महाराष्ट्राच्या आणि विशेषतः अहिल्यानगरच्या राजकारणाला एक मोठी ऐतिहासिक आणि वैचारिक पार्श्वभूमी आहे. राजकारणात कितीही तीव्र मतभेद असले, तरी नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा कौटुंबिक बाबींवर चिखलफेक न करण्याची एक अघोषित लक्ष्मणरेषा आजवर पाळली गेली आहे. पण दुर्दैवाने, सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विखे विरुद्ध पवार या वाकयुद्धात ही रेषा ओलांडली गेल्याचं चित्र आहे.
विखे घराण्याची लेक नीला विखे पाटील स्वीडनमध्ये खासदार झाल्यानंतर, विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा आधार घेत विखे पिता-पुत्रांवर जी वैयक्तिक चिखलफेक सुरू केली, त्याला सुजय विखे पाटलांनी अत्यंत कडक शब्दांत चपराक लगावली आहे. विखेंनी नेहमीच पाळलेली राजकीय मर्यादा पवारांना का सांभाळता आली नाही?
सप्टेंबर २०२६ मध्ये विखे पाटील घराण्यातील अशोक विखे पाटील यांच्या कन्या नीला विखे पाटील या स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्या. कौटुंबिक नातेसंबंधांचा आदर करत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपल्या बहिणीच्या या आंतरराष्ट्रीय यशाचं कौतुक केलं.
कौटुंबिक अभिमानापोटी विखेंनी हे विधान केलं होतं, कारण कुटुंबातील कोणीही सातासमुद्रापार नाव कमावलं तर ते स्वाभाविकच होतं. पण विरोधकांनी आणि काही प्रसारमाध्यमांनी नीला विखे यांच्या एका मुलाखतीचा संदर्भ देऊन विखे पिता-पुत्रांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. नीला विखे यांनी कौटुंबिक मतभेद जाहीरपणे मांडल्याचा गैरफायदा घेत, विरोधकांनी थेट विखे पाटील यांच्यावर राजकीय चिखलफेक सुरू केली.
या वादावर बोलताना सुजय विखे पाटील यांनी अत्यंत रास्त आणि रोखठोक आक्षेप घेतला. ते म्हणाले की, विखे कुटुंबाने नीला विखेंच्या नावावर कोणतेही राजकीय फ्लेक्स लावले नव्हते किंवा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. केवळ पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कौटुंबिक नात्याने त्यांचे कौतुक केले होते. यावेळी सुजय विखेंनी विरोधकांना सुनावले की, “ज्यांना स्वीडन देशाचा भूगोलही धड माहीत नाही, त्यांनी आमच्या कौटुंबिक विषयांवर राजकारण करू नये.” सुजय विखेंचा हा रोखठोक बाणा जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीला धरूनच होता, कारण घरगुती मतभेदांचा राजकीय फायदा उठवणे ही अत्यंत खालच्या पातळीची टीका मानली जाते.
पण या वादात जणू काही राजकीय फायदा उठवण्याची घाई झाली होती, आमदार रोहित पवार यांना! राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कार्यक्रमात रोहित पवारांनी विखे पिता-पुत्रांना घेरण्यासाठी थेट नीला विखेंच्या विधानाचा आधार घेतला आणि वैयक्तिक मुद्द्यावर बोट ठेवलं. रोहित पवार म्हणाले की, पक्ष आणि विचार बदलणाऱ्यांनी नीला विखेंकडून शिकलं पाहिजे. रोहित पवारांचे हे विधान विखे पाटलांच्या राजकीय प्रवासावर आणि थेट वैयक्तिक निष्ठेवर घाला घालणारे होते.
मुळात, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बहुतांश पक्षांचे नेते सोयीनुसार भूमिका बदलत असतात. पवार कुटुंबानेही काँग्रेसपासून फारकत घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाही त्यांनी काँग्रेसच्या त्यावेळच्या नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे केवळ विखे पाटलांना लक्ष्य करण्यासाठी एका महिलेच्या कौटुंबिक विधानाचा आधार घेणे रोहित पवारांना शोभणारे नव्हते, अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली.
