Explained

अकोल्याचा साधा शेतकरी ते पुण्याचा ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’… दगडूशेठ गणपतीच्या मुर्तीचा थक्क करणारा प्रवास…

पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती..! ज्या बाप्पाच्या दर्शनासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून मोठमोठे उद्योगपती ते बॉलिवूडचे स्टार्स लायनीत उभे राहतात..! ज्या बाप्पाच्या अंगावर कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. पण… या ‘श्रीमंत’ साम्राज्याचा पाया पुण्यात नाही, तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या मातीत रचला गेला होता, असा दावा केला जातोय, हे तुम्हाला माहितीये का? होय..! ज्यांना जग ‘श्रीमंत दगडूशेठ’ म्हणून ओळखतं, ते मूळचे पुण्याचे नव्हतेच. ते होते अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे एक साधे शेतकरी, दगडू धोंडिबा आरोटे! खिशात एक रुपया नसताना अकोल्याच्या मातीतून निघालेला एक तरुण पुण्याचा ‘श्रीमंत’ कसा बनतो? ‘दगडू आरोटे’ ते ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’ हा प्रवास किती थरारक होता? आणि त्यांच्या कुटुंबाने पुण्याला दिलेले ते दोन अथांग भक्तीचे सागर कोणते? आजपर्यंतचा सर्वात सविस्तर इतिहास आज आपण पाहणार आहोत…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या खऱ्या आडनावाबद्दल व मुळ गावाबद्दल समाजात विविध मतप्रवाह आणि दावे आहेत. दगडूशेठ हलवाई यांच्या वंशजांनी, स्वतःचे मूळ आडनाव श्रीवास्तव असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या वंशजांनी केलेला, श्रीवास्तव आडनावाचा दावाच सत्य समजला जातो. शिवाय त्यांचे मुळ गाव उत्तर प्रदेश व नंतर नाशिक तालुक्यात होते, असेही दावे आहेत. पुण्यात हलवायाच्या व्यवसाय करत असल्याने त्यांचे आडनाव हलवाई झाल्याचे काही वृत्तपत्रामध्ये सांगितले गेले आहे. इंटनेरवरील काही दाव्यांमध्ये तर दगडूशेठ हे मुळचे कर्नाटकातील असल्याचे व त्यांचे मुळ आडनाव गडवे असल्याचेही म्हटले जाते. आज आपण अशाच दाव्यांपैकी एक असलेल्या, आरोटे नावाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील दाव्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. दगडूशेठ यांच्या वंशजांच्या मते, त्यांचे आडनाव श्रीवास्तवच आहे. परंतु आज आपण फक्त आरोटे नावाच्या चर्चेची कथा किंवा व्हायरल गोष्टी आपण समजून घेणार आहोत. नगर जिल्ह्यातील काही स्थानिक वृत्तपत्रांचा आधार घेतला तर, आरोटे यांची कुलदैवी असणाऱ्या टाहाकारी मातेच्या दर्शनाला अजूनही हलवाई कुटुंब येतं, अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत… असो…

गोष्ट सुरू होते साधारण १८७० च्या दशकात. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात राहणारे दगडू धोंडिबा आरोटे. शरीरानं धिप्पाड, कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना माती चारणारे पहिलवान! पण घरात गरिबी पाचवीला पुजलेली. गावात शेती करूनही पोट भरेनासं झालं. जेव्हा दुष्काळाने कंबरडं मोडलं, तेव्हा या तरुणानं आपल्या अकोल्याच्या मातीचा निरोप घेतला. हाताशी काहीच नव्हतं, डोळ्यात फक्त कुटुंब चालवण्याचं स्वप्न होतं. दगडू आरोटे पुण्यात गेले. पुण्यात आल्यावर जगायचं कसं? कोणतीही ओळख नव्हती. पण अकोल्याच्या या तरुणाच्या मनगटात ताकद होती आणि हातामध्ये एक कला होती. त्यांनी पुण्याच्या बुधवार पेठ परिसरात मिठाई बनवण्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या हाताला अशी चव होती की, त्यांनी बनवलेले पेढे आणि बर्फी खायला अख्खं पुणे गर्दी करू लागलं. लोक त्यांचं मूळ आडनाव ‘आरोटे’ विसरले आणि अकोल्याचा दगडू आरोटे पुण्यात ‘दगडू हलवाई’ म्हणून ओळखला जाऊ लागले! हा होता त्यांचा पहिला प्रवास!

