मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या दोन वर्षांपासून आपल्या इशाऱ्यावर नाचवणारे मनोज जरांगे पाटील… आज एका अशा वळणावर उभे आहेत, जिथे त्यांच्या पायाखालची जमीन सरकताना दिसतेय..! ज्या अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाची ज्वाला पेटली, त्याच अंतरवाली सराटीतला ऐतिहासिक आंदोलनाचा मंडप एका रात्रीत गायब झाला. पण का..? जरांगे पाटलांनी स्वतःहून मैदान सोडलं, की त्यांना मैदान सोडायला भाग पाडलं गेलं? गेल्या ७२ तासांत मनोज जरांगे यांच्याबाबत अशा ३ मोठ्या घडामोडी घडल्या आहेत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. एकीकडे त्यांच्या सर्वात जवळच्या सहकाऱ्याला अवैध वाळू उपशाप्रकरणी तब्बल ५ कोटींचा दंड झालाय, तर दुसरीकडे ज्या गावाने जरांगे पाटलांसाठी लाठ्या-काठ्या झेलल्या, त्याच गावच्या महिलांनी जरांगे पाटलांवर फसवणुकीचे गंभीर आरोप केलेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण याच थेट मुद्द्यांना हात घालणार आहोत… मनोज जरांगे पाटलांची लोकप्रियता खरंच संपत चालली आहे का? की त्यांचे सहकारीच वादात अडकत चालले आहेत…? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करुयात… व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण ती सत्य परिस्थिती मांडणार आहोत, जी मुख्य प्रवाहातील मीडिया दाखवत नाहीये!
सगळ्यात पहिला आणि मोठा धक्का म्हणजे ‘अंतरवाली सराटीतील मंडप हटवणे’.
गेल्या ३ वर्षांपासून हा मंडप मराठा आंदोलनाचे शक्तीपीठ बनला होता. २६ सप्टेंबरला मनोज जरांगे यांनी अचानक जाहीर केलं की, ते अंतरवाली सराटीतील आंदोलन स्थगित करून ते बीडच्या पाटोद्याला हलवत आहेत. जरांगे पाटलांनी याला ‘मिशन-३’ असं नाव दिलं आणि सांगितलं की, पुढील ३ महिन्यांत आरक्षण न मिळाल्यास ते पाटोद्यावरून थेट मुंबईवर धडकणार!
पण मित्रांनो, पडद्यामागची कथा काही वेगळीच आहे. एका रात्रीत तो मंडप, ते व्यासपीठ का उखडून टाकावं लागलं? जाणकारांच्या मते, अंतरवाली सराटीमध्ये गेल्या काही महिन्यांत आंदोलकांची गर्दी कमालीची ओसरली होती. जो जनसागर सुरुवातीला दिसायचा, तो आता गायब झाला होता. आंदोलन जेव्हा लांबत जातं, आणि ठोस निकाल मिळत नाही, तेव्हा लोकांचा संयम सुटतो. बीडला आंदोलन हलवणे हा ‘मास्टरस्ट्रोक’ आहे की अंतरवाली सराटीतील अपयश लपवण्यासाठी घेतलेला ‘बॅकफूट’ निर्णय? हा पहिला मोठा प्रश्न आहे!
मनोज जरांगे पाटील नेहमी काय म्हणतात? ‘मी समाजासाठी लढतोय, माझा स्वार्थ नाही.’ त्यांचा हा प्रामाणिकपणाच लोकांच्या मनाला भिडला होता. पण, जेव्हा तुमच्या डाव्या-उजव्या बाजूला बसणारे लोकच वादात अडकतात, तेव्हा बोटं तुमच्यावरही उठतात!
सोमवारी २८ सप्टेंबरला एक मोठी बातमी आली. जरांगे पाटलांच्या कोअर कमिटीचे खंदे शिलेदार संजय नानासाहेब कटारे यांना प्रशासनाने मोठा दणका दिलाय. अवैध वाळू उत्खनन प्रकरणात त्यांच्यावर लावलेला तब्बल ४ कोटी ९० लाख ७२ हजार रुपयांचा दंड उपविभागीय अधिकाऱ्यांनी कायम ठेवलाय.