आता प्रश्न पडतो की, रोहित पवारांनी हा वैयक्तिक आणि कौटुंबिक मुद्दा उकरून काढला खरा, पण विखे पिता-पुत्रांची आजवरची राजकीय पार्श्वभूमी काय सांगते? जेव्हा जेव्हा पवार कुटुंबावर किंवा नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वैयक्तिक संकटं आली, गंभीर आरोप झाले, तेव्हा विखे पिता-पुत्रांची भूमिका काय होती? चला, इतिहास उघडून पाहूया!
राजकारणात दोन आयुष्य असतात – एक राजकीय आणि दुसरं वैयक्तिक. विखे पिता-पुत्रांनी आजवर कधीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक केली नाही.
१. अजित पवारांच्या वेळची भूमिका : अजित पवार यांच्या संदर्भात जेव्हा कौटुंबिक किंवा वैयक्तिक आघातांचे प्रसंग आले, तेव्हा विखे पिता-पुत्रांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली. त्यांनी कधीही पवार कुटुंबाच्या अंतर्गत वादावर किंवा दुःखावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला नाही.
२. निलेश लंकेंवरील महिला आरोपांचे प्रकरण : अगदी जिल्ह्याचंच ताजं उदाहरण घ्यायचं झालं, तर मध्यंतरी खासदार निलेश लंके यांच्यावर एका महिलेने अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. तो एक मोठा वाद बनू शकला असता. विरोधक म्हणून विखे पिता-पुत्रांना निलेश लंकेंना पूर्णपणे कोंडीत पकडण्याची ती मोठी राजकीय संधी होती. पण विखे पिता-पुत्रांनी अत्यंत सुसंस्कृतपणा दाखवला. एका महिलेने केलेल्या त्या गंभीर आरोपांवर विखेंनी कोणतीही राजकीय टीका केली नाही किंवा लंके यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर चिखलफेक केली नाही. स्वतः सुजय विखेंनी या घटनांची आठवण करुन दिली.
रोहित पवारांनी जेव्हा ही मर्यादा ओलांडली, तेव्हा मात्र सुजय विखे पाटील गप्प बसले नाहीत. त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवारांचे नाव न घेता, अत्यंत कडक आणि सडेतोड शब्दांत पवारांना आरसा दाखवला. सुजय विखे पाटील म्हणाले की, “राजकारण करत असताना वैयक्तिक आयुष्यावर आत्तापर्यंत पवार कुटुंबानेही कधी भाष्य केलं नाही आणि विखे कुटुंबानेही केलं नाही. त्यामुळे टीका करताना विरोधकांनी भान ठेवावं.
तुमच्या नेत्यांच्या चारित्र्यावर जेव्हा एका महिलेने आरोप केले होते, तरीही आम्ही सुसंस्कृतपणा सोडला नाही, आम्ही काही बोललो नाही. पण जर तुम्ही आमच्या कौटुंबिक विषयांवर बोलणार असाल, तर लक्षात ठेवा – आम्हालाही बोलायला लावू नका. राजकारणात मर्यादा पाळली तरच ती दोन्ही बाजूंनी टिकते!”
सुजय विखेंचा हा इशारा अत्यंत रास्त होता, कारण जर विखे कुटुंब इतरांच्या वैयक्तिक वादांवर शांत राहून राजकारणाची पातळी राखू शकते, तर मग रोहित पवारांनी विखेंच्या कौटुंबिक विषयांवर बोलून ही पातळी का खालावली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शेवटी मुद्दा एवढाच आहे की, लोकशाहीत नेत्यांच्या राजकीय धोरणांवर, विकासकामांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. रोहित पवारांनाही तो अधिकार आहे. पण एखाद्या कुटुंबातील अंतर्गत वादाचा राजकीय फायदा उठवणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विखेंनी दिलेला सडेतोड इशारा आता विरोधकांना विचार करायला लावणारा आहे.