मित्रांनो, कष्ट कधीच वाया जात नाहीत..! दगडू हलवाई यांच्या मिठाईचा ब्रँड पुण्यात एवढा मोठा झाला की, त्या काळात शनिवार वाड्यापासून ते बुधवार पेठेपर्यंत त्यांच्या मिठाईची नावजलेली दुकाने सुरू झाली. व्यापार वाढला, संपत्ती आली. पुण्यातील मोठे व्यापारी, सरदार आणि इंग्रज अधिकारीही त्यांच्या दुकानावर येऊ लागले. पुण्याच्या व्यापारी जगतात त्यांनी स्वतःचे एक मानाचे स्थान निर्माण केले. एका सामान्य हलवायाचे रूपांतर आता पुण्याच्या एका मोठ्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यात झाले. लोकांनी आता त्यांना आदरानं ‘दगडूशेठ हलवाई’ म्हणायला सुरुवात केली! एका सामान्य शेतकऱ्याचा ‘शेठ’ बनण्याचा हा प्रवास आजही थक्क करणारा आहे.

पण मित्रांनो, दगडूशेठ फक्त पैशाने श्रीमंत झाले नव्हते. तर ते मनाचेही राजे होते. अहिल्यानगरच्या मातीतला जो दातृत्वपणा असतो ना, तो त्यांच्या रक्तात होता. पुण्यात आलेल्या कोणत्याही गरिबाला, गरजूला दगडूशेठ कधीच रिकाम्या हाताने पाठवत नसत. दुष्काळ असो किंवा महामारी, दगडूशेठ यांनी आपली तिजोरी गरिबांसाठी खुली केली होती. त्या काळी पुण्यात अनेक सामाजिक कामे, आखाडे आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी सढळ हाताने मदत केली. पैशाची श्रीमंती अनेकांकडे असते, पण हृदयाची श्रीमंती अकोल्याच्या या सुपुत्राकडे होती. त्यांच्या याच अफाट दानशूर आणि परोपकारी स्वभावामुळे पुण्याच्या जनतेने त्यांना एका सर्वोच्च पदवीने सन्मानित केले, ती पदवी म्हणजे– ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’

पण नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. यश, पैसा, कीर्ती सगळं काही पायाशी असताना, वर्ष १८९२ मध्ये पुण्यात एक भयंकर वादळ आलं. ते वादळ होतं– प्लेगची महामारी! या महामारीने पुण्यात हसतीखेळती घरे उद्ध्वस्त केली. आणि याच जीवघेण्या साथीने श्रीमंत दगडूशेठ यांच्या घरावर घाला घातला. दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा एकुलता एक मुलगा प्लेगच्या साथीने मरण पावला. ज्या मुलासाठी हे एवढं मोठं साम्राज्य उभं केलं होतं, तोच डोळ्यांसमोर गेला. या धक्क्यातून हे दांपत्य सावरत नाही, तोच अवघ्या काही महिन्यांत, १८९७ मध्ये स्वतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचेही निधन झाले! एका बाजूला पतीचं छत्र हरपलं, दुसऱ्या बाजूला पोटचा गोळा गेला. घरात कोट्यवधीची श्रीमंती होती, पण ती भोगायला कोणीच नव्हतं. लक्ष्मीबाई पूर्णपणे अंधारात बुडाल्या होत्या.

