महाराष्ट्राच्या राजकारणात ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका’ या सत्तेचा मुख्य कणा मानल्या जातात. आणि जेव्हा विषय अहिल्यानगर जिल्हा बँकेचा येतो, तेव्हा तिथले राजकारण थेट राज्याच्या राजधानीपर्यंत धक्के देते. सध्या २०२६ मध्ये बँकेच्या नवीन निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. नेते एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न करताहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का? यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेली पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातील सर्वात नाट्यमय, चुरशीची आणि धक्कादायक घडामोडींनी भरलेली निवडणूक ठरली होती.
१७ जागांवर पडद्यामागे झालेली गुप्त हातमिळवणी… आणि केवळ ४ जागांसाठी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत झालेला अटीतटीचा संघर्ष! एवढंच नाही, तर निकालानंतर पुढच्या ५ वर्षांत बँकेने ३ अध्यक्ष बदलताना पाहिले! आजच्या या व्हिडिओत आपण त्या ४ मतदारसंघांतील विजयी विरुद्ध पराभूत उमेदवारांची अचूक आकडेवारी आणि मतांचे गणित सविस्तर पाहणार आहोत.
फेब्रुवारी २०२१ ची वेळ होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. साहजिकच जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार हे स्पष्ट होते. बँकेच्या एकूण २१ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला होता. पण जाहीर व्यासपीठावर नेते एकमेकांवर कितीही टीका करत असले, तरी सहकार क्षेत्रातील स्वतःच्या जागा सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे तडजोडीचे राजकारण चालले. ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीचा अफाट खर्च आणि राजकीय कटुता टाळण्यासाठी जागांची वाटणी आधीच ठरवून घेतली. परिणामी, २१ पैकी तब्बल १७ जागा या मतदानापूर्वीच बिनविरोध झाल्या. पण ४ जागांवर सहमती झाली नाही. तिथे २० फेब्रुवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.
1)पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे
2) राहात्यातून अण्णासाहेब म्हस्के
3) शेवगावमधून चंद्रशेखर घुले
4) श्रीगोंद्यातून राहुल जगताप
5) जामखेडमधून अमोल राळेभात
6) अकोल्यातून सीताराम गायकर
7) नेवाशातून शंकरराव गडाख
8) राहुरीतून अरुण तनपुरे
9) संगमनेरमधून माधवराव कानवडे
10) श्रीरामपूरमधून भानुदास मुरकुटे
11) श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे
12) कर्जतमधून आशा काकासाहेब तापकिर
13) श्रीरामपूरमधून करण जयंत ससाणे
14) कोपरगावमधून आशुतोष काळे
15) अकोल्यातून अमित अशोक भांगरे
16) संगमनेरमधून गणपतराव सांगळे
17) आणि कोपरगावमधून विवेक कोल्हे
या जागा बिनविरोध झाल्या. परंतु सेवा सोसायटी मतदार संघातील नगर, पारनेर, कर्जत तर बिगरशेती संस्था मतदार संघात एक, अशा 4 जागांसाठी जिल्हा बँकेची निवडणूक झाली. त्यात गंमत म्हणजे, दिग्गज नेते शिवाजीराव कर्डिले यांनाही निवडणुकीला सामोरे जावे लागले. नगर सोसायटी मतदारसंघातून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने सत्यभामाबाई बेरड यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंग भरले होते. पारनेर सोसायटी मतदारसंघात उदय शेळके विरुद्ध रामदास भोसले, कर्जतमध्ये अंबादास पिसाळ विरुद्ध मिनाक्षी साळुंके आणि बिगरशेती मतदारसंघात विद्यमान संचालक दत्ता पानसरे विरुद्ध प्रशांत गायकवाड, अशा लढती झाल्या. त्यासाठी २० फेब्रुवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.
निकाल लागला तेव्हा तो अपेक्षितच राहिला.
१) नगर सोसायटी मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत :
भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवला. कर्डिले यांना ९४ मते मिळाली, तर पराभूत उमेदवार सत्यभामाबाई बेरड यांना १५ मतांवर समाधान मानावे लागले.
