मित्रांनो, आपण २०२६ मध्ये जगत आहोत. भारत चंद्रावर पोहोचलाय, आपण ५ G इंटरनेट वापरतोय, गप्पा डिजिटल इंडियाच्या मारतोय… पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे, ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. संतापाने तुमचं रक्त उकळेल..!पुरोगामी महाराष्ट्राच्या छातीवर आजही एक अशी समांतर न्यायव्यवस्था चालते, जी कायद्याला मानत नाही. जी संविधानाला पायाखाली तुडवते! होय, आम्ही बोलतोय ‘जातपंचायती’बद्दल. एका बाजूला कायदा आणि दुसरीकडे या स्वयंघोषित पंचांची हुकूमशाही! अहिल्यानगर जिल्ह्यात एका गरीब कुटुंबाने आपल्याच जातीतल्या मुलाशी मुलीचा प्रेमविवाह लावून दिला म्हणून, चक्क १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सुया-फण्या विकणाऱ्या बापानं, ५० हजार रुपये कर्ज काढून या कथित पंचांना दिले, पण उरलेले पैसे देता आले नाहीत म्हणून संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आली. जातीबाहेर काढण्यात आलं… ही केवळ एक घटना नाही. नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अशा अनेक अंगावर शहारे आणणाऱ्या घटना घडल्या आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्यातील जातपंचायतीचा संपूर्ण कच्चा चिट्ठा, सरकारने केलेला कायदा आणि या अमानुष प्रथेच्या शहारे आणणाऱ्या घटना…
चला, सर्वात आधी समजून घेऊया आत्ताची, म्हणजेच सप्टेंबर २०२६ मधील घटना. जी कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे घडलीय.धामोरी येथे नंदीवाले तिरमली समाजाचे भाऊसाहेब आनंदा अहिरे हे आपल्या कुटुंबासह राहतात. अत्यंत गरिबी, घर नाही, पालामध्ये राहायचं आणि सुया, फण्या, छोट्या-मोठ्या वस्तू गल्लोगल्ली विकून कसाबसा पोटाचा खड्डा भरायचा. त्यांच्या कुटुंबातील एका मुलीनं आपल्याच जातीतील एका मुलासोबत प्रेमविवाह केला. खरं तर जात एकच होती, मुला-मुलीची संमती होती. दोघेही सज्ञान होते. पण… जातपंचायतीला हे मान्य नव्हतं..! कारण पंचांच्या परवानगीशिवाय लग्न कसं झालं? हा प्रश्न पंचांना होता. पंचांचा अहंकार दुखावला गेला. त्यानंतर धामोरी येथे जातपंचायत भरवण्यात आली. त्या गरीब बापाला पंचांसमोर उभं करण्यात आलं आणि फतवा निघाला–
‘१ लाख रुपये दंड भरा, नाहीतर जातीबाहेर काढू!’
विचार करा मित्रांनो, ज्या कुटुंबाला रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, ते १ लाख रुपये कुठून आणणार? पण समाजातून बहिष्कृत होण्याच्या भीतीने त्या बापाने लोकांसमोर हात पसरले, ५० हजार रुपयांचं कर्ज काढलं आणि पंचांच्या झोळीत टाकलं. उरलेले ५० हजार देण्यासाठी त्यांनी मुदत मागितली. पण पंचांना दया माया नसते.उरलेली रक्कम मिळाली नाही म्हणून या अमानुष पंचांनी काय केलं माहितीये? भाऊसाहेब अहिरे यांच्या संपूर्ण कुटुंबाला, महिलांना अमानुष मारहाण केली! एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर संपूर्ण समाजात फतवा काढला.
‘या कुटुंबाशी कोणीही बोलायचं नाही, सुख-दुःखात न्यायचं नाही, त्यांच्या मुलीला त्यांना भेटू द्यायचं नाही. जर समाजातल्या कुणी त्यांच्याशी संबंध ठेवला, तर त्यालाही जातीबाहेर काढून दंड केला जाईल!’
हे आम्ही म्हणत नाही, तर कोपरगाव पोलिसांत जो गुन्हा दाखल आहे, तोच आम्ही सांगतोय. हा कोणता न्याय आहे? हा कोणता समाज आहे? एका बापाची पोटची मुलगी हिरावून घेतली जातेय आणि प्रशासन काय करतंय?
तुम्हाला वाटत असेल की ही पहिलीच घटना आहे? तर नाही! नगर जिल्हा या जातपंचायतीच्या छळामुळे वारंवार बदनाम झाला आहे. आपण भूतकाळात डोकावून पाहूया:
घटना क्र. १ :
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गाव (वर्ष होतं २०१४-१५)
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील एका इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीला नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील एका गुंडाने छेड काढली. विशेष म्हणजे ही मुलगी व तो गुंड मुलगा एकाच जातीतील होते. पीडित कुटुंबाने हिंमत दाखवली आणि राहुरी पोलिसांत याविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पण तो जामिनावर बाहेर आला. आणि तिथेच एंट्री झाली ‘नाथपंथी डावरी गोसावी’ समाजाच्या जातपंचायतीची..! पंचांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला धमकी दिली–
‘पोलीस केस मागे घ्या, नाहीतर संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकू!’
