
बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे येत्या रविवारी सुद्धा देशातील बँका सुरू राहणार आहेत. पण असं का घडतंय? चला जाणून घेऊयात. मंडळी, 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान बँक कर्मचारी संघटनांनी तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्याआधी 26 सप्टेंबरला चौथा शनिवार आणि 27 सप्टेंबरला रविवार असल्याने सलग पाच दिवस बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता होती.
ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आरबीआयने बँकांना 27 सप्टेंबर, रविवारी शाखा आणि करन्सी चेस्ट सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका या दिवशी नेहमीप्रमाणे कामकाज करतील. म्हणजेच रोख रक्कम जमा करणे, काढणे आणि इतर अत्यावश्यक बँकिंग कामे रविवारी करता येऊ शकतात.
दरम्यान, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यासह काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे. संपाच्या काळात डिजिटल बँकिंग आणि एटीएम सेवा उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष करायची महत्त्वाची कामे असल्यास 27 सप्टेंबरचा दिवस ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.