२) पारनेर सोसायटी मतदारसंघ :
येथे महाविकास आघाडीचे ॲड. उदय शेळके यांच्याविरोधात विखे आणि भाजप गटाचे रामदास भोसले यांच्यात थेट दुरंगी लढत झाली. उदय शेळके यांनी हा गड एकतर्फी राखला. शेळके यांना १०२ मते मिळाली, तर पराभूत उमेदवार रामदास भोसले यांना केवळ ६ मते पडली.
३) कर्जत सोसायटी मतदारसंघ :
या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मुख्य लढत महाविकास आघाडीचे अंबादास पिसाळ आणि भाजपच्या मीनाक्षी साळुंके यांच्यात झाली. या अटीतटीच्या लढतीत अंबादास पिसाळ हे अवघ्या १ मताच्या फरकाने विजयी झाले! पिसाळ यांना ३७ मते मिळाली, तर पराभूत उमेदवार मीनाक्षी साळुंके यांना ३६ मते मिळाली.
४) बिगरशेती संस्था मतदारसंघ :
या मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रशांत गायकवाड आणि तत्कालीन विद्यमान संचालक दत्ता पानसरे यांच्यात जोरदार दुरंगी लढत झाली. प्रशांत गायकवाड यांनी या मोठ्या मतदारसंघात बाजी मारली. गायकवाड यांना ७६३ मते मिळाली आणि ते विजयी झाले, तर दत्ता पानसरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
बँकेत थोरात गटाने म्हणजेच महाविकास आघाडीने बहुमत मिळवले. बहुमत आल्यानंतर मार्च २०२१ मध्ये अध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. उदय शेळके यांच्या गळ्यात पडली, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची निवड झाली. उदय शेळके यांनी बँकेचा कारभार हाती घेतला, मात्र काही महिन्यांतच त्यांचे अकाली निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे बँकेचे अध्यक्षपद अचानक रिक्त झाले आणि इथून राजकारणाने नवीन कूस बदलली. अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी मार्च २०२३ मध्ये पुन्हा निवडणूक झाली. या वेळी राज्यात सत्ता बदलून शिंदे-फडणवीस सरकार आले होते. निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले रिंगणात होते, तर भाजपकडून शिवाजीराव कर्डिले उभे होते.
बहुमत मविआकडे असूनही, मतदानाच्या दिवशी पडद्यामागे मोठा ‘गेम’ झाला. महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडली. अवघ्या एका मताच्या फरकाने, म्हणजेच १० विरुद्ध ९ मतांनी भाजपचे शिवाजीराव कर्डिले अध्यक्ष बनले! राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘विखे पॅटर्न’ने मविआच्या हातातून सत्ता खेचून आणली होती. या रंगतदार लढतीवर आम्ही यापूर्वी स्वतंत्र व्हिडीओही केलेला आहे. त्याची लिंक कमेंट बाँक्समध्ये देत आहोत. पुढे, दुर्दैवाने ऑक्टोबर २०२५ मध्ये शिवाजीराव कर्डिले यांचेही आजारपणामुळे निधन झाले. बँकेने एकाच कार्यकाळात आपला दुसरा अध्यक्ष गमावला होता.
कर्डिलेंच्या निधनानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये तिसऱ्यांदा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. वारंवार होणारा राजकीय संघर्ष टाळण्यासाठी नेत्यांनी समजूतदारपणा दाखवला. २०२३ मध्ये अवघ्या एका मताने पराभूत झालेले चंद्रशेखर घुले यांनी पुन्हा अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्यामुळे त्यांची बँकेचे तिसरे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. अशा प्रकारे, २०२१ च्या निवडणुकीचे राजकीय वर्तुळ २०२६ च्या सुरुवातीला पूर्ण झाले. दुसऱ्या अध्यक्षपदाच्या वेळी पडद्यामागून चाली खेळणाऱ्या विखेंनी, तिसऱ्यांदा घुलेंच्या अध्यक्षपदासाठी पुढाकार घेत त्यांना बिनविरोध केले.