विचार करा, ५ कोटी रुपयांचा दंड!
एका बाजूला मराठा समाजातील गरीब तरुण आरक्षणासाठी, नोकरीसाठी जीव देतोय, आत्महत्या करतोय… आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कोअर कमिटीतील नेत्यांवर कोट्यवधींच्या वाळू चोरीचे आरोप सिद्ध होत आहेत. यामुळे सामान्य मराठा समाजात एकच संदेश गेलाय की—’आंदोलनाच्या नावाखाली काही लोक स्वतःचे खिसे भरत होते का?’ या एका बातमीने जरांगे पाटलांच्या नैतिक अधिकाराला खूप मोठा धक्का दिलाय…
पण मित्रांनो, सगळ्यात मोठा वज्रघात झालाय तो काल, म्हणजे रविवारी २७ सप्टेंबरला… ज्या गावानं मनोज जरांगे यांना डोक्यावर घेतलं, ज्या गावातील मायमाऊल्यांनी पोलिसांच्या लाठ्या स्वतःच्या पाठीवर झेलल्या, त्याच अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांचा संयम काल सुटला. ललित तारख आणि गावातील महिलांनी कॅमेऱ्यासमोर येऊन मनोज जरांगे पाटलांवर जे आरोप केलेत, ते ऐकून कोणाचाही थरकाप उडेल.
गावकरी उघडपणे म्हणतायत—’आम्ही दिवसरात्र लाठ्या खाल्ल्या, कष्ट केले, पण आमच्या गावात एकालाही कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र मिळालं नाही! मनोज जरांगे यांनी केवळ भावनिक राजकारण करून गावाला फसवले.’ इतकंच नाही, तर ‘जरांगे पाटलांनी उपोषणं कशी केली, हे आम्ही योग्य वेळी उघड करू’ असा थेट इशारा गावकऱ्यांनी दिलाय! विचार करा, जी माणसं आंदोलनाच्या वेळी जरांगे पाटलांच्या अवतीभवती असायची, तीच आज त्यांच्याविरोधात बोलू लागली आहेत. जेव्हा घरातूनच विरोध सुरू होतो, तेव्हा ती घसरत्या लोकप्रियतेची सर्वात मोठी पावती असते!
आता येऊयात आजच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. आज म्हणजेच २८ सप्टेंबरला मनोज जरांगे यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन सांगितलं की, ‘मला एकटं पाडण्याचा आणि समाजमाध्यमांवर बदनाम करण्याचा कट रचला जातोय.’
पण प्रश्न असा पडतो की, हा कट सरकार रचतंय की जरांगे यांच्या स्वतःच्या रणनीतीमुळे हे घडतंय? गेल्या काही महिन्यांत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे विश्लेषण केल्यास ३ गोष्टी प्रकर्षाने जाणवतात:
१. केवळ तारखांवर तारखा :
प्रत्येक आंदोलनानंतर नवीन तारीख देणे, यामुळे सामान्य माणूस थकलाय. आंदोलन करायचं आणि अचानक काहीतरी आश्वासनं घेऊन माघार घ्यायची. या गोष्टीला आता समाज थकला आहे.
२. बिघडवणारी राजकीय विधाने : आंदोलनाचा रोख आरक्षणापेक्षा ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडणे किंवा विशिष्ट नेत्यांना पाडणे या राजकीय विधानांवर जास्त गेला. मोठ्या पदाच्या नेत्यांवर थेट बोलणे अनेकांना आवडले नाही. त्यामुळे काही कार्यकर्ते आंदोलनातून स्वतः बाजूला झाले.
३. स्थानिक पातळीवरील नाराजी :
कोअर कमिटीतील अंतर्गत वाद आणि सहकाऱ्यांचे आर्थिक गैरव्यवहार समोर आल्याने परिस्थिती आणखी बिघडली. मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळालं पाहिजे, यात दुमत नाही. पण आरक्षणाची लढाई लढताना नेतृत्वाभोवती जर संशयाचं जाळं निर्माण झालं, तर समाज दूर जातो. आज अंतरवालीतील गावकऱ्यांची नाराजी हेच दाखवून देतेय की, आता जरांगे पर्व पूर्वीसारखं राहिलेलं नाही.





