वस्त दरात देऊ…
आजच्या बाजाराचा हिशोब केला, तर २४ कॅरेट अस्सल १६०० ग्रॅम सोन्याची किंमत होते सुमारे २ कोटी ४४ लाख रुपये! पण या टोळीने सचिन वाघ यांना हे संपूर्ण सोनं फक्त ३५ लाख रुपयांत देण्याचा सौदा केला. १ किलोच्या मुख्य व्यवहारासाठी सचिन वाघ तयार झाले.
भामट्यांनी पहिली अट घातली—’व्यवहार पक्का करण्यासाठी आधी टोकन अमाऊंट द्यावी लागेल.’
वाघ यांनी विश्वास ठेवून १ लाख रुपये रोख त्यांच्या स्वाधीन केले. उरलेले ३४ लाख रुपये घेऊन मुख्य व्यवहारासाठी जागा ठरली—’जुन्या आरटीओ कार्यालयाचा परिसर! आणि वेळ ठरली रात्री ११ ची…
पण म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं! सचिन वाघ यांना या तिघांच्या वागण्याचा संशय आला. त्यांनी ३४ लाख रुपये चोरांच्या हाती देण्याऐवजी थेट गाठलं अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय. पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. आरटीओ परिसरात साध्या वेशात पोलिसांचे जाळे पसरले. जसे आरोपी सचिन वाघ यांच्याकडून उरलेली रक्कम घेण्यासाठी पुढे आले, तसे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घातली आणि तिघांच्या मुसक्या आवळल्या!
आता पाहूयात हे आरोपी नक्की कोण होते आणि त्यांचा प्लॅन काय होता. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत:
१. राहुल शंभू सोलंकी (वय २४)
२. नंदू मानसिंग सोलंकी (वय ३६)
३. पूजा राहुल सोलंकी (वय २४)हे तिघेही मूळचे रामटेक, जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहेत.
म्हणजे ही एक ‘आंतरजिल्हा टोळी’ आहे. पोलिसांनी जेव्हा यांची अंगझडती घेतली, तेव्हा पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. त्यांच्याकडे १६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि तब्बल ११ मोबाईल फोन सापडले. अर्थात हे पावणे दोन किलो सोने बनावट होते, हे सांगायला नको… या तिघांकडे तब्बल ११ मोबाईल का होते? हा प्रश्न पडला. या कारवाईत एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे एक मोठं रॅकेट आहे.
आता समजून घेऊया यांची ‘मोडस ऑपरेंडी’ म्हणजेच गुन्ह्याची पद्धत. या टोळ्या थेट कोणावरही हल्ला करत नाहीत, तर ते सायकोलॉजिकल गेम खेळतात.
स्टेप १ –
टार्गेट शोधणे: हे भामटे वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन लहान व्यावसायिक किंवा जमीनदारांचे मोबाईल नंबर मिळवतात.
स्टेप २ – सोन्याचा खरा तुकडा :
सुरुवातीला ते टार्गेटला भेटून एक छोटा अस्सल सोन्याचा तुकडा किंवा मणी किंवा वेढा देतात. आणि सांगतात की हा खोदकामात सापडलाय, तुम्ही सोनाराकडून तपासून घ्या. जेव्हा तो तुकडा खरा निघतो, तेव्हा टार्गेटचा पूर्ण विश्वास बसतो.
स्टेप ३ – अंतिम फटका :
मुख्य व्यवहाराच्या वेळी हे भामटे मूळ अस्सल सोन्याऐवजी तंतोतंत सोन्यासारखे दिसणारे गिल्टचे किंवा पितळेचे बनावट दागिने देतात, पैसे घेतात आणि फोन बंद करून पसार होतात. सचिन वाघ यांच्या प्रकरणातही हाच फॉर्म्युला वापरला जात होता, पण पोलिसांनी तो हाणून पाडला.
मित्रांनो, नागपूरच्या या टोळीने तर फक्त फसवणुकीचा प्रयत्न केला. पण याच नगर जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील महिला चोरांच्या टोळीने थेट एका सराफालाच लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती. स्थान आणि काळ होता—कर्जत तालुका.बीडहून आलेल्या या महिला चोरांच्या टोळीची पद्धत अत्यंत हिंसक आणि नियोजनबद्ध होती. या महिला साध्या ग्राहकाच्या वेशात सराफाच्या दुकानात प्रवेश करायच्या.
स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने किंवा हातचलाखी करून त्यांनी सराफाचे लक्ष विचलित केले. त्यानंतर केवळ नजरचुकीने दागिने लांबवणे नव्हे, तर प्रसंगी धमकावून लुटमार करण्याचा थरार त्यांनी घडवून आणला होता.पोलिसांनी या टोळीचा माग काढत बीडमधून महिला आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. नागपूरची टोळी असो वा बीडची महिला टोळी, या सर्वांचं मुख्य केंद्र ‘अहिल्यानगर’ जिल्हा का बनतंय? हा आता सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे.
आता, नजर टाकूयात गेल्या वर्षभरात नगर जिल्ह्यात घडलेल्या अशाच काही प्रमुख ‘गोल्ड ट्रॅप’ आणि फसवणुकीच्या घटनांवर:
घटना १ (सप्टेंबर २०२६) –
मोहनमाळ फसवणूक :
याच महिन्यात नगरमधील एका व्यावसायिकाला खोदकामात जुनी सोन्याची मोहनमाळ सापडल्याचे सांगून दोन भामट्यांनी पिवळ्या धातूची नकली माळ गळ्यात मारली आणि १ लाख रुपये रोकड घेऊन पसार झाले.
घटना २ (मार्च २०२६) –
राहाता येथील साधू टोळी :
नगर-मनमाड रस्त्यावर राहाता शहरात साधूच्या वेशात आलेल्या भामट्यांनी एका महिलेला स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून तिच्या हातातील अस्सल सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम हातचलाखीने लांबवली होती. पोलिसांनी त्यांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून अटक केली होती.
घटना ३ (मे २०२५) –
शेवगावमधील राजकीय नेत्याची फसवणूक :
शेवगावच्या विद्यानगर भागात एका भामट्याने बनावट दागिने अस्सल असल्याचे भासवून एका स्थानिक नेत्याला तब्बल ४ लाख रुपयांचा गंडा घातला होता.
घटना ४ (एप्रिल २०२५) –
कॅनरा बँक घोटाळा, जामखेड :
केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर बँकेलाही यात सोडले गेले नाही. जामखेडमध्ये गोल्ड व्हॅल्युअरच्या मदतीने काही खातेदारांनी बनावट सोने तारण ठेवून बँकेला १७ लाख ७३ हजार रुपयांचा चुना लावला होता. गेल्या वर्षभरात, अशा किमान १० घटना घडल्या.
मित्रांनो, या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते—भामटे तुमच्या ‘झटपट श्रीमंत’ होण्याच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात. बाजारभावापेक्षा अर्ध्या किंवा अत्यंत कमी किंमतीत कोणीही सोने विकू शकत नाही, हा साधा नियम आपण विसरतो. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने नागरिकांना स्पष्ट आव्हान केले आहे की, जर तुम्हाला कोणीही ‘सापडलेले सोने’, ‘गुप्तधन’ किंवा ‘स्वस्त सोने’ असा आमिष दाखवत असेल, तर ते १००% बनावट आहे. अशा फोन कॉल्सना बळी पडू नका आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.नागपूरच्या या टोळीकडून जप्त केलेल्या ११ मोबाईलमधून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.