म्हणजे न्यायासाठी लढणाऱ्या कुटुंबाचाच गळा घोटण्याचा प्रयत्न झाला.
घटना क्र. २ :
श्रीरामपूर-निपाणी वडगाव (मार्च ते मे २०२३)
गुन्हेगारी फक्त अशिक्षितांमध्येच घडते असं नाही. तर सुशिक्षितांनाही कसं छळलं जातं याचं उदाहरण म्हणजे श्रीरामपूरची ही घटना. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील वैदू समाजातील एका सुशिक्षित डॉक्टर कुटुंबाने समाजातील जुनाट, जाचक रूढी-परंपरांना विरोध केला. पंचांना हे सहन झालं नाही. त्यांनी या डॉक्टर कुटुंबावर अघोषित सामाजिक बहिष्कार टाकला. मे २०२३ मध्ये या कुटुंबाच्या सख्ख्या भाच्याचं लग्न होतं. परंतु नवरदेवाच्या आईनं म्हणजेच सख्ख्या बहिणीने आपल्या डॉक्टर भावाला पत्र लिहून रडत-रडत सांगितलं की-
‘भावा, पंचांच्या भीतीने मी तुला माझ्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देऊ शकत नाही, तू लग्नाला येऊ नकोस, नाहीतर आम्हाला समाज देशोधडीला लावेल!’
रक्ताच्या नात्यात जातपंचायतीने विष पेरलं होतं.
घटना क्र. ३ : जामखेड (जुलै २०२३)
जामखेडच्या आरोळे वस्ती येथील डावरी समाजाची ही घटना. एका बापाने सासरच्या जाचापासून मुलीला वाचवण्यासाठी पोलिसांच्या ‘भरोसा सेल’मध्ये तक्रार केली. पोलिसात का गेला? म्हणून जातपंचायतीने त्या ५० वर्षीय मजुराला आणि त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. एवढंच नाही तर, चक्क ३ लाख रुपयांचा दंडही केला! पण या कुटुंबाने हार मानली नाही. त्यांनी जामखेड पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी पंचांवर गुन्हे दाखल केले.
आता सर्वात मोठा प्रश्न–
आपल्या देशात कायदा नाही का? सरकार काय करतंय?
मित्रांनो, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं असं राज्य आहे, ज्याने जातपंचायतीच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी
‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण प्रतिबंध व निवारण अधिनियम, २०१७
म्हणजेच Social Boycott Prohibition Act पास केलाय.
या कायद्यानुसार :
-जातपंचायत भरवणे, कोणाला दंड करणे, किंवा समाजीतून वाळीत टाकणे हा जामीन न मिळणारा गंभीर गुन्हा आहे.
-दोषी पंचांना ७ वर्षांपर्यंत कडक कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
-सामाजिक बहिष्कार टाकू अशी नुसती धमकी देणे सुद्धा गुन्हा आहे.मग तरीही या घटना का घडतात?
या घटना प्रामुख्याने फिरत्या, भटक्या-विमुक्त जमातींमध्ये जास्त घडतात. का?
कारण :१. शिक्षणाचा अभाव:
या समाजातील अनेक लोक अजूनही मुख्य प्रवाहापासून, शिक्षणापासून दूर आहेत.
कारण २.
असुरक्षिततेची भावना :
कायम भटकंती करावी लागत असल्यामुळे त्यांना पोलिसांपेक्षा आपल्या ‘जातीच्या कोर्टावर’ जास्त विश्वास ठेवावा लागतो.
कारण ३.
पंचांची आर्थिक हाव :
दंडातून जमा होणारे लाखो रुपये हे पंच स्वतःच्या खिशात टाकतात किंवा दारू-मटणाच्या पार्ट्यांवर उडवतात. हा एक प्रकारचा ब्लॅकमेलिंगचा धंदा बनला आहे.
जातपंचायतीचे हे पंच स्वतःला देवापेक्षा मोठे समजतात का? संविधानापेक्षा मोठा तुमचा कोणता कायदा आहे? सुया-फण्या विकणाऱ्या त्या गरीब कुटुंबाचे ५० हजार रुपये हडपताना तुमच्या हाताला थरकाप कसा सुटला नाही? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते आज या कुटुंबांच्या पाठीशी उभे आहेत. कोपरगावच्या धामोरी येथील पंचांना जेलची हवा खावीच लागेल..! पण मित्रांनो, कायदा फक्त पुस्तकात राहून चालणार नाही, तो जमिनीवर अमलात आला पाहिजे.आता प्रेक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे हवंय– काय आजच्या डिजिटल युगात अशा जातपंचायतींना पूर्णपणे बॅन करून, त्यांच्या पंचांना जन्मठेपेची शिक्षा द्यायला हवी की नको?