अशा अत्यंत कठीण काळात लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण बनून आले त्यांचे आध्यात्मिक गुरू, इंदूरचे योगाभ्यासानंद माधवनाथ महाराज! महाराजांनी लक्ष्मीबाईंचे सांत्वन केले आणि सांगितले, ‘माऊली, दुःखातून बाहेर पडा. आता संपूर्ण समाजच तुमची मुलं आहेत. लोकांच्या मनाला शांती देण्यासाठी कार्य करा.’ गुरूंच्या आज्ञेवरून लक्ष्मीबाईंनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या राहत्या वाड्याचे रूपांतर एका भव्य दत्तमंदिरात करण्याचे ठरवले! श्री माधवनाथ महाराजांनी स्वतः जयपूरहून अतिशय दुर्मिळ अशा पांढऱ्या संगमरवरी दगडातील दत्तमूर्ती पुण्यात आणली. आणि याच वाड्यात त्या मूर्तीची स्थापना झाली. हेच मंदिर आज पुण्यात ‘कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर’ म्हणून ओळखले जाते.

आता आपण जाणून घेऊयात, ज्या बाप्पाच्या दर्शनाला अख्खं जग येतं, त्या मूर्तीचा प्रवास कसा होता. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या इतिहासात एकूण ३ मूर्ती बनवल्या गेल्या:

पहिली मूर्ती (१८९३): जेव्हा दगडूशेठ हयात होते, तेव्हा त्यांनी स्वतः मूर्तिकार बाबूराव नाईक यांच्याकडून मातीची मूर्ती बनवून घेतली. ही मूर्ती आजही पुण्याच्या शुक्रवार पेठेतील ‘अकरा मारुती मंदिरात’ सुरक्षित आहे.

दुसरी मूर्ती (१८९६): प्लेगच्या काळात पुन्हा बाबूराव नाईक यांनीच दुसरी मूर्ती बनवली, जी सध्या कोंढव्यातील वृद्धाश्रमाच्या मंदिरात आहे.

तिसरी आणि सध्याची भव्य मूर्ती (१९६७-१९६८): १९६७ मध्ये जुनी मूर्ती जीर्ण झाल्यामुळे ट्रस्टने नवीन मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. हे काम सोपवण्यात आले कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शंकरअप्पा शिल्पी आणि नागेश शिल्पी यांच्यावर!या मूर्तीची एक अद्भूत गोष्ट अशी की, जेव्हा ही मूर्ती घडवली जात होती, तेव्हा एक मोठे सूर्यग्रहण आले होते. त्या सूर्यग्रहणाच्या अत्यंत शुभ आणि सिद्ध मुहूर्तावर शिल्पकाराने मूर्तीच्या उदरभागात एक सिद्ध केलेले ‘गणेशयंत्र’ मंत्रोच्चारात बसवले! अशी श्रद्धा आहे की, या यंत्रामुळेच आज या मूर्तीचे तेज अथांग आहे आणि बाप्पाकडे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते! १९६८ च्या अनंत चतुर्दशीला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज ते संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान बनले आहे!

तर मित्रांनो, हा आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा खरा आणि जाज्वल्य इतिहास! आता दगडूशेठ यांचे आडनाव श्रीवास्तव आहे की, गडवे किंवा आरोटे यापेक्षा आरोटे नावामागची कथा महत्त्वाची आहे. अकोल्याच्या मातीतील एक सामान्य ‘दगडू आरोटे’ पुण्यात जाऊन ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’ बनले, पुण्याचा गणेशोत्सव मोठा केला, त्यांची पत्नी पुण्यात भव्य दत्त मंदिर उभारते. आज जेव्हा तुम्ही पुण्यात जाऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हाल, तेव्हा एक नगरकर म्हणून आपली छाती अभिमानानं फुगली पाहिजे! कारण बाप्पा जरी पुण्याचा असला, तरी त्याला तिथे स्थापन करणारा राजा माणूस आपल्या अहिल्यानगरचा होता, असा दावा आहे. नगर जिल्ह्याचा हा गौरवशाली इतिहास आज प्रत्येक मराठी माणसापर्यंत, प्रत्येक नगरकरापर्यंत पोहोचलाच पाहिजे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button