
अहिल्यानगर : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने परतणाऱ्या कारला चेन्नई-बंगळूरु द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला. बंगारपेठजवळील मारगल परिसरात गुरुवारी (२५ सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दोन युवा उद्योजकांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने अजनुज गावावर शोककळा पसरली आहे.
भरधाव कार दुभाजकाला धडकली
पोलिसांच्या माहितीनुसार, तिरुपती येथून दर्शन घेऊन हे सर्वजण बंगळूरमार्गे पुण्याकडे निघाले होते. मारगल परिसरात कार वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार महामार्गाच्या दुभाजकावर आदळली आणि धडकेनंतर अनेक वेळा उलटली. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
श्रीगोंद्यातील दोन युवा उद्योजकांचा मृत्यू
या दुर्घटनेत अजनुज, ता. श्रीगोंदा येथील किरण बाळासाहेब जगदाळे (३६) आणि नवनाथ गोरख गायकरवाड (३४) या दोन युवा उद्योजकांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत राजळे, ता. फलटण येथील विशाल अशोक शेडो (४६) आणि कारचालक विश्वनाथ दिगंबर पवार (३४, रा. नांदेड) यांचाही मृत्यू झाला.
अपघातात सोमनाथ कोळे (५३) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कोलार तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी
अपघाताची माहिती मिळताच केजीएफचे पोलिस अधीक्षक शिवांश राजपूत आणि पोलिस निरीक्षक रविकुमार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी बंगारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तालुका रुग्णालयात पाठवण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
अजनुजमध्ये शोकाकुल वातावरण
किरण जगदाळे आणि नवनाथ गायकरवाड यांच्या अकाली निधनाने अजनुज गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांवरही २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता अजनुज येथील भीमा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
किरण जगदाळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. नवनाथ गायकरवाड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
विशाल शेडो यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. तर विश्वनाथ पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे.
तिरुपती दर्शनानंतर पुण्याकडे परतताना घडलेल्या या भीषण दुर्घटनेने चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अजनुजसह श्रीगोंदा तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे.





